माणसाच्या गरजा न संपणाऱ्या आहेत. एक गरज दुसऱ्या गरजेला जन्म देते. आणि अशा नवनवीन गरजांची पूर्ती करण्याकरता सारे धडपडत असतात. कष्ट करणारे कष्ट करतात, आळशी त्या बिचाऱ्या कष्टकऱ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या मिळकतीवर डल्ला मारतात आणि आरामात जगतात. सारांश काय? तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. काहीजण त्यांना पाहिजे ते मागून घेतात. काहींना तर त्यांनी मागणे आणि इतरांनी त्यांच्या मागण्याची पूर्तता करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे असे वाटते.
हिंदू धर्मा मध्ये दान धर्माला फार महत्त्व आहे. प्रत्येक व्रताची सांगता दान आणि दक्षिणेने होते.धार्मिक प्रसंगी, तीर्थक्षेत्री दानधर्म करणे शुभ असते. त्यामागे काही कारणेही आहेत. मंगल प्रसंगी, शुभप्रसंगी सुख सोहळे आणि साधनांवर संपत्तीचा व्यय केला जातो. विविध प्रकारची सुग्रास व्यंजने पाहुणे आणि आप्त स्वकीयांसाठी तयार केली जातात. अशावेळी दुःखाची सावली त्या सर्व कार्यावर पडू नये, कुणा असंतुष्टाची नजर लागू नये या हेतूने तिथल्या गरीब, गरजूंना दान दिले जाते. दुसरा हेतू असा की कुणाचे मनापासून दिलेले मंगल आशीर्वाद यजमानांना अधिक समृद्धी प्रदान करतील म्हणूनही दान दिले जाते.
तीर्थक्षेत्री दिले जाणारे दान हे परमेश्वराच्या भक्तांची सेवा म्हणून दिले जाते. परमेश्वर त्याच्या भक्तांच्या स्वरूपात पृथ्वीतलावर निवास करत असतात अशी धारणा आहे. त्यामुळे भक्तांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा आणि म्हणून पुण्यदायी अशी समजूत आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक कथांमध्ये असे उल्लेख नेहमी येतात की कुणा धनवान भक्ताने अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, नदी किनारी घाट बांधले.
काही व्यक्ती मात्र अशा असतात ज्यांना ते जे दान देतील त्यातून कसल्याही परताव्याची अपेक्षा नसते. ज्यांच्या मनात खरोखर दया आणि सहानुभूती असते, त्यामुळे दान देण्यासाठी त्यांना कुठल्याही निमित्तांची जरुरी नसते. दान देणे हे त्यांनी स्वीकारलेले एक व्रतच असतें.
दानशूर कर्णाची कथा तर सर्वांना परिचित आहेच. कथा रंजक आहे पण थोडक्यात सांगते.
अंगराज कर्ण (ज्याला राधेय असेही संबोधले जाते) हा पांडवांची माता कुंती आणि साक्षात सूर्यदेवाचा पुत्र. त्याला जन्मजात कवचकुंडले प्राप्त झालेली होती, ज्या योगे त्याचा वध करणे अशक्य होते. त्याच्या जन्माच्या वेळेस माता कुंती देवी अविवाहित होती, त्यामुळे नाईलाजाने तिने तिच्या नवजात पुत्राचा त्याग केला होता. परंतु विधात्याने त्याला अधिरथ आणि राधेच्या रूपाने मातापिता दिले.
कर्ण बुद्धिमान आणि पराक्रमी होता. कौरव राजपुत्र दुर्योधनाचा मित्र होता. महाभारत युद्धामध्ये तो कौरवांच्या बाजूने, पांडवांच्या विरोधात युद्ध करीत होता. अर्जुन आणि कर्ण तुल्यबळ असले तरी कवचकुंडले धारण केलेला कर्ण अजिंक्य आणि अवध्य होता. अर्जुनाचे पिता इंद्रदेव यांनी पुत्र प्रेमासाठी ती कुंडले कर्णा पासून हिरावून घेण्याचा निश्चय केला.
कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्याकडे आलेला याचक कधी रिकाम्या हाताने परत जायचा नाही अशी त्याची ख्याती होती. इंद्राने गरीब याचकाचे रूप धारण केले. कर्णाने त्याचे नाटक ओळखले होते तरीही तो त्याच्या कर्तव्यापासून ढळणार नव्हता. त्याने त्याची जन्मजात कवचकुंडले दान केली. आणि पुढे घडलेले महाभारत सर्वज्ञात आहे.
खरे तर यात कर्णाच्या दानशूर स्वभावाचा गैरफायदा घेतला गेला होता. परंतु हे सारे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी देवादिकांनी रचलेले नाट्य होते म्हणून त्याला विधिलिखित म्हणतात.
तशीच कथा राजा हरिश्चंद्र याची. विश्वामित्र ऋषींना स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्याकरता त्याने त्याच्या साम्राज्यावर पाणी सोडले. स्वतःचे राज्य महर्षींनी दान दिले. दानावर दक्षिणा द्यायची पद्धत आहे, त्याशिवाय दानाची फलश्रुती होत नाही. परंतु राजाने सर्वस्वाचे दान दिले होते. त्याच्यापाशी काहीच शिल्लक नव्हते.
राजाने मग स्वपत्नीचा लिलाव मांडला. राणी तारामती आता गुलाम स्त्री होती. तिचे नवीन मालक तिला घेऊन जाण्यास निघाले. हे पाहून राजपुत्र रोहितने आकांत मांडला. तो लहानसा बालक मातेविना राहू शकत नव्हता. तारामतीच्या नवीन मालकाला दया आली. त्याने राजपुत्राला देखील काही नाणी देऊन विकत घेतले. राजा स्वतः स्मशानातील एका डोंबाचा गुलाम झाला. अशा प्रकारे मिळालेले धन त्याने विश्वामित्र ऋषींना दक्षिणा देण्यासाठी वापरले.
एव्हढे करूनही त्यांचे दुर्दैव समाप्त झालेच नाही. परंतु अंततः सर्व देवतांनी पुष्पवृष्टी करून सांगितले की हे सर्व त्यांनीच रचलेले नाट्य ... राजाची सत्त्व परीक्षा घेण्यासाठी.
आहे की नाही कमाल?
तर अशा कथा सत्त्वपरीक्षेच्या आणि दानधर्माच्या. यातून ज्याने त्याने स्वतःच्या बुद्धीनुसार बोध घ्यावा आणि तारतम्य वापरूनच दानधर्म करावा.
यातर पौराणिक कथा आहेत. परंतु आधुनिक काळातही अशी उदाहरणे आहेत.
पेशवाईच्या कालखंडात असाच अलोट दानधर्म केला जात असे. पंचक्रोशीतील माणसे या दान सत्रासाठी येत. दान स्वीकारून तृप्त होत. पेशव्यांना आशीर्वाद देऊन त्यांची स्तुती स्तोत्रे गात असत. मराठी राज्याचे पेेेेशवा या नात्याने त्यांच्यावर राज्य रक्षणाची जबाबदारी होती, प्रजेला न्याय देणे त्यांचे कर्तव्य होते. परंतु ते मग्न होते यज्ञयाग आणि होमहवन करण्यात. पुण्यामध्ये ब्राम्हण आणि गोरगरीबांच्या जेवणावळी चालू होत्या.पेशव्यांचा खजिना रिता होऊ लागला होता.. म्हणजे खरे तर झालाच होता. पण दान स्वीकारण्यासाठी गर्दी करणाऱ्यांना त्याचे काय? ते येतच होते, हात पसरतच होते. दानाचे पुण्य गमावण्याची पेशव्यांची तयारी नव्हती. त्यांनी अनेक सावकारांकडून कर्ज घेतली आणि दानधर्म चालूच ठेवला.
परिणाम?
मोहिमा चालविण्याकरता आणि जिंकण्यासाठी प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या शूर सैनिकांना देण्याकरता गंगाजळीत काहीच शिल्लक राहिले नाही. पेशवाई संपुष्टात आली, ब्रिटिशांची गुलामी पत्करण्याची नामुष्की आली हा इतिहास आहे.
