रस्ते

दुचाकी चालवायला शिकलो त्याला आता चव्वेचाळीस वर्षे झाली नि चारचाकी शिकलो त्याला त्रेचाळीस. दुचाकी शिकल्यावर पाचेक वर्षांतच मी लांबच्या मजला मारायला सुरुवात केली. पण चारचाकी चालवत लांबचा प्रवास करायला त्यापुढे सातेक वर्षे गेली. या सर्व प्रवासांत जाणवलेल्या नि अनुभवलेल्या गोष्टींची ही नोंद.

हे लेखन आत्मकथन/आत्मचरित्र याकडे संपूर्णतया झुकलेले आहे याची नोंद घ्यावी. यातील तथ्य नि सत्य हे 'माझे' तथ्य नि सत्य आहे. कुणास अजून दुसरे तथ्य नि सत्य माहीत असेल तर त्यास कुरवाळीत चडफडत/तणतणत बसावे.


दुचाकी चालवताना अनुभवलेले रस्ते:

दुचाकी चालवीत लांबचा प्रवास करताना जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे महामार्गावरील वाहनांच्या एकूण सामाजिक उतरंडीत  दुचाकी चालवणाऱ्यांचे स्थान सर्वात तळाचे. गांवात/शहरात असलेले सायकलस्वार नि पादचारी या शेवटल्या दोन पायऱ्या महामार्गावर गळून पडतात.

इथे 'महामार्ग' हा शब्द अत्यंत उदारपणे वापरला आहे याची नोंद घ्यावी. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा या अर्थी महामार्ग. यात मुंबई-बंगलोर वा मुंबई-आग्रा याबरोबरच मुंबई-गोवा, मिरज-कोल्हापूर, महाड-पंढरपूर, खेड-दाभोळ, चिपळूण-गुहागर, देवधे-पुनस हेही मोजले आहेत. सोयीसाठी त्यांना मोठे महामार्ग, मध्यम महामार्ग नि छोटे महामार्ग म्हणू.

तर महामार्गावर दुचाकीचालकांच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड म्हणजे अवजड वाहने - ट्रक नि बसेस. त्यात बहुतांशी (सुमारे नव्वद टक्के) ट्रक.

मोठ्या महामार्गावर ओव्हरटेक करण्यासाठी साईड न देणे, मध्यम/छोट्या महामार्गांवर मध्यपट्टी धरून ठेवणे (जेणेकरून समोरून येणाऱ्या दुचाकीचालकाला रस्ता सोडून खाली उतरावे लागेल; विशेषतः पावसाळ्यात असे केल्याने अवजड वाहने चालवायला एक वेगळीच मौज येते), मध्यम/छोट्या महामार्गांवर वळण घेताना कबड्डी खेळल्याच्या थाटात शत्रूपक्षाच्या हद्दीत शक्य तेवढी घुसखोरी करणे इ गोष्टी जोवर नीट जमत नाहीत तोवर ट्रक चालवण्याचा परवाना मिळत नसे बहुधा.

पण या ट्रकचालकांची त्यात फारशी चूक नसे. चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंत भारतात ट्रक म्हणजे बहुतांशी टाटा किंवा लेलॅंड. जरी मित्सुबिशी (आयशर मित्सुबिशी), टोयोटा (डीसीएम टोयोटा), इसुझू (हिंदुस्तान इसुझू) आणि निस्सान (ऑल्विन निस्सान) यांनी ऐंशीच्या दशकात भारतीय बाजारात शिरायचा प्रयत्न केला तरी तो फारसा यशस्वी झाला नाही.

टाटा नि लेलॅंड या दोन्ही ब्रॅंडमध्ये एक गोष्ट समान होती - कालबाह्य तंत्रज्ञान.

पॉवर स्टिअरिंग, पॉवर ब्रेक्स, कूलन्ट या आणि अशा गोष्टी कल्पनातीत होत्या.

स्टिअरिंग हाताळण्यासाठी अत्यंत मजबूत बाहू लागत.

ब्रेक दाबल्यावर कडांव कडांव करीत गाडी किती फूट पुढे जाईल नि थांबेल याचा अंदाज घेणे अत्यंत कौशल्याचे काम होते. पण ही फारशी मोठी अडचण नव्हती. कारण गाडी ताशी पन्नास किमीपेक्षा जास्ती वेगाने जाणे ही वर्षातून एखादवेळी घडणारी गोष्ट होती.

रेडिएटर मध्ये फक्त पाणीच असल्याने घाटरस्त्याच्या पायथ्याला थांबून रेडिएटर टॉप-अप करावा लागे. आणि तरीही आंबेनळीसारखा वा कोयनानगरसारखा घाट असेल तर घाटात मध्ये थांबूनही पाणी भरावे लागे. सुमारे पंचवीस मैल (चाळीस किमी) लांबीचा आंबेनळी घाट तर एस्टी ड्रायव्हर लोकांच्या भाषेत 'रडतोंडीचा घाट' होता - ऱ्यांव ऱ्यांव करीत तो घाट पार करताना ड्रायव्हर रडकुंडीला येई.

