रेवा बसची वाट पाहत उभी होती- तसा फार उशीर झालेला नसला तरीही रहदारी तुरळक होत होती. बस लवकर यावी असा मनोमन विचार करीत असतानाच आजूबाजूला हातात हात घालून रेंगाळणारी युगुले तीच्या विचारांत खंड आणीत होती. त्यातले एक तर स्टॉपच्या लोखंडी पाइपांवर बसून प्रणयांत रंगले होते.
रेवाला हे नवीन नव्हते. आठ वाजत आले की, ओव्हरटाइमच्या बहाण्याने नोकरी करणारी तरूण मंडळी जोडीने फिरणे हे काही गुपित राहिलेले नव्हते. ऑफिस मधल्या काही मुली त्याच मार्गाने जात पण आपण त्या गावचेच नाहीत असे दाखवीत तेंव्हा रेवाला त्यांची मजा वाटे.
कित्येकदा वासंतीला वाचवण्यासाठी तीच्या घरी रेवाने खोटे निरोप दिले होते. तिला व्यक्तीश्या: हे पसंत नव्हते परंतू आईची तब्येत ढासळली की, वासंती खेरीज तिला कोणी सहकार्य करीत नसे व म्हणूनच तिचा नाईलाज होई.
वासंतीचा विचार डोक्यात आल्याबरोबर तिला आजचा प्रसंग आठवला, कामे तुंबून राहिली आहेत म्हणून वासंतीला आज ऑफिसमध्ये चांगलाच दट्ट्या बसला होता व काम झाल्याखेरीज घरी जायचे नाही अशी तंबीही मिळालेली होती. बिच्चारी वासंती ऑफिसात बसून स्वत:ची तुंबलेली कामे करीत होती.
रेवाही तशी काही टाकाऊ मुलगी नव्हती. नाकी डोळी सुंदर, गहूवर्ण रंग - उंची, बांधा सहज नजरेत भरण्याइतपत आकर्षक.... कार्यालयात येणारा प्रत्येक नवांगत "ही कोण हो ?" म्हणत तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करी. वासंती तर गमतीने तिला चिडवे,"तू राजच्या समोर येऊच नकोस बाई, नाहीतर तो मलाच विसरायचा !" पण श्यामळू व अलिप्त स्वभावामुळे तिच्याशी सर्वजण अंतर ठेवूनच वागीत व बोलीत. कार्यालयातील आगाऊ मुलेच नव्हेत तर माणसे देखील अघळपघळ बोलायचा प्रयत्न करायला लागली तर त्यांना ही सरळ "मी जरा कामांत आहे, आपण नंतर बोलू !" असे सांगून कटवी.
बस येत असलेली पाहून खांबाला टेकून उभी असलेली रेवा पुढे सरकली अन... अचानक मागल्या अंधारातून एका टपोरी टाइपच्या युवकाने तिला जोरात धक्का दिला - बेसावध रेवाने जेमतेम बस जवळ येण्याच्या आत स्वत:ला सावरले व रागाने मागे वळून पाहते, तर तो पोरगा धावत असलेला तिला दिसला..."मरो; बस चुकवायची नाही" हा विचार रेवा करीत थांबलेल्या बसचा दांडा धरून पायरी चढणार तितक्यात तीच्या लक्षात आले की खांद्यावरची आपली पर्स त्या पोराने पळवली.... काय करावे ह्या विचारांनी गोंधळलेली रेवा एक पाय पायरीवर तर दुसरा रस्त्यावर अश्या परिस्थितीत उभी होती....
"ओ ताई येताय का?" वाहकाची हाक ऐकून काय करावे ह्या विचारांत असतानाच त्याने घंटी बडवली व बस सुरू झाली.
रेवा रस्त्यावर तो पोरगा पळाला त्या दिशेने पाहू लागली. भानावर आल्यावर तिने सर्वप्रथम स्टॉपवर बसलेल्या त्या युगुलाकडे मोर्चा वळवला-
"माफ करा, आपल्यापैकी कुणी त्या पोराला पाहिले का?"
"क्या हुआ ? किसको देखा क्या पूछ रही हो मॅडम ?" युगुलातल्या पोराला जरा कणव उत्पन्न झाली... तेव्हढ्यात "जाने दो डार्लिंग, लफडेमें कायकू पडनेका ?" त्याची मैत्रीण पचकली !
तो टपोरी पळाला त्या दिशेला तोंड करून रेवा कोणी दिसते का ह्याचा अंदाज घ्यायला लागली. अंधारात फारसे लांबचे दिसणे तिला शक्यच नव्हते... हताश होवून परत ती खांबाला चिकटली... पर्स गेली म्हणजे आता रिक्शाने जाणे भाग आहे...
रिक्शा खाली उभी करून पैसे द्यावे लागतील... पर्स मधील सामान फारसे महत्त्वाचे नव्हते पण, आईच्या औषधांचे वेगळे काढलेले पैसे होते; पिंटूची फी होती; अडी-अडचणीला लागणारे तिचे पैसे, चाव्या व फुटकळ सामान होते......