हे असे असले तरी दानधर्म करणे हे हिंदुधर्मात श्रेष्ठ पुण्यकर्म समजले जाते. प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीनुसार आणि परिस्थितीनुसार दानधर्म जरूर करावा. मागणारे मागतच असतात, त्यांचे हात सदा पसरलेले असतात. पण त्या हातावर किती आणि काय ठेवायचे? काही ठेवायचे की नाही? हे मात्र स्वतःची विवेकबुद्धी वापरूनच ठरवायचे असते.
हिंदू धर्मात सत्पात्री दानाबद्दल सांगितले आहे. दानधर्म करणे हे पुण्यकर्म आहे हे निश्चित पण ते दान सत्पात्री असायला हवे, नाहीतर ते देणे म्हणजे चाळणीत पाणी ओतल्याप्रमाणेच निरुपयोगी असते. तुमचे पाणी खर्च होते पण चाळणीत काहीच शिल्लक राहत नाही. फक्त गरीब आणि गरजू हे निकष दानप्राप्ती साठी पुरेसे नाहीत.
दान कुणाला द्यावे?
१) सज्जन - जो माणूस इतरांशी संयमाने, आदराने व्यवहार करतो, कुणाला दुखावीत नाही, कुणाची निंदा करीत नाही आणि जाणूनबुजून त्रासही देत नाही. असा मनुष्य कुणावर अन्याय करत नाही. दुसऱ्याची संपत्ती हिरावून घेत नाही. वाद करीत नाही आणि कुणाला फसवत नाही. असा माणूस दान प्राप्त करण्यास योग्य असतो.
2) प्रामाणिक - जो माणूस सतप्रवृत्त असतो. तो कुणाला फसवत नाही. खोटे बोलत नाही. खोटी निंदा किंवा खोटी स्तुती करीत नाही. प्रामाणिक माणूस जे बोलतो त्याचप्रमाणे वर्तन करतो. आणि जे बोलतो ते त्याचे खरे विचार असतात, फसवणूक नसते. प्रामाणिक माणूस कधीही लपवाछपवी करीत नाही कारण त्याला तशी कधी जरुरी भासत नाही. अशा प्रामाणिक माणसाला दान दिले तर तो त्याचा सदुपयोग करतो आणि म्हणून दानास पात्र असतो.
3) कष्टाळू - कष्ट करणारा माणूस दुसऱ्याच्या भरवशावर बसून राहत नाही. त्याचा श्रमशक्तीवर विश्वास असतो. तो त्याचे काम न थकता, न कंटाळता करत राहतो. आळस करणे त्याला मंजूर नसते. फुकटचे, आयते काही मिळेल अशी आशा तो कधीच करीत नाही. कुणापुढे हात पसरण्यापेक्षा स्वकष्टार्जित धन संपत्तीवर निर्वाह करतो. कष्टाळू माणूस स्वाभिमानी असतो. कष्ट करणारी माणसे समाजाची प्रगती करतात. ज्या समाजात कष्टाळू माणसे आहेत त्याची नेहमीच उन्नती आणि भरभराट होते. कष्टाळू व्यक्तीस दान दिले असता तो त्या संधीचे सोने करतो. म्हणून कष्ट करण्यावर विश्वास असणारी माणसे दान प्राप्त करण्यास सर्वथा योग्य आहेत.
4) सदाचारी - सत्शील, सदाचारी माणसे समाजासाठी भूषण असतात. त्यांच्या असण्याने समाजाला उन्नत दर्जा प्राप्त होतो. सदाचारी माणसे जिथे वावरतात तिथे नेहमीच देवत्वाचे अस्तित्व असते. सदाचारी माणसे कुठल्याही दुर्गुणांपासून नेहमी दूर राहतात. जो परिसर अशुद्ध, अपवित्र आहे, तिथे सदाचारी माणसे कधीच जात नाहीत. सदाचारी माणसांचे वागणे, बोलणे सभ्य असते. खोटेपणाला त्यांच्याकडे स्थान मिळत नाही. सदाचारी माणसांच्या मनात इतरांविषयी दया, सहानुभूती असते. दुसऱ्यांच्या दुःखाची ते उपेक्षा करीत नाहीत तर ते दुःख कमी करण्यासाठी मदत करतात. सदाचारी माणसे स्वार्थी नसतात. इतरांकडून काही हिरावून घेण्याची त्यांची वृत्ती नसते. म्हणून सदाचारी माणसाला केलेले दान पुण्यदायी असते.
