प्रतिभा (भाग ३)

                                                  दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला लवकरच गेलो. मी आता प्रतिभाकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. ती जरा उशिरा आली. ती माझ्याशी एकही अक्षर बोलली नाही. म्हणजे ती कधीच बोलत नसे. कालच्या प्रकारानंतर ती माझ्याशी बोलणार नाही अशी माझी खात्री होती. मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करित होतो. एकीकडे कामही करीत होतो. निदान तसे दाखवीत तरी होतो. तिच्या चेहऱ्यावर कालचे काहीच अवशेष दिसत नव्हते. मला तिचा चेहरा एकदा तरी आक्रसलेला पाहायचा होता. निदान काहीतरी प्रतिक्रियेची अपेक्षा नक्कीच होती. मला असे गप्प बसणारे लोक आवडत नाहीत. तिच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. जणू इस्त्री केलेला रुमाल. आता मला खात्री झाली की ती मला काहीही विचारणार नाही. मी मग खरच कामात बुडून गेलो. एक दोन वेळा नारायणच्या केबीन मध्ये चर्चेसाठीही जाऊन आलो. अर्थात ती त्यात नव्हती. आज ती लाल रंगाचा ड्रेस घालून आली होती. खांद्यावरची ओढणी सांभाळीत ती काम करीत होती. तिला ड्रेसची सवय नसावी असे वाटले. तिचा बांधा आणि इतर अवयव आज उठून दिसत होते. तिच्या अंगाचा घाम मिश्रित सेंटचा वास मला उत्तेजित करित होता. मला थेट पाहता येणं शक्य नव्हतं. दुसरी एखादी स्त्री असती तर तिला जवळून न्याहाळण्याची मिळालेली संधी मी सोडली नसती. तरीही काहीही पाहत नाही असं दाखवीत मी पाहता येईल तेवढं पाहत होतो. कदाचित हे तिच्या लक्षात आलं की काय कोण जाणे. लंच  टाइम झाला. ..... मी लंचला जाण्याच्या तयारीने उठलो. आणि वळलोही. .......

                                           अचानक तिने प्रश्न फ़ेकला. कोळी जाळं फेकतो तसं . बेसावधपणे काही मासे जाळ्यात अडकतात, तीच अपेक्षा तिची होती. " मिस्टर उत्तम , .......... " मी वळलो. तिच्याकडे पाहत मी प्रश्नार्थक मुद्रा केली. ती पुढे म्हणाली, " काल तुम्ही सोनार गल्लीत आला होतात ना ? " एकदम ती असं काही विचारील याची कल्पना नसल्याने मी गडबडून जाऊन हो म्हंटलं. मी नाही म्हणू शकलो असतो. पण माणूस नाही म्हणायचं असतानाही हो का म्हणतो कोण जाणे.  त्यावती म्हणाली, "   काय काय पाहिलंत तिथे ? "   तिच्या प्रश्नाने  आणि माझ्या चेहऱ्यावरून फिरणाऱ्या तिच्या शोधक नजरेने ला हलकासा घाम येत असल्याची जाणीव झाली. तरीही मी स्वतःला सांभाळीत म्हंटले, " काय पाहणार ? तो काय म्यूझियम थोडाच आहे ? "   तिने आवाजात धार आणित म्हंटलं, " तेच तर म्हणत्ये मी, तरीही तुम्ही तिथे आला होतात ........ थोडं थांबून ती म्हणाली, " ...... माझा पाठलाग केलात ? ..... का ? माणसाला खाजगी आयुष्य असं असूच नाही का ? त्यातल्या त्यात एकाद्या स्त्रीला ? तुम्हाला माझी काय माहिती हवी आहे ? " ....... मी खिशातला रुमाल काढून घाम पुसू लागलो. तो तो घाम जास्त येऊ लागला. तिला उत्तर देणं सध्या तरी मला कठीण होतं. तरीही मी तिला उत्तर दिलं. " माझा एक मित्र राहातो . दीपेश नाव आहे त्याचं. आणखी काही माहिती 
