अजून मी मोजतोच किंमत चुकामुकीची!

गझल
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
*************************************************

अजून मी मोजतोच किंमत चुकामुकीची!
अजूनही भोगतो सजा मी उनाडकीची!!

कधीच येऊन गाव गेले...मला न पत्ता!
अजूनही टाकतो कशी पावले चुकीची!!

कितीक द्यावेत श्वास हप्ते दिल्याप्रमाणे?
हयात सरली, हयात झाली न मालकीची!

व्रतस्थ राहून काम माझे करायचो मी!
जरी मला ज्ञात नोकरी त्या न लायकीची!!

अलीकडे खेळण्यांपरी जाहलीत शस्त्रे....
कुणा न भीतीच राहिली आज बंदुकीची!

न हे पुढारी, न लोकनेते, असे भुतावळ!
निवडणुका फक्त एक लीला भुताटकीची!!

नव्या पिढीला नको म्हणे ते विवाहबंधन!
विरून गेली कथा इथे राम-जानकीची!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१