5) निर्व्यसनी - निर्व्यसनी माणूस हा सहसा आरोग्यपूर्ण असतो. त्याची बुद्धी सतर्क असते. निर्व्यसनी माणसाचे आचरण नेहमी नियंत्रित असते. त्याचे धन निरुपयोगी आणि हानिकारक वस्तूंवर खर्च होत नाही, त्यामुळे तो त्याच्याकडे असलेले पैसे योग्य प्रकारे आणि विचारपूर्वक वापरू शकतो. निर्व्यसनी माणूस भविष्याचा विचार करू शकतो आणि त्यानुसार स्वतःचे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ जमविण्याचा प्रयत्न करतो. निर्व्यसनी माणसाला दिलेले धन वाया जाण्याची शक्यता कमी असते. मिळालेल्या धनाचा तो योग्य वापर करेल अशी शक्यता जास्त असते. दान देण्यासाठी निर्व्यसनी व्यक्ती निवडणे उचित ठरते.
6) अल्पसंतुष्ट - सतत जास्तीची हाव न धरणारी माणसे सतप्रवृत्त असतात. त्यांना कुणाबद्दल ईर्ष्या किंवा हेवा वाटत नाही. त्यामुळे ते कुणाचा दुःस्वास करीत नाहीत. ज्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे त्यांनी त्यातला वाटा द्यावा असे अल्पसंतुष्ट व्यक्ती कधीच म्हणत नाही. असे लोक त्यांच्याकडे असलेल्या साधन संपत्तीमध्ये सुखात, आनंदात राहू शकतात. अधिकाची हाव नसल्याने कुणाचे काही हिरावून, हिसकावून, अथवा चोरून घ्यायचा विचार त्यांच्या मनात कधीच येत नाही. त्यामुळे असे लोक गुन्हेगार असण्याची शक्यता कमी असते. अल्पसंतुष्ट माणसे जे मिळेल त्यात समाधानी असतात, संतुष्ट असतात. देणाऱ्याला दुवा देतात. "दिले, पण इतके कमी दिले --" असा कांगावा करीत नाहीत. त्यामुळे देणाऱ्यालापण सुख मिळते. अल्पसंतुष्ट माणसे गरज असे पर्यंतच इतरांकडून मदत स्वीकारतात. 'मिळतंय तर घेत राहावे' असा त्यांचा स्वभाव नसतो. म्हणून अल्पसंतुष्ट व्यक्तीला दान देणे आनंददायी असते.
7) कृतज्ञ - ज्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते अशा व्यक्ती दान प्राप्त करण्यास सर्वाधिक पात्र असतात. त्यांना मिळालेल्या दानाचे महत्त्व कळते. मिळालेल्या दानाला ते फक्त पैशांमध्ये जोखत नाहीत. जे मिळाले आणि ज्यांच्याकडून मिळाले त्यांची नेहमीच आठवण ठेवतात. मिळालेल्या दानाचा सदुपयोग करतात आणि त्यांची परिस्थिती सुधारल्यास अन्य गरजूंना मदत करतात. कारण त्यांना योग्य वेळी मिळालेल्या दानाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे कळलेले असते. म्हणून मनात कृतज्ञता असलेल्या माणसांना दिलेले दान अधिक फलदायी असते.
अशा गुणांनी परिपूर्ण व्यक्तीस दान देणे हे सत्पात्री आणि फलदायी दान असते. मिळालेल्या दानाचा उपयोग करून तो माणूस त्याची प्रगती आणि उन्नती तर साधतोच आणि स्वतःबरोबर अनेकांना परिस्थितीवर मात करण्यासाठी बळ देतो. तो कृतज्ञ असतो आणि म्हणून मिळालेल्या दानाचे महत्त्व कधी विसरत नाही.
दान कुणाला देऊ नये?
दान देण्यास काही माणसे सर्वथा अयोग्य असतात. अशा माणसांना दान देणे म्हणजे संपत्तीचा अपव्यय असतो. अयोग्य माणसाला दान देण्याने कसलेही पुण्य प्राप्त होत नाही. बहुदा अशा व्यक्ती असमाधानी असतात त्यामुळे त्यांना कितीही दिले तरी ते कमीच आहे असे ते सांगतात.
