गझल
मी प्रेत जीवनाचे घेऊन आलो!
मरणा! अरे किती मी लांबून आलो!!
पाऊस हा न पडला माझ्या फुलांचा....
आताच मी कळ्याही तोडून आलो!
शोधायला स्वत:ला चौफेर फिरलो......
मी राखही स्वत:ची चिवडून आलो!
हे ओठ ऐनवेळी देतात धोका;
माझी मनोगते मी घोकून आलो!
जाऊन वादळाला तू सांग वाऱ्या....
घर मी पुन्हा नव्याने बांधून आलो!
गाली असून तुझिया इतकी गुलाबी;
हाती गुलाब माझ्या घेऊन आलो!
मज मोजता न आले मोतीच माझे....
मी थेंब सागराचे मोजून आलो!
घेऊन चल सुगंधा, आता मला तू!
बघ मी फुलास मागे सोडून आलो!
ने प्राक्तना मला तू आता कुठेही!
मी पाश सर्व माझे तोडून आलो!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१