गझल
हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!!
बनू नये मांडलीक कोणी कधी कुणाचे!
विचार, आचार, यांत माफक मिजास ठेवा!!
गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!
खुशाल संसारही जगाचा कुणी करावा!
बरोबरीने स्वत:स राखीव श्वास ठेवा!!
असो कितीही बिकट जरी वाट नागमोडी;
जरा विसावून, रोज जारी प्रवास ठेवा!
अनेक यात्रेकरू पुढे जायचे उद्याला......
पुढे जरी पोचलात, मागे सुवास ठेवा!
भले किती पायपीट आहे करावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेला निवास ठेवा!
पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!
जगात कोणी कधी न राहो कुठे उपाशी!
भुकेजल्यांस्तव हशीखुशीने उपास ठेवा!
चुकून रस्ता तुम्हा घराचा न याद आला!
तुम्हा स्मरायास, उंबराही घरास ठेवा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१