गझल
केवढा घेतोस मोठा घास बाळा!
काय वय, अन् काय हा भलताच चाळा!!
जिंदगी आ वासुनी बघते तुझीही......
लावतो तुझियाच तू प्रगतीस टाळा!
वांझ शब्दांचीच आहे रोषणाई!
गझल कोठे? फक्त गझलांचा धुराळा!!
कोणती नस तोडली गेली कळेना.....
कैक लोकांना किती आला उमाळा!
ह्या दिलाशांची, खुलाशांचीच भीती!
बेगडी जग, बेगडी त्यांचा जिव्हाळा!!
पिंड माझा अन् तुझा आहे निराळा!
व्हायचो तुजसम न मी नामानिराळा!!
झाकुनी एकास दुसऱ्या दाखवावे!
सारखा वाटे उन्हाळा, पावसाळा!!
पावसानेही किती अंगांग पोळे!
त्या उन्हापेक्षा सवाई पावसाळा!!
वाटते बरसात हल्ली जीवघेणी!
दे मला तू आज त्यापेक्षा उन्हाळा!!
चार थेंबांना कसा मोताद झालो?
बरसला तुझिया कृपेचा मेघ काळा!
सांग वागावे कसे वागू नये ते!
ताप होतो, नियम पाळा वा न पाळा!!
ओठ हे मी टाचले माझे अखेरी....
का उगा मुख आपले आपण विटाळा?
भुंकणे सोडा तुम्ही श्वानाप्रमाणे!
वाघ, सिंहांसारखे आता पिसाळा!!
ऐट अन् भपका तुम्हा लखलाभ तुमचा!
मी बरा आहे, जसा आहे गबाळा!!!
पाहिजे तेथे फणा काढा खुबीने!
पाहिजे तेथे शिताफीने मवाळा!!
नाटके करतात, ती नुसती निहाळा!
तोतयांना योग्य वेळेला पिटाळा!!
बोलणे घेऊ नये त्याचे मनावर!
चाड ज्ञानाची, वयाची ना टवाळा!!
शायरी माझी कशी त्यांना रुचावी?
बाज माझा आणि त्यांचा निरनिराळा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१