साबुदाण्याच्या खिचडीपासून घरातल्यांनी माझा चांगलाच धसका घेतला होता. अगदी चहा जरी करायचा म्हटलं तरी साबा माझ्या मागेच असायच्या. अगदी गॅस पेटवताना लाईटर घे इथपासून कॅसेट सुरू करायच्या. आपण नैका नवीन मांजर पाळल्यावर त्याने कुठे तोंड घालू नये म्हणून त्याच्या सारखं मागे मागे करतो तसं करायच्या.
इतरवेळी कुठल्याही कारणाने एकमेकांच्या अंगावर गुरगुरणारे सगळे मी काही करणार म्हणाले की एकत्र होऊन नाही म्हणायचे.
आज्जीबाई तर मला एवढ्या वचकून होत्या जेवढ्या त्या त्यांच्या साबांनापण नसतील. मी दिसले की म्हणायच्या मला अज्जीबात भूक नाही गं सुने. आज मी सकाळचंच काहीतरी खाईन असेलतर, नाहीतर कपभर दूध घेईन.
लग्न झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी आम्ही पुण्याला परतलो. ४ रूम्सच्या फ्लॅटमध्ये अगदी दोघेच नको म्हणून साबांनी लहान दिराला सोबत पाठवलेले. आता ती सोबत की माझ्यावर पाळत हे सांगणे नलगे.
प्री आणि पोस्ट मॅरेज केळवणांमुळे पोटाची वाट लागलीच होती त्यातून भर म्हणजे माझा स्वयंपाक. नवरा तर पुण्यात आल्याआल्याच म्हणाला की मेसच्या काकूंना एक वाढीव डबा सांगायचा का?
हा अपमान मला जिव्हारी लागला आणि मी पाककलेची जेवढी म्हणून मिळतील तेवढी सगळी पुस्तके नवऱ्यालाच आणायला सांगितली. नवऱ्याच्या इंजिनियरिंच्या पुस्तकांच्या रांगेत ती पण विराजमान झाली. टॉमशेजारी संजीव कपुर दात दाखवायला लागला. निलेश लिमये आणि मंगला बर्वेंना डिझाइन ऑफ मशीन्सशेजारी स्थान मिळाले.
कधीनव्हे ती आमची स्टडी पूर्ण पुस्तकांनी भरून गेली.
नमनालाच पाळीभर तेल झालं का?? तर कथा सुरू करते आता.
संकट आली की कशी जोडीने हातात हात घालून येतात नै?? सगळ्या मैत्रिणीमध्ये माझंच घर मोठं आणि अधिक लोकसंख्या नसलेलं (सासरची मंडळी वाढली की कुटुंबाची जनता होते हे माझ्या जवळच्या मैत्रिणीचं मत, माझं नाही बरका). एका मैत्रिणीला केळवण माझ्याच घरी करायचं ठरलं तोपर्यंत त्यांच्यापर्यंत माझ्या स्वयंपाक कलेची कीर्ती पोहचली नव्हती म्हणून बहुदा हा मान मला मिळाला असावा हे नौरोजींच मत.
केळवणच करते आहेस तर डझनभर केळीच दे, उगाच लग्नाआधी तिच्या पोटावर कशाला अन्याय? अस शालजोडीतून मारायला तो विसरला नाही
तर सगळ्यांना जमणारा आणि सुट्टीचा दिवस म्हणून चतुर्थीला सगळ्यांनी जमायचं ठरलं. आता उपवास म्हणजे काहीतरी साबुदाण्याचंच करणं आलं आणि साबुदाणा म्हणाला की मला किंबहुना, नवऱ्याला धडकी भरते व अचानकच त्याच्या पोटात तरी दुखायला लागत किंवा मित्राकडे जेवायचं आमंत्रण तरी येत.
खूप विचारांती मी साबुदाणा वडा करायचं ठरवलं (ठरवलं कसलं मला त्यातल्या त्यात तेच जमेल अस वाटलं म्हणून).