इंजिनची ताकद हास्यास्पद होती. आज रस्त्यावर असलेल्या टाटा नेक्सॉन या छोट्या/मध्यम चारचाकी गाडीची ताकद १२० बीएचपी आहे. त्याकाळच्या लेलॅंड ट्रकची ताकद ११५ बीएचपी होती.

असल्या फुटकळ ताकदीमुळे या गाड्या चालवताना एका गिअरमध्ये इंजिनला पार पिळून काढल्याखेरीज पुढला गिअर घालण्याची घाई करणे धोक्याचे होते. आणि टॉप गिअरला गाडी चाळीस-पन्नासच्या स्पीडला पोहोचली की ऍक्सिलरेटरवरचा पाय शक्यतो न काढता तीच गती राखून ठेवणे हे प्रत्येक ड्रायव्हरचे उद्दिष्ट असे. चुकून ऍक्सिलरेटरवरचा पाय काढावा लागला तर परत खालचा/खालचे गिअर घालीत इंजिन टॉर्क मिळवावा लागे. गाडी चाळीस-पन्नासच्या एकसमान गतीने चालणे याला ड्रायव्हर जार्गनमध्ये 'गाडीने मोशन (अपभ्रंश 'मोसम') पकडणे' म्हटले जाई. आणि ऍक्सिलरेटरवरचा पाय काढणे म्हणजे 'मोशन तुटणे'. ही मोशन तुटायला कारणीभूत जे कुणी होईल त्याला कुठेतरी कसातरी धडा शिकवणे हे ड्रायव्हर-क्लीनर जोडीचे धर्मकार्य असे.

खंबाटकीच्या घाटमाथ्यावर एकदा मोशन तोडण्याच्या आरोपावरून दोन ट्रकड्रायव्हरची मारामारी चाललेली मी पाहिली आहे. अशा मारामाऱ्यांत टॉमी आणि जॅक या विदेशी नावांची हत्यारे वापरली जात.

ड्रायव्हरची कॅबिन मरणाची गरम होई. ट्रकची एअर कंडिशन्ड कॅबिन ही कल्पना सुचण्याची कल्पनाही कुणाला सुचणे शक्य नव्हते. त्या गरम कॅबिनमध्ये सतत राहून ड्रायव्हर नि क्लीनर मंडळींना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागे.

रोडसाईड असिस्टन्स हा शब्दही ऐकिवात नव्हता. ड्रायव्हर नि क्लीनर जोडीने सगळे काही पहाणे/करणे अपेक्षित होते. पंक्चर झालेले चाक बदलणे हे पाऊण ते एक तास घाम गाळण्याचे काम होते. त्याहून मोठे काही असले तर गॅरेजवाला शोधणे.

क्लीनर ही जमात अति-पददलित होती. ड्रायव्हरमंडळींचे गुलाम असा त्यांच्या कामाचा दर्जा असे. आयुष्यात पुढे ड्रायव्हर होणे हे ध्येय असलेले विशीचे तरुण या जागांवर कब्जा करून असत. दहा एक वर्षे ही वेठबिगारी केली की मग ड्रायव्हर होता येई.

अशा एकंदर परिस्थितीत आयुष्य काढल्याने ड्रायव्हर मंडळी फारच कडवट झालेली असत. ट्रक चालवणे हे बंदूक चालवणे वा तलवार चालवणे याला समानार्थी होते. मार्गावरील इतर वाहने म्हणजे खानदानी शत्रू या एकाच भावनेने ड्रायव्हिंग केले जाई. त्यात इतर वाहने जर छोटी असतील तर त्यांची जमेल तितकी दडपणूक करणे हे डार्विनच्या तत्वाला धरूनच होते. छोटे वाहन म्हणजे दुचाकी असेल तर तिकडे लक्ष देणे हेही अपमानास्पद मानले जाई. दुचाकीने उभय दिशांनी आपल्याला ओलांडताना आपापला जीव आपापल्या मुठीत धरावा अशी पद्धत होती.

सातारा, सांगली नि कोल्हापूर जिल्ह्यांत अवजड वाहनांहून मोठी धोंड म्हणजे ऊसवाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉल्या आणि (पूर्वी) बैलगाड्या. जंगली कुत्र्यांप्रमाणे हे कळप करून असत. आणि एका कळपात कमीतकमी वीस ट्रॅक्टर-ट्रॉल्या वा बैलगाड्या असत. हे सर्व समूहभावनेने इतके प्रेरित असत की दोन वाहनांच्या मध्ये तीन फुटांपेक्षा जास्ती अंतर राहणार नाही याची सदैव काळजी घेत. थोडक्यात, यांना ओलांडून जाण्यासाठी साहस आणि नशीब दोन्हींची खंबीर साथ लागे.