कितीही नगण्य सामान असले तरी पोलिसांत तक्रार केलीच पाहिजे असे तिला वाटले म्हणून आजूबाजूला कोणी दिसते का ते बघत असतानाच एक माणूस दुसऱ्याला बखोटीला धरून घेऊन येत असताना तिने पाहिले.... बघते तर काय, तो टपोरी, ज्याने तिला धक्का दिलेला होता त्याचे बखोटं पकडून एक युवक तीच्याच दिशेने येत होता ! त्या युवकाकडे व त्या चोराकडे बघत ती मख्खपणे उभी होती.
"दान धर्म करायची इतकी इच्छा असेल ना, तर तो गरीबाला करावा." ह्या वाक्याने ती भानावर आली.
"देवाने तोंड दिले आहे आपल्याला, तर 'चोर चोर' तरी ओरडता येते ना ?"
"मला सुचेना काय करावे ते ! त्याने नेमका अश्या वेळेला धक्का दिला की, मी बसखाली येता येता वाचले.... जेंव्हा माझ्या लक्षात आले की, माझी पर्स चोरली गेली तोवर तो लांब गेलेला होता....."
रेवाला स्वत:चीच लाज वाटत होती.... काय घडले ते मागे बसलेल्या युगुलालाही कळले नव्हते इतक्या वेंधळ्यासारखी ती वागलेली होती.
"माझ्या मैत्रिणीची पर्सही अशीच व इथूनच गेली होती - नशीब मी फोन करायला पलीकडे थांबलो होतो म्हणून तुमची पर्स मिळाली."
" आपण माझ्यावर खरोखर मेहरबानी केलीत, मी विचारच करीत होते पोलिसांत तक्रार देण्याचा"
"ह्याचे काय करायचे ? ह्याला असा सोडला तर हा चोरी करीत राहणार; पोलिसांत द्यायला निघालो तर माझा प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरी जायला उशीर होईल." भेटल्यापासून एक वाक्य हा गृहस्थ रेवाशी सरळपणे बोललेला नव्हता म्हणून रेवाला संताप आलेला होता
परंतू तिला घरची सगळी कामे एका क्षणांत आठवली- शनिवारी कार्यालयातून लवकर घरी आल्यावर आईला घेऊन हॉस्पिटलाला न्यायचे होते; पिंटूची परीक्षा जवळ येत होती; त्याचा थोडा तरी अभ्यास घेणे भाग होते, "ताई, तू माझा अभ्यास घेतच नाही" ही त्याची नेहमीची भुणभूण तीच्या मागे होती. ऑफिसचे कामही बरेच होते...
ह्या सगळ्या गोंधळात नवीन उपद्व्याप मागे लावून घेण्याची तिची तयारी नव्हती.
तिला जास्त पिळण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच "राहू द्या; मी बघतो ह्याचे काय करायचे ते !- आता तरी आपण रिक्शाने घरी जाण्याची तसदी घ्यावी..." त्याचा हा अनाहूत सल्ला ऐकताच इतका वेळ धरून ठेवलेला तिचा संयम सुटला. नकळत तीच्या डोळ्यात टचकन पाणी आले- हा प्रकार त्याच्या गांवीही नव्हता, त्याने सरळ रिक्शाला हात करून बोलावले, तिला अक्षरशः: रिक्शांत ढकलून रिक्शांचे मिटर स्वत:च्या हाताने खाली पाडले !
"मॅडमको घरपर बराबर छोडना !" असे रिक्शावाल्याला बजावले. रेवाने त्याच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करण्याआधीच रिक्शा सुरू झाली.....
रिक्शांत बसल्यावर रेवाचे विचारचक्र चाकांसारखे फिरू लागले....
हा गृहस्थ वेळेवर मदतीला आला नसता तर पिंटूच्या सरांना काहीतरी निमित्ताने ह्या वेळी टाळावे लागले असते. आईच्या औषधांची निकड ठेवणीतल्या पैशांतून भागवावी लागली असती. महिन्याचे गणित चुकले तर असतेच, वरून पर्स नवीन घ्यावी लागली असती....
"मॅडम, साहब पुलिसवाला है क्या?" रिक्शावाल्याच्या ह्या प्रश्नाने ती भानावर आली. संभाषण टाळण्यासाठी तिने फक्त हुंकार भरला.
"मुझे लगा ही, जीस तरिकेसे उन्होने दो झापड दिये उस चोर को, यह पुलिसवालेका ही काम हो सकता था ।"
"तू का नाही पकडले त्याला?"... ह्या प्रश्नावर मात्र संभाषण टाळून तो गप्प बसला.
घराच्या वळणावर तिने रिक्शा सोडून ती पायी निघाली; रोज बसने येणारी मुलगी आज रिक्शाने कशी हा चाळीत चर्चेचा विषय झाला असता......