1) दुराभिमानी - स्वाभिमान आणि गर्व यात फरक आहे. काहीजण अती गर्विष्ठ असतात. त्यांच्या स्वतःबद्दल अवाजवी, अवास्तव कल्पना असतात. जे कुणी त्यांचे कौतुक करीत नाहीत अथवा मान देत नाहीत त्यांना असे गर्विष्ठ शत्रूसमान वागणूक देतात. त्यांना त्याची चूक दाखविलेली आवडत नाही. त्यांना त्यांचे अपयश किंवा त्यांच्यावर ओढवलेली वाईट परिस्थिती ही अन्य कुणामुळे आहे असे वाटत असते. ते तसे नेहमी बोलून दाखवीत असतात. त्यांना सगळ्यातले सगळे कळते असे ते समजतात. त्यामुळे कुणी त्यांना काही शहाणपणाच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या कडे साफ दुर्लक्ष करतात. माझे मी पाहून घेईन, तुम्ही बोलायची गरज नाही असे ते सरळ सांगतात. अर्थात परिस्थिती बरेच वेळा विपरीत असते. त्यांचे अनेक निर्णय चुकलेले असतात तरीही काहीतरी बादरायण संबंध जोडून ते दुसऱ्याच कुणावरतरी अपयशाचे खापर फोडतात. अशा व्यक्तींना दान देणे व्यर्थ आहे. कारण इतरांबद्दल तुच्छता त्यांच्या मनात भरलेली असते. तसेच मिळालेल्या दानाचा/मदतीचा उपयोग ते त्यांना पाहिजे तसाच करणार असतात, ज्यात अपयशाची खात्री असते. म्हणून असे दुराभिमानी दान स्वीकारण्यास अपात्र असतात.
2) व्यभिचारी, दुराचारी, व्यसनी - काही जण अनेक दुर्गुणांनी युक्त असतात. यांचे चारित्र्य शुद्ध नसते. अनेक प्रकारची असामाजिक कामे ते करीत असतात, ज्यामुळे समाजातील काही घटक त्रस्त असू शकतात. विविध व्यसने करून ते स्वतःची हानी करून घेतात. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या अशा वागण्याने दुःखी होतात. अशा लोकांच्या हातात पैसा आला की ते त्याचा दुरुपयोग करणार हे निश्चित असते. त्यामुळे त्यांना दान देणे म्हणजे वाईट प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासारखेच असते. म्हणून अशा व्यक्तींना कधीही मदत अथवा दान देऊ नये.
3) असमाधानी, असंतुष्ट - काहीजण सतत तक्रारी सांगत असतात. त्यांना अनेक अडचणी असतात असे ते सांगतात. त्यांच्या असंख्य गरजा असतात, परंतु त्यांच्या पूर्ती साठी काही कष्ट करण्याची, प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नसते. त्यांच्याकडे जे आहे, त्यांना जे मिळाले आहे त्या बद्दल ते जराही बोलत नाहीत, त्यांचा सूर हा सतत असमाधानाचा असतो. त्यामुळे त्यांना कितीही दिले तरी त्यात त्यांना आनंद नसतो. उलट किती कमी मिळाले अशीच टीका ते करतात. अशांना दान देणे म्हणजे दगडावर पाणी ओतण्यासारखे असते. कितीही पाणी ओतले तरी त्या दगडातून कधी हिरवा कोंब उगवणार नाही. तद्वत या असंतुष्ट लोकांना कितीही दिले तरी त्यांचे समाधान होत नाही. अशांना दान दिले तरी ते सतत अजून पाहिजे असा धोशा लावतात. म्हणून अश्यांना कधीही दान देऊ नये.
4) हेवेदावे आणि भांडणे करणारा - दुसऱ्यांच्या प्रगतीवर आणि समृद्धीवर जळफळाट करणारे काही असतात. आणि काही भांडखोर असतात. अशांचे कुणाबरोबर पटत नाही. दुसऱ्यांच्या मागे ते त्यांची निंदानालस्ती करीत असतात. असे लोक समाज स्वास्थ्य बिघडवतात, अशांती निर्माण करतात. अश्यांना मदत अथवा दान देणे सर्वथा अयोग्य असते. अशा असामाजिक लोकांना प्रोत्साहन न देणे कधीही श्रेयस्कर असते. म्हणून या लोकांना कुठल्याही प्रकाराने दान देऊ नये.