एकदा कोल्हापूरहून स्कूटरने येताना उंब्रज ओलांडले नि असल्या एका टोळक्याच्या मागे अडकलो. पंचवीस-तीस बैलगाड्या होत्या. त्या रस्त्यावर पुढे मोठा साखर कारखाना म्हणजे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना. सुमारे पंचवीस किमी.

ताशी सहा-सात किमी वेगाने चाललेले ते प्रकरण चारपाच तासांनी कारखान्यात पोहोचू म्हणून निवांत होते. मला पुण्यात पोहोचून कॉलेजमध्ये केमिस्ट्री प्रॅक्टिकलला हजेरी लावायची होती.

दोन बैलगाड्यांच्या मध्ये एक स्कूटर मावण्याइतकी जागा अर्थातच नव्हती. ओव्हरटेक करायचा झाला तर एकदम सगळ्या पंचवीस-तीस बैलगाड्या, नाहीतर काही नाही. तेव्हा रस्ताही एकच होता (डिव्हायडर नव्हता). एकदीड किमी असे गेल्यावर मी वैतागलो. पण करणार काय? उजवीकडून ओव्हरटेक करण्याचा आत्मघातकीपणा करण्याइतका आयुष्याला वैतागलो नव्हतो. शेवटी घायकुतीला येऊन रस्त्याच्या डावीकडे दीडदोन फुटांची जी मातीची पट्टी होती (साईड स्ट्रिप) तिच्यावरून स्कूटर हाणली. लिंबू ते न सोललेला नारळ एवढ्या आकाराचे दगडधोंडे होते. त्यातून धडपडत वाट काढीत मी सुरुवातीच्या बैलगाडीजवळ पोहोचण्याच्या बेतात होतो तोच... कुणीतरी माझ्या मार्गात आडवा, मुख्य रस्त्याला टेकलेला असा, चर खोदून ठेवला होता. मुकाट थांबलो. सगळ्या बैलगाड्या संथपणे मला ओव्हरटेक करून गेल्यावर परत मुख्य रस्त्याला लागलो. बैलगाडी चालवणारे मला कुत्सितपणे हसून खिजवतील असे वाटले होते. पण त्यांनी तसे केले नाही. सगळे चालक मागे उसाच्या मोळ्यांवर तोंडावर टॉवेल टाकून झोपले होते. बैल ऑटोपायलटवर चालले होते.

एकच चांगली गोष्ट म्हणजे ऊस हे बारमाही पीक असले तरी साखर कारखाने बारमाही नाहीत.

परत मोठ्या वाहनांकडे - ट्रक्स नि बसेस.

तेव्हा टाटा नि लेलॅंडचे सहाचाकी ट्रक हेच सगळीकडे होते. दहाचाकी ट्रक एखादा दिसे - सठीसहामाशी. कंटेनर भारतातल्या रस्त्यांवर अवतरले नव्हते. त्यामुळे एकदा ट्रकच्या वेगाचा अंदाज आला की ओव्हरटेक करणे जमण्यासारखे होते. मध्यम नि छोट्या महामार्गांवर समोरून ट्रक येताना दिसला की मुकाट रस्ता सोडून मातीपट्टीत उतरून थांबणे हे इष्ट होते. अन्यथा आपण डांबरी रस्त्याची डावी कड प्राणपणाने धरून ठेवली तरी समोरून येणारा खवीस आपल्या अंगावर येण्याची (हूल देण्याची) दाट शक्यता असे. त्यावेळेस घाईघाईने मातीपट्टीत उतरण्याची वेळ आली तर घसरून पडण्याची शक्यताही तेवढीच दाट असे.

बसेसचे साधारण तीन प्रकार - एस्टी (महाराष्ट्र राज्य) बसेस, परराज्यांतल्या बसेस (बहुतेक कर्नाटक वा आंध्र) आणि खाजगी बसेस. पुणे कोल्हापूर प्रवासात हे गुणोत्तर साधारण सात-दोन-एक असे. मुळात तीस वर्षांपूर्वीपर्यंत दिवसा उजेडी खाजगी बसेस अशा फारशा नव्हत्या. व्हिडीओ कोच असत पण ते सगळे रात्री.