आईसाहेबांना लगेचच फोन केला व कृती लिहून घेतली. आईने सांगीतल्याप्रमाणे माझ्या सहा मैत्रिणी आणि आम्ही घरातले ३ अधिक वाढीव दोन अश्या सगळ्यांना मिळून एक किलोचे वडे पुरणार होते.
मी दोन दिवस आधीच तयारीला लागले. साहित्यामध्ये साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे प्रत्येकी एक किलो, मिरची कोथिंबीर, जिरे, थोडंसं आलं मीठ साखर आणि तेल आवश्यकतेनुसार सगळं आणून ठेवलं. लग्नाला महिनासुद्धा न झाल्याने घरात वाणसामानाची गरजेनुसार साठवण होती (तसं नव्हतीच म्हणायला हरकत नाही कारण बऱ्याचदा नवरा उदार अंत:करणाने बाहेरच जेवायला न्यायचा) आणि फ्रीज तत्सम गोष्टी ठेवण्याची गरज भासली नव्हती, म्हणून ओल्या फडक्यात मिरची कोथिंबीर गुंडाळून ठेवली. कुणीतरी लग्नात गिफ्ट दिलेला मिक्सर आता उपयोगी आला. दाणे भाजून कूट करून ठेवला. सगळी प्राथमिक तयारी करून ठेवली.
अखेर तो सुदिन उगवला. भल्या पहाटे उठून यावेळी न विसरता साबुदाणा भिजत टाकला हो नाहीतर लिबलिबीत/टणक/कडक वडेच खायला लागले असते मागच्या वेळेसारखे. मिरची कोथिंबीर वाटून ठेवली. सगळ्या मैत्रिणींना आठवण करून दिली उपवासाची आणि माझ्याकडे भेटण्याची परत एकदा. कस असत ना, खायला बोलवायचं आणि आठवणही आपणच करून द्यायची. मुलाचं बरं असत खायला संध्याकाळी बोलावलं की सकाळीच हजर होतात.
एवढ्या अथक परिश्रमानंतर एक डुलकी काढू म्हणाला तर अगदी ऐनवेळी जिला केळवण होत तिचा फोन आला की काही कारणास्तव तिला यायला जमणार नव्हत. तिच्या सासरचे कुणी काका-मामा तिला पाहायला आलेले गावाकडून आणि तिने असं संध्याकाळी बाहेर जाण चांगलं दिसलं नसत म्हणून ती येणार नव्हती. आता ज्याला करायचंय त्याने गळ्यात धोंडा बांधल्यावर बाकीच्यांनी कशाला मिरच्या ओवाळायच्या हे काय मला कळलं नाही पण मला विचारतोय कोण ना??
दिवसा डोळ्यांसमोर तारे चमकले माझ्या. डोळे चोळून परत एकदा फोनकडे बघितलं, चिमटा काढला स्वतःला पण ते खरं होत. परीक्षेची तयारी करावी व ऐनवेळी पेपर कॅन्सल व्हावा तसं झालं माझं.
तोपर्यंत मी बटाटे उकडून कुस्करून ठेवले होते. अर्थात ही बातमी (मैत्रीण न येण्याची) बाकीच्यापर्यंत पोहचली होती. मग कुणाच्या मुलाला ताप आला, कुणाची सासूच अचानक आली, कुणाच्या नवऱ्याला अॅक्सिडेंट झाला (गाडीच साईडस्टँड जरी पायाला लागला तरी त्याला अॅक्सिडेंट म्हणायची पुण्यात पद्धत आहे) म्हणून चौघी गळाल्या. मग आता येणाऱ्या मैत्रिणी एक आम्ही घरचे तीन व वाढीव दोन. आता हे वाढीव दोन कोण हे मलासुद्धा खरंतर माहीत नव्हत पण नेहमी काही करताना थोडं वाढीव करावं अस आईने शिकवलेलं. तर ह्या समस्त सहा लोकांसाठी मी साबुदाणा वडा करणार होते.
