मस्त शारदीय रात प्रकाशन समारंभ

काल एक अत्यंत आगळा वेगळा आणि जितका देखणा तितकाच हृद्य असा कार्यक्रम पहायची संधि मिळाली. प्रख्यात चतुरस्त्र साहित्यिक कै.डॉ.वसंत व-हाडपांडे यांच्या निवडक गीतांच्या कॅसेट व सीडीच्या प्रकाशनाचा हा समारंभ अणुशक्तिनगरमध्ये साजरा झाला. कै.डॉ.वसंतरावांच्या सुविद्य कन्या डॉ.सौ.अंजली कुलकर्णी आणि डॉ.सौ.अनुराधा हरकरे व दोन्ही परिवारांच्या अथक परिश्रमाचे हे फलित होते.  कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन  त्यांनी अगदी सराईत निवेदिकांच्या निपुणतेने केले. भरपूर साहित्यविषयक माहिती आणि मनातील सर्व नाजुक भावना मोजक्या शब्दात प्रभावीपणे व्यक्त करण्याचे भाषाकौशल्य त्यांना पितृवारशानेच मिळाले असणार म्हणा. एका बाजूला माता पित्यांच्या व भावांच्या  आकस्मिक अपघाती निधनाने आभाळच कोसळलेल्या घटनेच्या दारुण आठवणी, दुस-या बाजूला पित्याची निवडक गीते संगीतबध्द करून पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याच्या यशस्वी प्रयत्नामधील कृतकृत्यतेची भावना, या निमित्ताने डोळ्यासमोर उभे राहणारे संपूर्ण जीवनपटातील अनेक प्रसंग, मनात उचंबळून येणारे भाव आणि त्या सर्वांना काबूमध्ये ठेऊन संपूर्ण कार्यक्रमाची धुरा वाहणे, मान्यवरांच्या स्वागतापासून ते म्यूजिक ट्रॅकपर्यंत सगळीकडे जातीने लक्ष पुरवणे, सगळेच कौतुकास्पद.   
ज्येष्ठ संगीतकार व कवि पं.यशवंत देव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला सुप्रसिध्द लेखिका प्रा.डॉ.वीणा देव या प्रमुख पाहुण्या होत्या. दोघांचीही भाषणे चिरकाल लक्षात रहातील अशी झाली. प्रा.वीणाताईंनी डॉ.व-हाडपांडे यांच्या विस्तृत साहित्यिक कारकीर्दीचा सारांश मार्मिकपणे सांगून त्यामध्ये दिसून येणा-या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रतिबिंबाच्या सूक्ष्म छटा हळुवारपणे उलगडून दाखवल्या आणि विशेषतः त्यांच्या काव्यामधील विविध रंगांची ओळख करून दिली. पं.यशवंत देवांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीमध्ये डॉ.व-हाडपांडे यांच्या नागपूर आकाशवाणीवर काम करत असतांना घडलेल्या सहवासातील कांही आठवणी सांगितल्या. तसेच या कॅसेटमधील गाण्यांना दिलेल्या संगीताचे मार्मिक रसग्रहण केले. त्यातल्या सकारात्मक बाजूचे दिलखुलास कौतुक तर केलेच, पण हळूच हे माझ्याच शिष्याचे काम आहे हेही सांगितले आणि जाता जाता एक दोन बारीकसे चिमटेसुध्दा काढले.
रंगभूमीवरील सुप्रसिध्द कलाकार डॉ.गिरीश ओक, श्री.आविष्कार दारव्हेकर, गायक श्री.सुरेश वाडकर, गायिका श्रेया घोषाल व सुचित्रा भागवत आणि संगीतकार अभिजित राणे इतकी नामवंत मंडळी या समारंभाला आवर्जून उपस्थित राहिली होती. या सर्वांना एकत्र पहाण्याची एक पर्वणीच अणुशक्तीनगरसारख्या वैज्ञानिकांच्या वसाहतीमधल्या मराठी मंडळींना या निमित्ताने मिळाली. डॉ.गिरीश ओक यांनी डॉ.व-हाडपांडे यांच्या दोन एर्थपूर्ण कविता आपल्या भरदार आवाजात दोन अर्थपूर्ण कविता आपल्या भरदार आवाजात त्यामधील आशयाला उठाव देत वाचल्या. सुचित्रा भागवत, श्रेया घोषाल व अभिजित राणे यांनी या कॅसेटमधील निवडक गाणी आपापल्या सुरेल आवाजात ट्रॅकवर गायली.श्री.आविष्कार दारव्हेकर यांनी त्यांचे वडील डॉ.रंजन दारव्हेकर यांनी लिहिलेले हृद्य पत्र तितक्याच उत्कटपणे वाचून दाखवले. 
एकंदर कार्यक्रम एक उच्च दर्जाचा बौध्दिक,मानसिक व भावनिक अनुभव देणारा झाला.