कर्नाटक राज्यांतल्या बसेस आपल्या बसेससारख्याच दिसत, फक्त त्यांचे ड्रायव्हर जपानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले असत - कामिकाझे युनिटमधून. पुण्याच्या सिटीपोस्ट चौकातून वा कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरून रिक्षावाल्याने डावीकडे एक इंचावर हातगाडी आणि उजवीकडे दोन इंचावर दुसरी रिक्षा यातून वाट काढत ऍक्सिलरेटर पिळावा तशा थाटात हे कर्नाटकी ड्रायव्हर गाड्या चालवीत. पुणे कोल्हापूर एस्टी प्रवासाला सहा तास लागण्याचे ते दिवस. साडेपाच तासांत बस पोहोचली तर त्यातले प्रवासी पुढले दोनतीन दिवस तो चमत्कार वर्णन करून इतरांना काव आणीत. पाच तासांत पोहोचलो असे सांगणाऱ्यावर कुणी विश्वास ठेवीत नसे. कात्रज बायपास नि खंबाटकीचा बोगदा तेव्हा झालेले नव्हते. बहुतेक बसेस साताऱ्याला नि कराडला गांवात शिरत.

त्या दिवसांत एकदा मी कोल्हापुरातून गदग-मुंबई बस पकडली. पेठनाका, कराड, उंब्रज, सातारा (आतमध्ये), भुईंज, सुरूर, खंडाळा (पारगांव) आणि शिरवळ एवढे थांबे घेऊनही पुण्याला सव्वाचार तासांत पोहोचलो. हे सर्व करताना त्या ड्रायव्हरने निर्विकारपणे सात पनामा सिगरेटीही फस्त केल्या.

बसमध्ये धूम्रपानाला बंदी राज्यवार असण्याचे ते दिवस. महाराष्ट्र एस्टीत बंदी होती, कर्नाटक बसेसमध्ये नव्हती. पंजाबमध्ये बंदी होती, हरयाणात नव्हती.

पंजाब-हरयाणाचा अनुभव मजेदार होता. मी लुधियाणा ते रोहतक बसमधून प्रवास करीत होतो. मला खरे तर जायचे होते दिल्लीपर्यंत, पण थेट बस मिळाली नाही. रोहतक ते दिल्ली दीडदोन तासांचेच अंतर, ते नंतर कापू म्हणून मी रोहतक बस पकडली. निवांत खिडकीत जागा मिळाली. बसमध्ये साधारण निम्मे पगडीधारी शीख. शीख धर्मात धूम्रपानाला सक्त मनाई आहे. शीख रहित मर्यादा (आचारसंहिता) यामध्ये 'कुरहित' (पाप) म्हणजे काय हे नीट वर्णिलेले आहे. त्यात एक पाप म्हणजे तंबाखूसेवन. त्यामुळे अस्सल ज्यू जसा अ-कोशर मांसाकडे पाहणेही पाप मानतो तसे सरदारजी म्हटला की त्याचा सिगरेट विरोध एकदम कडक. तसेही ते खलिस्तान चळवळ अद्याप मूळ धरून असलेले दिवस. सरदारजींना आडवे जाण्याची कुणाची शामत नसे. पण सुमारे निम्मे अंतर काटल्यावर बस हरियाणात शिरली आणि माझ्यापुढे बसलेल्या जाटाने मुंडाशातून विडीबंडल काढून विडी शिलगावली. आक्षेप घेणाऱ्या एका सरदारजीला त्याने "ये हर्याणा है" अशा तीनशब्दी चाबकाचा फटका देऊन गप्प केले. हा जाट चौधरी देवीलाल यांच्यासारखा उभा-आडवा होता. सरदारजी गप्प बसला.

रेल्वेत तर इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये डबे बांधतानाच त्यात ऍश-ट्रेची व्यवस्था केलेली असे.

मी ड्रायव्हरच्या पाठीला पाठ लावून जे बाक असते त्याच्या समोर, म्हणजे समोर रस्त्याकडे तोंड करून बसलो होतो. तेव्हा माझाही ब्रॅंड पनामा होता. कर्नाटकच्या बसमध्ये सिगरेट ओढलेली चालते असे ऐकले होते. अचानक सवयीचा वास (धूर) आला नि खात्री पटली. तो ड्रायव्हर जी जोसात गाडी हाणीत होता त्याने खूष होऊन मी त्याला एक सिगरेट देऊ केली. त्याने मला पुढे हौद्यात येण्याची खूण केली. मी देऊ करीत असलेली सिगरेट 'पनामा'च आहे बघितल्यावर त्याने त्याच्या मळकट शर्टाच्या खिशातून पनामाचे पाकीट काढून त्यातली एक मला देऊ केली आणि कानडीत काहीतरी बोलून तो खदाखदा हासला. तो पनामाचा दीर्घभक्त होता हे त्याच्या पिवळ्या पडलेल्या दातांवरून कळाले. त्याच्या उजव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांमध्ये तर हळद लावल्यासारखा पिवळा डाग होता.