बाकीच सगळं कॅन्सल झालं तरी भिजवलेला साबुदाणा डब्यात आणि उकडलेला बटाटा काही टोपलीत जाऊन बसणार नव्हता. हिस्टरी रिपीटस प्रमाणे परत एकदा या स्वयंपाकाच्या गडावर मी धारातीर्थी पडले होते. शेवटी संध्याकाळी हेच जेवण करू अस ठरवून मी ते सगळं पीठ एकत्र केलं. आता तो गोळा काही केल्या ताटात मावेना म्हणून त्यातल्या त्यात मोठ्या पातेल्यात घेतला. आता तर दोन्ही हातांनी सुद्धा मळता येईना एवढा तो फुगला. कसाबसा कोंबून कोंबून बसवला पातेल्यात. हाताच्या प्रत्येक हालचालीबरोबर मैत्रिणींना शिव्या देऊन झाल्या.
शेवटी संध्याकाळी ६ वाजता मी वडे करायला सुरवात केली. गरमा गरम चार चार वडे नवरा व दिराला खायला दिल्यावर कधी नव्हे ती त्यांनीही माझी तारीफ केली. तोपर्यंत स्वयंपाकघरातला गोळा त्यांनी पाहिला नव्हता. खूप आग्रह करून करून मी त्यांना खायला घालत होते. कामावरून आल्यावर चहाही न विचारणारी आपली पत्नी एकदम पतिव्रता कशी काय झाली हे आश्चर्य नवऱ्याच्या तोंडावर मावत नव्हते.
दिराला या सरबराईमध्ये माझा काय गनिमी कावा आहे का अशी शंका आलेली पाहिली मी कारण तो अगदी बारीक डोळे करून एकदा माझ्याकडे व एकदा वड्यांकडे बघत होता व नंतर तोंडात घास घेत होता.
मग माझी मैत्रीण उगवली. तिनेही पोट ठीक नसल्याचा बहाणा करून दोनच वडे खाल्ले. तरी मी तिच्याबरोबर १०-१२ वडे बांधून दिले मुलांसाठी व नवऱ्यासाठी (माझ्याच एकट्या नवऱ्याचे का हाल?? ). मग शेजारच्या काकूंना गरम गरम ४ वडे डीश मध्ये घालून दिले. आणि त्या वाढीव पाहुण्यांची वाट पाहू लागले. इतरवेळी काय, कसं करून डोकावणारे कुणीही आज फिरकत नव्हते.
आज अगदी कुरियरवाला, पोस्टमन, कुरड्यापापड विकणारे, सेल्सगर्ल कुणीही चाललं असत पण ही बाईच खडूस अशी माझी ओळख बहुदा शेजाऱ्यांनी करून दिली असणार किंवा त्यांची कुणाचीही चतुर्थी नसणार म्हणून कुणी डोकावत नव्हते. अगदी शेजारी यायचे पण माझ्यादारी ढुंकूनही बघायचे नाहीत. बाहेर येऊन मी चुकून कुलूप तर लावल्यासारखं दिसत नाही ना घराला याची खात्री पण केली.
एरवी नवऱ्याचे कुणी मित्र आले की नाक मुरडणारी मी त्याला आग्रहाने सांगितलं की अरे बोलाव तुझ्या मित्रांना बरेच दिवसात कुणी फिरकलं नाही. त्यांनाही साबुदाणे वडे खूप आवडतात ना? (फुकटचे बाजीराव मेले. येतात आणि कचरा करून जातात. माझं घर काय धर्मशाळा वाटते का यांना अस नवऱ्याच्या कानात चारवेळा ओरडून झाल्यावर आता कुठे यायचे बंद झाले आणि काय ही वेळ आणली देवाने माझ्यावर आज परत त्यांनाच बोलवावं लागतंय) नवरा परत एकदा संभ्रमात. हिला झालंय तरी काय म्हणून. त्यांनाही बोलावलं त्यांनीही तारीफ करून करून वडे खाल्ले. पण गोळ्याच आकारमान फक्त इंचा इंचाने कमी होत होत.
