तगमग
देणे पावसाचे कसे वेडे ओलावले मन
पान पान आठवांचे गेले पार बिथरून
मेघ गर्जती बाहेर, आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर, उर धपापला पार
पडे पाऊस जोरात, आत उसळे आकांत
झाकोळले सारे काही, मन काळोखी नहात
पडे पाऊस पाऊस जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत, डोह पुरा डहुळला