लाभला ना जरी रुकार तुझा;

गझल
लाभला ना जरी रुकार तुझा;
वाटतो दागिना नकार तुझा!

तूच ओंकार हे जगास कळे.....
ना कळे मात्र...मी उकार तुझा!

वाट चुकतो मधेच वाटसरू!
भक्त मी हा असा चुकार तुझा!!

हे अहोभाग्य लाभले मजला...
हा मला लागला विकार तुझा!

का भिकारी न वाटणार अता?
आज अवतारही भिकार तुझा!

पाहिला रागही बराच तुझा!
लाभला स्नेहही चिकार तुझा!!

शायरी ऐकवू किती तुजला?
ऐकला मी अता डकार तुझा!

हात देतेस तू मधेच मला!
पाहिला हा नवा प्रकार तुझा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१