हवी का ? ............. तिने माझ्या डोळ्यांकडे    संशयाने  पाहिलं. तिच्या डोळ्यात मला तिरस्कार आणि अविश्वास दिसला. मग ती खालच्या मानेने  म्हणाली, " परत माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायचं काम करू नका, नाहीतर मला  गंभीर स्टेप्स घ्याव्या लागतील . " तिला जास्त बोलण्याची संधी देता मी वळलो. मला लंचमध्ये फारसा रस वाटेना. आता तर हिचं रहस्य उलगडलंच पाहिजे आणि मी त्यासाठी मी काहीही 
करण्याचं ठरवलं. आता  तर ती कुठे राहते तेही शोधण्याचं ठरवलं.माझं मन भलत्याचं नशे मध्ये डुबक्या मारू लागलं. खरंतर मी तिथेच थांबायला हवं होतं. पण पुढचे प्रसंग मीच जणू बेतत होतो असं नंतर मला वाटलं. ..... त्या दिवशी माझं कामात लक्ष लागलं नाही. मी डिस्टर्ब झालोय , हे तिच्या  लक्षात आलं असावं. मला उगाचंच तिच्या मुद्रेवर विजयी भाव दिसले. आज तिने एका पुरुषाला घाबरवलं होतं . मला ती यापुढे काय कृती करेल याचा अंदाज येत नव्हता. दोन वेळा नारायणने मला बोलावलं.  पण माझ्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाल्याने तो म्हणाला, " उत्तम, तुमको  मंगता है तो एक दोन दिन लेलो, गीव मी प्रॉपर इंफोर्मेशन, नेक्स्ट  टाइम यू विल नॉबी एक्सक्यूज्ड. "
  मी त्या दिवशी नाराज होउनच घरी गेलो. दरवाज्या उघडणाऱ्या रिताला विनाकारण जवळ घेत म्हणालो, " उद्या आपण सगळेच बाहेर जेवायला जाऊ "     ......... आश्चर्य वाटून ती म्हणाली, " प्रमोशन मिळालं वाटतं. "     मी मानेनेच नाही म्हंटलं. काय कोण जाणे माझा मूड खराब असला तरी तिचा मूड मात्र चांगला झालेला दिसला. तसंही एक दोन दिवस लीव मिळणार होतीच. पाहू लीवचा काय सदुपयोग (? )
करता येतोय ते. फक्त एकच ,लीव घेतलेली आहे हे रिताला कळून द्यायचं नाही. मी हे सगळं का करतोय असं तुम्हाला वाटत असणार.  पण
मनाचा थांग भल्या भल्यांना लागत नाही असं म्हणतात. पण आपल्या मनाचा थांग आपल्याला पाहायचा नसतो हेच खरं.  मन उकरून पाहत होतं. पण मी ते उकरणं दाबलं. माझं मन मी लागलेल्या टीव्ही सिरियलमध्ये गुंतवण्याच प्रयत्न करू लागलो.
                                                  दुसऱ्या दिवशी मी नारायणला फोन करून दोन दिवस येणार नसल्याचे सांगितले. तो थोडा वैतागलेला दिसला . त्याच्या बोलण्याचा लगेच फायदा घेतलेला त्याला आवडला नसावा. पडत्या फळाची आज्ञाच ती. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली नाही की मी दिवसभर घरी बसून काय करणार होतो . मला रिताला जेवायला घेऊन जायचं होतं. पण ते दिवसा जावं लागेल.  मग प्रतिभाचा माग कसा लागणार ? ते काम  तर संध्याकाळ नंतरच करावं लागेल. म्हणून मी कामावर जायचं ठरवलं. आणि दिवसभर ती माझ्या डोळ्यासमोरही राहिली असती. त्या दिवशी मी थोडा उशिराच ऑफिसमध्ये पोहोचलो. प्रतिभा जागेवर दिसली नाही. मी गेल्या गेल्या प्रथम 
नारायणलाच भेटलो. त्याच्या तोंडावर आश्चर्याचे भाव होते. पण तो काही बोलला नाही. मात्र त्याने मला कामात नीट लक्ष देण्याचे सुचवले. 