एकमेकांची सिगरेट ओढताना मला अजून एक गंमत दिसली. मोशन तुटू नये, वेग खंडू नये म्हणून हा डायवर एक अफलातून युक्ती वापरत होता. बस लेलॅंडची होती. मॉडेल कॉमेट की चीता विसरलो. तिच्या ऍक्सिलरेटरची रचना अशी होती - चपलेचा तळ असावा तसे एक धातूचे पॅडल. सीसॉला जसा मध्यावर टेकू असतो तसा या पॅडलला मध्यावर दोन बाजूंनी टेकू. त्यामुळे ऍक्सिलरेटर दाबला की मागला भाग वर येई आणि पुढला भाग खाली जाई. एकदाचा गाडीने मनाजोगा वेग पकडला, इंजिनचा आवाज एकसुरी येऊ लागला, तेव्हा या ड्रायव्हरने त्याच्या खाकी तेलकट पॅंटच्या खिशातून एक लाकडी ठोकळा काढला (दोन पनामाची पाकिटे एकमेकांना चिकटवल्यासारखा त्याचा आकार होता) आणि ऍक्सिलरेटर पॅडलच्या मागच्या बाजूला सारला. आता ऍक्सिलरेटरवरचा दबाव कायम झाला. खूष होऊन त्याने उजवा पाय ताणून लांब केला नि केवळ स्टिअरिंगवर गाडी हाणणे चालू ठेवले. एकदा समोरून येणाऱ्या एक ट्रकला नि एकदा ओव्हरटेक करताना दुसऱ्या ट्रकला त्याने दोनेक इंचांवरून हुकवले. पण अतीतला बहुधा आठवडी बाजार होता. याने 'सुळे मगने' असे काहीसे बडबडत संपूर्ण अनिच्छेने तो ठोकळा पायानेच ढकलून मोकळा केला आणि 'ऑटो-ऍक्सिलरेटर मोड' मधून 'मॅन्युअल मोड'मध्ये गाडी आणली.

आपले नेहमीचे ओळखीचे गाव मध्यरात्री वा अतिपहाटे जसे वेगळेच भासते तसा नेहमीचा ओळखीचा कोल्हापूर रस्ता त्यादिवशी काही वेगळाच भासला.

या तुलनेत महाराष्ट्र राज्यातले एस्टी ड्रायव्हर बरेच शांत नि सौम्य असत. 'जोसात गाडी हाणणारा एस्टी ड्रायव्हर' या जमातीला कोंकण सोडून कुठे प्रतिष्ठा नसे. आणि कोंकणातही 'जोसात गाडी हाणणे' म्हणजे काय, तर इंजिनचा जास्तीतजास्ती आवाज करणे. कारण गाडी पळवायला कोंकणात शंभर मीटरसुद्धा सरळ रस्ता कुठे नाही. घाटावर रस्ते बऱ्यापैकी सरळ, पण कोंकणाच्या तुलनेत रहदारी खूप. त्यामुळे घाटावरचे ड्रायव्हर तंबाकूचा बार लावून नेमस्तपणे मार्गक्रमण करीत.

महामार्गावर दुचाकी चालवताना एस्टी ड्रायव्हर बहुतांशी वेळेला सभ्यपणे वागत. गाडी फूटभर बाजूला घेऊन दुचाकीला वाट करून देणे, रात्रीच्या वेळेला समोरून दुचाकी आल्यास डिपरचा डिमर करणे इथवर त्यांच्या सभ्यतेची मजल जाई. एकदा तर साखरी आगर - पालशेत रस्त्यावर मारुती मंदिरवाडीच्या वाकणावर एका एस्टी ड्रायव्हरने मला चक्क ओव्हरटेक करण्याचा सिग्नल दिला (खिडकीतून हात बाहेर काढून पुढे जाण्याची निःसंदिग्ध खूण) तेव्हा मला इतके भरून आले की ओव्हरटेक करायचे सोडून मी भावनातिरेकाने चालू (चालवीत असलेल्या) स्कूटरवरून खाली पडण्याच्या बेतात होतो.

महामार्गांवरच्या गावांतील गांवकरी आणि जनावरे हे एक वेगळेच प्रकरण असे. एकतर बायपास ही संकल्पना त्यावेळी जवळपास अस्तित्वातच नव्हती. गावांना जोडण्यासाठी रस्ते असतील तर ते गावातूनच जातील असा तर्कशुद्ध हिशेब होता. त्यामुळे प्रत्येक गावात शिरल्यावर वेग अतिमर्यादित होई. त्यात आठवडी बाजार वा शाळा-कॉलेज सुटायची वेळ असेल तर संपलेच. दुचाकीच्या हॉर्नला हे गांवकरी अजिबात दाद देत नसत. गांवातल्या रस्त्यांवरून हिंडणारे बैल, बकऱ्या आदि प्राणी तर त्याहून खमके. हॉर्नच्या आवाजाने भडकून एखादा मारकुटा बैल अंगावरही येई. बाजारातला एखादा मोळीवाला अचानक थांबे आणि/वा वळे. त्याच्या मोळीच्या फटक्याने डोके जायबंदी होणे शक्य असे.