5) अप्रामाणिक - काहीजणांना खोटे बोलण्याची इतकी सवय असते की ते खोटे बोलत आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते त्यांच्या फायद्याकरता काहीही नाटक करू शकतात. त्यांचा फायदा व्हावा म्हणून कुणाविषयी गैरसमज पसरविणे, परिस्थितीचे अतिशयोक्तिपूर्ण वर्णन करून लोकांकडून पैसे उकळणे, स्वतः केलेल्या चुका, गुन्हे दुसऱ्यावर ढकलून नामानिराळे राहणे हे त्यांचे नेहमीचे खेळ असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवणे शक्यच नसते. कारण ते कधी काय कथा रचतील याचा काही नेम नसतो. त्यांना खरोखर गरज आहे का? असली तर किती? हे कळण्याचा काहीच मार्ग नसतो. अनेकवेळा खरोखरीच्या गरजूंना मागे सारून मिळणारी मदत ते लाटतात, म्हणजे अन्यायच करतात. अश्यांना तुम्ही मदत करीत असाल आणि काही काळानंतर ती करणे थांबविले तर आधी इतका काळ जे काही घेतले ते न स्मरता तुमच्याविषयी अपसमज पसरवतात. अश्यांना दान देणे गैरच नाही तर धोकादायक सुद्धा आहे.
6) आळशी - "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असे काहींचे तत्त्व असते. ते काही म्हणजे काही कष्ट करण्यास तयार नसतात. त्यांना जर आपण उत्पन्न मिळण्यासाठी मार्ग सुचविला तर ते अनेक कारणे सांगून त्यांना ते काम, व्यवसाय, नोकरी करणे अशक्य आहे असे सांगतात. जोवर त्यांच्या गरजा परस्पर भागविल्या जातात तोवर त्यांना कसलीही चिंता नसते. भविष्यकाळासाठी काही तरतूद करणे आवश्यक असते हे त्यांना मान्यच नसते आणि तसे करणाऱ्यांची ते हेटाळणी करतात. अश्यांना दान देणे म्हणजे कृतिशून्य वाचाळविरांना मदत करणे असते जे सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असते. म्हणून जोवर ते आळस झटकून काही उद्योग हाती घेत नाहीत तोवर त्यांना दान देऊ नये.
7) कृतघ्न - ज्यांच्या मनात कृतज्ञता नाही असे लोक घातकी असतात. त्यांना कुणाच्याही कष्टांची, चांगुलपणाची आणि औदार्याची कदर नसते. त्यांना मदत करणे हे दुसऱ्यांचे कर्तव्य आहे आणि ते करण्यात काही विशेष नाही अशी त्यांची समजूत असते. त्यामुळे दान देणाऱ्या माणसांशी देखील ते सौजन्याने वागत, बोलत नाहीत. कुणाच्या मदतीने त्यांना सुस्थिती प्राप्त झाली असेल तर त्याचा उल्लेखही ते कुठे करत नाहीत. आणि असे लोक सहसा दुसऱ्या कुणाला मदत करतही नाहीत. अशा कृतघ्न लोकांना दान देणे मूर्खपणाचे आहे.
असे अजूनही अनेक प्रकार असतात. बऱ्याचवेळा मदत करून वाईट अनुभव पदरी पडलेला असतो. त्यामुळे धर्मा मध्ये दानाचा कितीही उदो उदो केला तरी देताना तारतम्य बाळगायला पाहिजे. आपण जे देणार त्याचा दुरुपयोग तर होणार नाही ना याची जरूर ती काळजी घ्यायलाच हवी.