दुपारी दोन वाजेपर्यंत कामात वेळ गेला. नंतर प्रतिभा आली.  मी येणार नसल्याने माझ्या व्हिजिटस तिला दिल्या होत्या. तिने फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. म्हणजे ,  मी येणार नसल्याने तिला जावं लागलं ,  या भावनेने ती भारल्यासारखी दिसली. काहीच घडलं नाही. 
संध्याकाळी ती जायला निघाली . मी थोडावेळ उगाचच इकडे तिकडे करून नारायणला सांगून निघालो. ती रिक्षा पकडताना दिसली. मीही 
रिक्षा पकडली. कुठे जायचं हे न सांगितल्याने रिक्षावाल्याने जोरात विचारले, " कही जाना नही क्या ? "   मी त्याला प्रतिभाच्या रिक्षाचा पाठलाग करायला सांगितलं. थोडी फार कुरकुर करीत तो निघाला. तिची रिक्षा गर्दीतून वाट काढीत चालली होती. अचानक तिची रिक्षा दिसेनाशी झाली.  मी चडफडलो.  मग माझी रिक्षा मी बोरिवली स्टेशनकडे घेण्यास सांगितलं. तिचा माग नाहीसा झाल्याने मी निराश झालो. त्या दिवशी तसंच घरी जावं लागलं. रिता आल्या आल्या तयार झालेली दिसली. पण आता माझा मूड नव्हता. मी आज जायचं नाही असं सांगून तिची निराशा केली. जेमतेम जेवण झालं . (कारण माझा मूड नव्हता म्हणून) रात्री रिता जवळ आली . मी यांत्रीकपणे तिच्या अंगावरून हात फिरवला.
तिला ते जाणवलं असावं. ती उठून बसत म्हणाली, " काय झालय काय ,  हल्ली  असं कोरडेपणाने का जवळ घेता. काही झालंय का ? माझं सोडा पण मुलांचीही निराशा केलीत. "   तिला जवळ घेत मी म्हंटलं , " सॉरी, एक दोन दिवसात नक्की बाहेर जेवायला जाऊ‍. झोप आता. "
असं म्हंटलं . ती खरच झोपली. पण मी टक्क जागा होतो. रात्री केव्हातरी मला झोप लागली. इतका वेळ प्रतिभाचा विचार करून माझं डोक
शिणलं . ती एवढी शुष्कतेने का वागते ? आपण तर तिला काहीच त्रास दिला नाही. बरोबर काम करणाऱ्या  माणसांच ट्यूनिंग कीती छान जमतं.  मग हिच अशी का ?    मग मला आमच्या ऑफिसमधल्या जोड्या आठवल्या. सावर्डेकर बाई आणि प्रताप , मिश्रा आणि ललिता , राघवन आणि 
सिथा. कशी मनापासून आणि सहकार्य करून काम करतात. काम तर आमचंही चांगलं होत होतं. पण त्यात नातं नव्हतं. निदान मैत्रिचं तरी हवं होतं. माझ्या मनाने परत मैत्री या विषयावर माझ्या सात्त्विक (? ) भावना दाखवायला सुरुवात केली. मग थोड्या मोठ्याने मी मनावर  चिडून म्हंटलं, " हो ,  मला आवडते प्रतिभा. आणि तिच्या बरोबर एंजॉय करायलाही मला आवडेल. " तेव्हा   कुठे मन थप्पड मारल्यासारखं स्वस्थ बसलं. तरीही " निर्लज्ज " हा शेरा बाहेर आलाच मी फार लक्ष दिलं नाही. मात्र उद्या काहीही  झालं तरी प्रतिभाचं रहस्य उलगडलंच पाहिजे. 
असं मी ठरवलं. जणू ते काम मला नारायणनेच दिलं होतं. मी सिगारेट शिलगावली. एक दोन  झुरके मारुन फेकून दिली. 
