..............................................
...तुजमुळेच जगणे खरे!
..............................................
क्षणभरही तुज मी जरी विसरलो असतो...
मी मनातुनी माझ्याच उतरलो असतो!
रुजू दिले नाहीस मला तू तुझ्या मनी...
तुजसवे तिथे मी छान बहरलो असतो!
तू 'हो' म्हटलेले मला पेलले नसते...
मी तरी जिंकलो नसतो! हरलो असतो!!
तू खुल्या मनाने हात पुढे केलेला...
धरला असता तर खुळाच ठरलो असतो!
मज नव्हती घाई व्यक्त कधी होण्याची...
सावकाश अश्रू बनून झरलो असतो!
मी सुकून गेलो माळावर एकाकी...
मी तुझ्या अंगणी रोज डवरलो असतो !
तुजमुळेच जगणे खरे! अन्यथा मीही -
अफवेसम कोठेतरी पसरलो असतो !!
- प्रदीप कुलकर्णी
....................................................
रचनाकाल ः 5 व 6 डिसेंबर 2005
....................................................