त्यातली पंक्तिभेद असा की कोंकणातला गांवकरी बऱ्यापैकी भित्रा असे. हॉर्नचा आवाज ऐकला की तो तरातरा रस्त्याची कडसुद्धा ओलांडून साईडपट्टी गाठी. घाटावरचे गांवकरी टगे असत. स्कूटरवाला स्वतःच्या मनोरंजनासाठी हॉर्न वाजवीत असावा असे समजून ते त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत. हा भेद मला जाणवला एकदा चिपळूणहून वरंधा घाटाने पुण्याला येताना. कोंकणात स्कूटरच्या हॉर्नने रस्ता बऱ्यापैकी मोकळा करीत मी स्कूटर हाणीत होतो. घाट चढून साळव-निगुडघरला पोहोचलो आणि स्कूटरच्या हॉर्नची जादू संपली. भोरच्या बाजारात तर शेवटी दोनतीनदा मी हातगाडी चालवणाऱ्याच्या थाटात 'बाजू बाजू' असे ओरडलोही. परिणाम अर्थात शून्य झाला.

त्याकाळी महामार्गांवर येणारी एक मुख्य अडचण म्हणजे वाहन दुरुस्तीची सोय. मोठ्या महामार्गांवर तरी ठीक असे, पण मध्यम नि छोट्या महामार्गांवर सगळे अधांतरी असे. मी लांबचे प्रवास करण्यासाठी स्कूटर निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे पंक्चर होणे आणि कार्ब्युरेटर/प्लगमध्ये कचरा साठणे या दोन्ही अडचणींवर मी एकटा मात करू शकत होतो. मोटरसायकल आरामदायक होती हे खरे, पण पंक्चर झालीच तर काय या भीतीने मी लांबच्या प्रवासासाठी मी ती फारशी कधी वापरली नाही. दोनदा पुणे-मुंबई-पुणे, एकदा पुणे-रत्नागिरी-पुणे नि एकदा पुणे-गोवा-पुणे.

त्याकाळी महामार्गांवर असणारी एक मोठी सोय म्हणजे गावातल्या दुकानांवरच्या पाट्या. मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सगळ्या महामार्गांवर जितकी म्हणून गांवे असत त्या गांवातल्या दुकानांवरच्या पाट्यांवर त्या गावाचे पूर्ण नाव स्वच्छ शब्दांत लिहिलेले असे. कधी कधी गांवच्या नावापुढे त्या मार्गाचे नांवही दिलेले असे (पुनस, पावस-लांजा रोड). रात्री बेरात्री प्रवास करताना, विशेषतः एस्टीने, याचा फार फायदा होई. गाडी थांबल्याने डुलकीतून जाग आली आणि बाहेर गांव दिसले तर ते गांव कुठले आहे हे लगेच कळे. गेली वीसेक वर्षे ही प्रथा अख्ख्या महाराष्ट्रातून नाहीशी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वा तत्सम सरकारी कार्यालय असले तरच कळते. आंतरराज्य महामार्गांवर तर या पाट्या द्वैभाषिक/त्रैभाषिक असत. बंगलोर-मद्रास (बंगळुरु-चेन्नै) प्रवास रात्रीच्या बसने करताना मला मद्रास आले आणि आपण अड्यारमध्ये पोहोचलो हे पहाटे पाच वाजता एका पाटीवरूनच कळाले होते.

महामार्गांवरून एकट्याने स्कूटरने प्रवास करताना एक लहानसा धोका होता - 'लिफ्ट' मागणारे लोक. लहानसा कारण अशी जनता फार नसे, आणि अनोळखी माणसापेक्षा ओळखीच्या एस्टीवर जनतेचा भरंवसा नक्कीच जास्ती असे.

मी एकदाच फसलो होतो. खोपोली पेण रस्त्यावर गागोद्यापाशी एकाने स्कूटर थांबवायला हात केला. तेवढीच बिचाऱ्याला मदत म्हणून मी मानवतावादी दृष्टीकोनातून स्कूटर थांबवून त्याला घेतले. कदाचित विनोबा भाव्यांच्या भुताने मला झपाटले असेल, कारण एरवी मी बऱ्यापैकी जनसंपर्क टाळणारा आहे.