                                                  दुसऱ्या दिवशी मी कामावर लवकर जायचं ठरवलं. त्याप्रमाणे गेलोही. पण माझ्या आधीच प्रतिभा येऊन 
बसली होती. मी कामाला सुरुवात करणार तोच नारायणने आम्हाला दोघांना आत बोलावलं. आत गेल्यावर त्याने आम्हाला दोघांना विल्सन आणि कंपनीकडे जायला सांगितलं. काम मोठं असल्याने त्याने दोघांना सांगितलं होतं. मला ते फारसं आवडलं नाही. कारण मी जितका मोकळा राहणार होतो तितकं मला प्रतिभाच्या मागे लागता आलं असतं आम्ही ऑफिसला परत नाही आलो तरी चालणार होतं. विल्सन मध्ये जाण्यापूर्वी आम्ही दोघांनी (म्हणजे खरंतर मीच) परत एकदा काम थोडक्यात समजून घेतलं. आणि चेकलिस्ट काढली. एकदाच फक्त ती म्हणाली, " याची काही गरज नाही, माझ्या लक्षात आहे सगळं . " तिचं बोलणं माझा संपर्क टाळण्यासाठी होतं हे माझ्या लक्षात आलं. पण मीच 
घोडं पुढे दामटलं. तिच्या चेहऱ्याचं निरिक्षण करून पाहिलं. पण दगडाचा मुखवटा घालण्याची तिला सवय होती , त्यामुळे माझ्या पदरात परत निराशा आली. एकच फायदा झाला. तिच्या  उजव्या खांद्यावरचा तीळ तेवढा मला दिसला. मला एवढं आकर्षण का निर्माण  झालं होतं कोण जाणे . बहुतेक जे माणूस जवळ येऊ  देत नाही , त्याच्या बद्दल जास्त आकर्षण वाटत, हेच खरं. त्यातून ती स्त्री होती. आम्ही ऑफिस बाहेर आलो. रिक्षा पकडली. ती माझ्या बाजूला (जवळ नाही ) थोडं अंतर ठेवून बसली होती.  माझं लक्ष जरी तिच्याकडे असलं तरी तिचं लक्ष नाकासमोर होतं. रिक्षा जात असताना एकदाच फक्त रिक्षावाल्याला न  चुकवता आलेल्या खड्ड्याने ती माझ्या अंगावर भेलकांडली. तेवढाच काय तो स्पर्श . स्वतःला सांभाळून ती परत स्थिर झाली. कंपनीतलं काम साडेपाच पर्यंत चालू होतं. मग  बऱ्यापैकी मोठी ऑर्डर घेऊन म्ही बाहेर पडलो. परत रिक्षा पकडताना ती म्हणाली,  " मी घरी जात्ये. " आणि आलेल्या रिक्षात बसून गेलीही. मी दुसरी रिक्षा पकडून तिच्या रिक्षाचा पाठलाग केला. आज ती बोरिवली स्टेशनलाच गेली. 
                                                तिने जी गाडी पकडली तीच मी पण पकडली. संध्याकाळचे सात वाजत होते. मी मुद्दामच लेडीज कंपार्टमेंटला
लागून असलेल्या डब्यात बसलो. मधल्या जाळीतून ती दिसत होती. जवळ जवळ पाऊण तासाने ती माहीमला उतरली . गर्दी वाढलेली असली तरी मी तिचा ट्रॅक सोडला नाही. अगदी ऐन वेळेवर उतरायला गेल्याने सहप्रवाशांच्या  शिव्यांचा मी धनी झालो. पण मला आता  कशाचीच पर्वा 
नव्हती.ती झपाझप चालत होती. तशी मला माहीमची फारशी माहिती नव्हती. माहीम दर्ग्याच्या रस्त्याने ती निघाली. रात्रीच्या वेळेला दर्गा दिव्यांच्या सजावटीमुळे चमकत होता. मध्येच पावसाला सुरुवात झाली. माझ्याकडे छत्री नव्हती. कदाचीत तिच्याकडेही नसावी. तसंच झालं.
मला वाटलं ती टॅक्सी करील. पण तसं झालं नाही तीही भिजत  जात होती. याचा अर्थ ती जवळ राहत असावी. पण ती थोडी लांब राहत होती. 