मित्र झाले, घरचे झाले, शेजारी पाजारी अगदी पॅसेजमध्ये खेळणाऱ्या सोसायटीतल्या लहान मुलीपण झाल्या पण एवढं सगळं करूनसुद्धा गोळ्याचा निम्माभाग पण संपला नव्हता. आता मला खरंच खूप धास्ती वाटायला लागली काय करायचं काय याच??
आईला फोनून विचारलं आता काय करू एवढ्या मोठ्या गोळ्याच? तर तिने डोक्यावर हात मारलेला मला इथं बसून दिसला कारण तिच पुढचं वाक्य ऐकून मी पिठाचा हात डोक्यावर मारल्याने केसात एक काय अनेक रुपेरी छटा आल्या होत्या. आईने सांगितलेल्या सगळं मिश्रण मिळून एक किलोचा अर्थ मी प्रत्येक पदार्थ एक किलो असा घेतला होता.
शेवटी रात्री दहा वाजता मी शेजाऱ्यांची बेल वाजवली व काकूंना अगदी प्रेमाने विचारले की माझा एक पदार्थ तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवाल का??
काकू खरंतर मनातून शिव्याच देत असाव्यात पण चेहऱ्यावर हसू आणून म्हणाल्या, "अग आण की त्यात काय मोठंसं?? "
पण माझ्या हातातलं मोठंसं पातेलं पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याची जागा काळजीने घेतली. कारण माझं हे पातेलं ठेवायला त्यांना त्यांचे बरेचसे पदार्थ बाहेर ठेवावे लागणार होते.
दुसऱ्या दिवशी पुन्हा नाश्त्याला साबुदाण्याच थालीपीठ, दुपारी जेवणात वडे, डब्यात वडे, संध्याकाळी आल्यावर परत वडे. वडेच वडे नुसते. जिला केळवण होत तिला सुद्धा दुसऱ्या दिवशी डब्यातून साबुदाणा वडा खायला घातला.
तीन दिवस आम्ही नुसतं वडे, थालीपीठ - थालीपीठ, वडे आलटून पालटून खात होतो. शेजारच्या काकूंना शेजारधर्म अगदी सचोटीने पाळायची संधी देत होतो. मात्र दिवसागणिक पातेल्याचा आकार कमी होत होता तसं त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य पूर्ववत होत होतं. आणि माझ्याबद्दलच्या कौतुकाची जागा नवऱ्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या साबुदाण्यांनी आपलं शिव्यांनी घेतली होती
त्या दोन दिवसात जे कुणी पाहुणे माझ्या घरी आले त्यांची नाव सुद्धा आता आठवत नाहीत पण त्यांना दिलेल्या वड्यांची संख्या मात्र चांगली आठवतेय. सगळं घर नुसतं वडामय झालेलं.
नवऱ्याने मला धमकीच दिली पुढचे काही वर्ष साबुदाणा वड्याच नाव सुद्धा काढायचं नाही. मित्रांनी, शेजाऱ्यांनी आम्हाला वाळीतच टाकलं होत, चुकून घरी गेलं तर मी त्यांना साबुदाणा वडा खायला घालीन म्हणून.
शेजारच्या काकूंनी मला सोसायटीच्या भिशीगृपमध्ये सामील करून लगेच नंबर पण दिला आणि नवीन फ्रीज आणायला लावला.
आता कुणी पाहुणे येणार असतील तर नवरा हापिसातून येतानाच खायला घेऊन येतो किंवा आम्ही सगळेच बाहेर जातो जेवायला.