श्रीमंत, अतिश्रीमंत किंवा गर्भ श्रीमंतांना पैशाचे तितकेसे महत्त्व नसेल कदाचित. त्यांच्याकडील थोडेफार पैसे वाया जाण्याने त्यांना दुःख होत नसेल कदाचित. परंतु तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गियासाठी ते महत्त्वाचे असते. मी कुणाकडूनतरी एक वाक्य ऐकले होते ते माझ्या कायम लक्षात राहिले. "Do not through your money - spend it" पैसे खर्च करण्याकरताच असतात, नुसते तिजोरीत ठेवून पूजा करण्यासाठी नसतात हे खरे आहे. पण खर्च करताना शहाणपणा आणि विवेकबुद्धी जागृत असू द्यावी कारण ते पैसे मिळवण्यासाठी कुणीतरी अविश्रांत परिश्रम केलेले असतात. कुणाच्यातरी श्रमाचा मोबदला कुणा अपात्र व्यक्तीच्या हाती देणे गैर आहे. असे केल्याने पुण्यप्राप्ती होणार नाही हे निश्चित.
असे हे दान माहात्म्य. मंदिरांच्या भोवती जमलेले याचकांचे थवे पाहिले की हिंदुधर्मामध्ये असलेले दानाचे महत्त्व अधोरेखित होते. खरे तर दान हे न मागता द्यायचे असते. मागून मिळते ती भिक्षा आणि न मागता मिळते ते दान. दानधर्म करून कुणाच्या खात्यात किती पुण्य जमा होते माहिती नाही, परंतु समाजातील काही घटकांचे भले होते हे निश्चित.
दान देण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. काहीजण देण्यासाठी प्रसिद्ध असतात तर काही घेण्यासाठी. कुणाकडून काही मागणे हे पाप नाही, किंवा कमीपणा नाही. अनेकवेळा पाहण्यात येते की काहीजण याचक होतात, परावलंबी होतात. याचे कारण असते परिस्थिती. अशावेळी त्यांना कुणी हिणवू नये, तुच्छ समजून अपमानित करू नये. कारण वाईट परिस्थिती कुणावरही येऊ शकते. पण त्याचवेळी मागणाऱ्याने देखिल भान ठेवावे, देणाऱ्यांचा गैरफायदा घेऊ नये.
मागण्याचेही विविध प्रकार आहेत. भिक्षा मागणे म्हणजे भीक मागणे अशी समजूत आहे. पण पूर्वीच्या काळात तसे नव्हते. अनेक ऋषी, मुनी, तपस्वी भिक्षा मागून गुजराण करीत असत. संसाराचा त्याग केलेले ते सारे ज्ञानी आणि भक्ती पथाचे यात्री क्षुधा शांती पुरतीच भिक्षा स्वीकारत असतं. सर्वसंग परित्याग करणाऱ्याला कसलाही संचय करण्याची अनुमती त्यांचा धर्म देत नसे.
आळंदीच्या ब्रह्मवृंदाने बहिष्कृत केल्याने, कुलकर्णी दांपत्याने नदीमध्ये देहत्याग केला. त्यांची निष्पाप लेकरे गावामध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होती. भिक्षांदेहि करीत असताना गावातील विसोबा खेचर याने ज्ञानदेवांचा अपमान केला, तो त्यांच्या जिव्हारी लागला, ते त्यांच्या झोपडीची कवाडे बंद करून एकांतात बसले. तेव्हा त्यांच्या चिमुकल्या बहिणीने, मुक्ताईने त्यांची समजूत काढली. त्या लहान मुलीने किती महान तत्त्वज्ञान सहजतेने सांगितले? मुक्ताई म्हणते - योगी पावन मनाचा | साही अपराध जनाचा | विश्व रागें झाले वन्ही| संते सुखें व्हावे पाणी |
सांगण्याचे प्रयोजन म्हणजे, नशिबाचे भोग कुणाला चुकले नाही. आज तुमच्याकडे सुखसमृद्धी असली तरी भविष्यकाळ अज्ञात असतो. म्हणून कुणाची कधी हेटाळणी करू नये.