वीस बावीस मिनिटे चालल्यानंतर तिचा चालण्याचा वेग कमी झाला. आता तिच्या आणि माझ्या मध्ये  दहा एक फुटांचं अंतर होतं. ती अधून मधून भिजलेल्या केसांवरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवीत होती. आज तिची साडी काळसर रंगाची होती. रस्त्यावरचे लाइट फार पॉवरफुल नव्हते. का कोण जाणे तिचा दगडाचा मुखवटा सरकल्यासारखा मला दिसला. मला आता ती नॉर्मल स्त्री दिसू लागली. म्हणजे ऑफिससाठी ती मुखवटा घालते तर. लगेच माझ्या मनाने विचार माडला. याचा अर्थ मला सगळं समजलं आणि दिसलं असं मानण्याचं कारण नाही. मन मला नाउमेद करू पाहत होत. मला वाटतं प्रत्येकाच मनच त्याचा वैरी असतं. इतर वैरी परवडले. मनापासून काही लपवता येत नाही. ती आता एका वळवणावर आली. मी पटकन चेहरा वळवला. तिने मागे वळून पाहिलं असावं पण त्यात शोध घेण्याचा प्रयत्न नसावा . ते नैसर्गिक होतं. अचानक  वळल्यावर माझ्यासमोर एक पाच मजली चाळवजा इमारत आली. तिथे वॉचमन नव्हता. काही वृद्ध माणसं  खाली बसलेली दिसली. मीही आत 
सहज म्हणून शिरलो. पण त्यांनी माझी दखल घेतली. नाही. आता मला जिन्यावरून ती कोणत्या मजल्यावर जाते पाहणं गरजेचं होतं. मी थोडा
थांबलो. ती जवळ जवळ घाईघाईने जिने चढताना दिसली. खालून मला ती तिसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीची बेल दाबताना दिसली. मीही जवळ जवळ धावतच तिथे पोहोचलो. पण तोपर्यंत त्या खोलीचा दरवाजा बंद झालेला होता. सगळ्याच दरवाज्यांचं बाहेरचं डिझाइन सारखं असल्याने मला नक्की खोली कोणती ते ओळखता येईना. बाहेरच्या कॉरिडोरसारख्या भागात लहान मुलं खेळत होती. पण मी जिन्याच्या सर्वात 
वरच्या पायरीवर उभा  असल्याने कोणालाही दिसत नव्हतो. बाजूचे काही दरवाजे अर्धवट उघडे होते. काही बंद होते.  तिची खोली जिन्या जवळ असलेल्या खोलीच्या बाजूची असावी.  विचारण्यात अर्थच नव्हता. खालून पाह्णं वेगळं आणि जवळ जाऊन पाह्णं वेगळं. मला नक्की आठवेना. मग सहज म्हणून पाहिलं तर ज्या  खोलीत ती असावी असं वाटत होतं. तिचं बाहेर लटकवलेलं कुलूप थोडं हालताना दिसत होतं. म्हणजे हीच तिची खोली असावी . तेवढ्यात एक मुलगा , ज्याने मला पाहिलं असावं धावत आला आणि म्हणाला, " कोण पाहिजे काका ? प्रतिभा काकू का ? ' त्याने त्याच खोलीकडे बोट करीत विचारले. पण मी " म्हंटले, नाही रे मला  चाळक्यांकडे जायचंय. "   त्यावर तो म्हणाला, " पण आमच्या इथे चाळके राहत नाहीत. "   मी असू दे. म्हंटलं आणी  धडाधड पावलं उचलीत निघालो. कसा तरी  आणि धावतच मुख्य गेटच्या बाहेर आलो. मी वळून पाहिलं. प्रतिभाच्या खोलीचं दार उघडं होतं. आणि ती  बाहेर येत होती. मग मात्र मी पटकएका टॅक्सीला हात केला आणि आत घाईघाईने बसलो. ड्रायव्हर मुसलमान  होता. तो म्हणाला, " जनाब आरामसे बैठिये, मै कही भागा नही जा राहा हूं. " मी काहीही बोललो नाही. त्याला काय माहीत मला कोणाच्या  दृष्टिक्षेपातून बाहेर जायचं आहे. लवकरच माहीम स्टेशनला पोहोचलो.........


                                                                                                                                    (क्र म शः   भाग ४)