पस्तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. गागोदे पेण प्रवासाला जी वीस-पंचवीस मिनिटे लागली तो सर्व वेळ त्या महात्म्याने बडबडीत घालवली. मला एकटेपणाचा त्रास होत होता आणि त्या त्रासातून मला बाहेर काढण्याची जबाबदारी त्याच्यावर होती अशा हिरीरीने त्याने एकतर्फी संवाद चालू ठेवला. पहिल्यांदा मला वाटले की एकटा तरुण पाहिल्यावर 'यंदा कर्तव्य आहे काय' या शंकेपोटी ही प्रश्नावली असावी. पण नाही. मी माझे लग्न झाले आहे अशी थाप मारून ती वाट बंद करून टाकली. तर त्याने तो कुठे नोकरी करतो (खोपोलीतली कुठलीशी फार्मास्युटिकल कंपनी), कुठे चालला आहे (पेणला आतेबहिणीकडे), गागोद्याला का (तो आईकडून गागोद्याच्या भाव्यांपैकी), त्याचे शिक्षण (बीकॉम, खोपोलीच्या कॉलेजमधून), त्याचे मूळगांव (रेवदंडा) अशी आत्मचरित्राची पोथी जी उलगडली ती पेण गाठीपर्यंत संपली नाही. शेवटी पेणला पोहोचल्यावर कळाले की त्याला दातार आळीत जायचे आहे. मलाही दातार आळीतच जायचे होते, पण दातारआळी एवढीशी. तिथे त्याने मला बघितले तर आता त्याच्या वडिलांचे चरित्र सुरू करील या भीतीने मी त्याला चावडीनाक्यावर उतरवले नि बाजारपेठ गाठली. फडणिसांच्या दुकानात टिवल्याबावल्या करीत दोन तास काढले नि दातार आळीत पोहोचलो.

त्यानंतर परत कुणालाही कधीही लिफ्ट देण्याच्या भानगडीत पडलो नाही.

चारचाकी चालवताना अनुभवलेले रस्ते:

चारचाकीत डोक्यावर कायमस्वरूपी छप्पर, पाय-पाठ मोकळे करण्यासाठी बसल्याजागी देता येणारे आळोखेपिळोखे या सोयीच्या गोष्टी जशा होत्या तसेच रस्त्यावरील व्यापली जाणारी जागा ही मोठी अडचण होती. विशेषतः अडचणीच्या वेळी हे प्रकर्षाने जाणवे.

एकदा पेणहून पुण्याला येताना घाटात वाहतूक तुंबलेली होती. स्कूटरवर होतो म्हणताना कडेच्या साईडपट्टीतून मार्ग काढीत लोणावळा गाठले. परत कान्हेफाटा ते कामशेत वाहतूक तुंबलेली. पुढे परत वडगांवात (वडगांव बायपास तेव्हा नव्हता) वाहतूक तुंबलेली. परत साईडपट्टी. पेणहून चारेक तासांत मी पुण्याला पोहोचलो. नंतर कळालेली बातमी - सकाळी सातला पेणेतून निघालेली बस पुण्याला पोहोचायला चोख संध्याकाळचे पाच वाजले होते.

पण एकंदरीत चारचाकीचा प्रवास आरामदायक होता हे खरे. आणि त्या सुखासीन दृष्टीकोनातून रस्तेही वेगळेच भासू लागले. एकतर दुचाकीवर एका दमात कापता येई त्याच्या दीडपट दुप्पट अंतर चारचाकीतून एका दमात काटता येई. दुसरे म्हणजे फुटकळ खाण्यापिण्यासाठी थांबण्याची गरज उरली नाही. पुढे काही लांबचे प्रवास (पुणे-गोवा, पुणे-रत्नागिरी) बिअर पीत पीत केले ती आगळीच मौज होती.

ट्रक नि बसेसची भीतीही कमी झाली. एकतर ओव्हरटेक करताना ताकद जास्ती मिळे. दुसरे म्हणजे कारवाल्यांना ट्रकवाले दुचाकीवाल्यांना करीत तितकी हाडुतहुडूत करीत नसत. शिवाय ओव्हरटेक करायला न देणाऱ्या ट्रकवाल्याला कशीतरी घुसखोरी करून ओव्हरटेक करणे आणि पुढे जाऊन त्याच्यासमोर अतिसंथ गतीने मार्गक्रमण करीत त्याला शिस्त लावणे असा हलकटपणाही करता येई.

मी चारचाकीतून लांबचे प्रवास करायला सुरुवात केली तेव्हा मोठे महामार्गही डिव्हायडरयुक्त नव्हते. त्यामुळे दुचाकी चालवताना येणाऱ्या सगळ्या अडचणी तर होत्याच, शिवाय रस्त्यावरचा 'फूटप्रिंट' मोठा असल्याने व्हिक्टोरियन काळातल्या चारफुटी व्यासाचे झगे घालून हिंडणाऱ्या बायकांसारखे सुरुवातीला वाटे.

शिवाय ड्रायव्हिंगचे 'जजमेंट' हा एक त्रासदायक प्रकार होता. भारतातली चारचाकी चालवणारा उजव्या बाजूला बसतो, उजव्या पुढल्या टायरच्या जरा मागे - हॅचबॅक आणि सेडन प्रकारांसाठी. व्हॅनमध्ये ड्रायव्हर पुढल्या उजव्या चाकावरच बसतो.