भिक्षा मागून निर्वाह करणारे अनेकजण असतं. व्रतबंध (मुंज) झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा भिक्षा मागावी लागत असे. व्रतबंध सोहळ्यात भिक्षावळ असा एक विधी असतो. मुंजमुलाच्या हाती एक काठी दिली जाते आणि एक झोळी. त्या मुलाने वडीलधाऱ्यापाशी जाऊन "ओम भवति भिक्षांदेहि" असे म्हणायचे. मग त्याच्या झोळीत भिक्षा घातली जात असे. आता ही प्रथा केवळ रूपकापुरती उरली आहे. परंतु पूर्वी जेव्हा गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती तेव्हा या पद्धतीचे फार महत्त्व होते. व्रतबंध सोहळ्यानंतर मुले गुरुगृही शिक्षणासाठी जात असत. आई वडिलांचे सुरक्षित घर सोडून त्यांना गुरुगृही विद्यार्जन करायचे असे. त्या कष्टप्रद आयुष्याची ही तयारी असे.
सांगायचा मुद्दा - भिक्षा म्हणजे भीक नव्हे.
काहीवेळा गरीब विद्यार्थी किंवा ब्राम्हण माधुकरी मागत असतं. घरोघरी जाऊन ते माधुकरी मागत. हे विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत माधुकरी मागून निर्वाह करीत. ते ज्या घरी माधुकरी साठी जात त्या घराची गृहलक्ष्मी जे अन्न देईल त्यावर समाधान मानत असत. अधिक काही मागणे निषिद्ध होते, तसेच अन्ना व्यतिरिक्त अन्य काही मागण्यास देखील परवानगी नव्हती.
कुणीतरी, कुणाकडे, काही मागणे हे काही नवल विशेष नाही. प्रत्येकावर कधी ना कधी अशी वेळ येते, जेव्हा सारे मार्ग बंद झालेले असतात. त्या परिस्थितीत कुणाला काही मदत मागणे अनिवार्य असते. यात कुणी अवमान किंवा कमीपणा मानण्याचे कारण नाही. फक्त कधी? किती? आणि कसे मागावे याची मर्यादा सांभाळली पाहिजे. काहीच्या काही मागणे केले तर अनर्थ ओढवू शकतो.
या संदर्भात मला एक ऐकलेली कथा आठवते. लेखकाचे नाव स्मरणात नाही,परंतु कथा खूप जुनी आहे, भारतामध्ये ब्रिटिश राज होते त्या काळातली. कथेचे नाव आहे "माकडाचा पंजा (monkey's paw)"
कथा आहे साध्यासुध्या वृद्ध दांपत्याची. त्यांचा स्वभाव लालची नसतो. आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेले असतात. परंतु आयुष्याच्या संध्याकाळी आर्थिक विवंचनेने ग्रासलेले असतात.
दैवयोगाने त्यांना चमत्कारी शक्ती असलेला माकडाचा पंजा मिळतो. तो पंजा कोणत्याही तीन इच्छांची पूर्ती करणार असतो. त्या पंज्याचा इतिहास रक्तरंजित असतो. त्यांनी त्याचा वापर करू नये असे त्यांना सांगितलेले असते. परंतु नशीब अजमावण्यासाठी ते त्याच्या कर्जाच्या रकमे इतके पैसे मिळावे अशी इच्छा त्या पंज्याकडे व्यक्त करतात. आणि आश्चर्य म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होते पण भयंकर रितीने. दुर्दैवाने त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू होतो आणि नुकसान भरपाई म्हणून बरीच मोठी रक्कम त्यांना दिली जाते... जी त्यांच्या कर्जाच्या रकमे एव्हढीच असते. कधी नव्हे ते त्यांनी काही मागितले असते आणि ते अशा पद्धतीने त्यांना मिळते.
विद्वान, शास्त्री, पंडितांनी सांगितले आहे, शक्यतो कुणापाशी काही मागू नये. अगदीच इलाज नसेल, तर तितकेच मागावे ज्याची तुम्ही परतफेड करू शकाल. मंत्र, तंत्र, जादूटोणा, चमत्कार इत्यादीच्या नादी बिलकूल लागू नये कारण या प्रकारात तुम्हाला नुकसान, मनस्ताप आणि हाल अपेष्टाच भोगावे लागतात. म्हणून संतांनी दिलेला उपदेश ध्यानी ठेवावा, अधिकाची हाव धरू नये - चित्ती असू द्यावे समाधान. हात जोडून मनापासून परमेश्वराला साकडे घालावे - "हेची दान देगा देवा - तुझा विसर न व्हावा".
***