दहिवर

आठवणींचा उदास दहिवर
करतो आहे मजला कातर

सोसत नाही तुझा दुरावा
नयनी अश्रू हृदयी गहिवर

दुःख मुके, बोलक्या वेदना
कसे थोपवू शल्य अनावर

किती उसासे, किती उमाळे
प्रेतामागे किती लटांबर

जन्म असो वा मरण असू दे
आत्म्याचे असते स्थित्यंतर

बोलत नाही प्रीती काही
मौनाचे करते भाषांतर

झाडाला टांगले कुणी हे
दवबिंदूंचे सुंदर झुंबर

तू गेल्यावर मला वाटते
परकी अवनी परके अंबर

नको तिथे जाऊन शिरावर
का घेऊ उडवोनी गोबर

कल्पांताच्या जरी जवळ मी
सरे न शेवटचे मन्वंतर

प्रा. सतीश देवपूरकर