तर उजवे पुढले टायर कुठे आहे हे कळायला अगदीच सोपे असते. तेही कळत नसेल तर चारचाकी न चालवलेली (बाकीच्या जीवित सृष्टीसाठी) इष्ट, किंबहुना मष्ट.

बाकीची तीन चाके कुठे आहेत हे आणि गाडीचे सगळे कोपरे कुठे आहेत हे कळणे याला ड्रायव्हिंगचे 'जजमेंट' म्हटले जाई. रस्त्यातले खड्डे चुकवायला, वळणावाकणांवर आणि रिव्हर्स घेताना हे गरजेचे असे.

चारचाकी चालवताना रात्रीची गाडी चालवणे हे एक कौशल्याचे काम असे. विशेषतः रस्त्याला डिव्हायडर नसेल तर. समोरून येणाऱ्या गाडीच्या दिव्याच्या प्रकाशाने डोळे दिपत आणि एकदोन सेकंद समोरचे नीट दिसत नसे. समोर खड्डा वा/आणि हातगाडी/सायकलवाला असे बिनरिफ्लेक्टरचे काही असेल तर धडक ठरलेली.


ट्रक/रिक्षामागले लिखित साहित्य

जरी या विषयावर अनेकांनी लिहून काव आणलेला असला तरी तेवढ्यामुळे मी माझ्या परपीडनात्मक वृत्तीला आळा का घालू?

पन्नासेक वर्षांपूर्वी ट्रकच्या कपाळावर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट किंवा गुड्स कॅरियर यापैकी एक कुंकू असे. मागल्या बाजूला शक्यतो काही नसे. हळूहळू हॉन प्लीज, ओके, टाटा, ओके टाटा, हॉर्न ओके प्लीज अशी कॉम्बिनेशन्स दिसू लागली. मग कवीमंडळी रिंगणात आली.

लक्षात असलेली पहिली ट्रक्कविता हिंदीत होती. मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकमागे पाहिलेली.

मालिक की जिंदगी बिस्कुट और केक, ड्रायवर की जिंदगी क्लच और ब्रेक.

बऱ्याच ट्रकमागे 'बुरी नजरवाले तेरा मुंह काला' असा शाप असे. पण एका महात्म्याने असला कडवटपणा न बाळगता लिहून ठेवले होते 'बुरी नजरवाले, तेराभी भला हो'.

दारू पिऊन गाडी चालवणारे ड्रायव्हर हा तसा हेटाळणीचा विषय. त्याबाबतीत ड्रायव्हरलोकांची बाजू एकाने तळमळून मांडली होती - 'तितलियां शहद पीती है, भंवरे बदनाम होते है। दुनिया शराब पीती है, ड्रायवर बदनाम होते है'

दिल्लीमध्ये रिक्षांच्या आतल्या बाजूला कवितासदृश ओळींतून उतारुंची करमणूक करणे ही तीसेक वर्षांपूर्वीपर्यंत प्रथा होती. विशेषत: जर लॅम्ब्रेटा रिक्षा असेल [आपल्याला बजाजच्या रिक्षाच माहीत, नाहीतर सिक्स-सीटर ऊर्फ डुक्कर रिक्षा ऊर्फ वडाप. दिल्लीत लॅम्ब्रेटा रिक्षा असत. त्यांना चालू करण्यासाठी हाताने झटका देऊन ओढण्याची लीव्हर नसे तर थेट स्कूटरची किक ड्रायव्हरच्या सीटखाली डाव्या बाजूला असे] तर तिचा इतका आवाज येई की शेजारच्या प्रवाशाशी बोलणेही अशक्य होई. अशा वेळी करमणुकीची तीव्र गरज भासे. यमकांची जुळणूक म्हणजे करमणूक असे मानणाऱ्या एकाने असे मांडले - 'आलू की सब्जी में नींबू निचोड दूं । सनम तेरी यादमें खानापीना छोड दूं।' विरहातिरेकान क्रॅश डायटिंग करणारा बटाट्याच्या भाजीत लिंबू कशाला पिळत बसेल कळाले नाही. कदाचित नाहीतरी काही खायचे नाहीये, तर लिंबू पिळत तरी वेळ काढू असे काहीसे असेल.

मुंबईत जोगेश्वरी (प) मध्ये एसव्ही रोडवर एक वाळूचा छोटा ट्रक होता. मी मागे रिक्षात होतो. उडणारी वाळू डोळ्यांत जात होती म्हणून वैतागलो होतो. पण डोळे मिटून न बसता किलकिल्या डोळ्यांनी समोर बघत राहिलो म्हणून बरे झाले. त्या ट्रकमागच्या काव्यपंक्ती एरवी कशा दिसल्या असत्या? 'दीप माझ्या स्मृतींचा, तू सदैव सांभाळ. कोण जाणे आयुष्याची, केव्हा होईल संध्याकाळ?'