ये पुन्हा... परत ये; काळवेळ सारून ये
दुराव्याची जळमटं; धरलेली काढून ये !
भिजलेल्या स्वप्नांना दे वास्तवाचं ऊन
रुसलेल्या स्वरांना दे बासरीची धून
नव्यानं 'तोच' होऊन; पापणीच्या आडून ये
दुराव्याची जळमटं; धरलेली काढून ये !
सावळ्याशा डोहामध्ये उमटू दे प्रतिबिंब
त्याच श्रावणझडींनी होऊ दे चिंब चिंब
दरवळत्या मातीच्या; सुगंधानं भारून ये
दुराव्याची जळमटं; धरलेली काढून ये !
पानांवर थबकलेलं गोळा कर दंव सारं
नितळ नव्या स्वप्नांचं वादळही हवं न्यारं
गर्द दाट झाडीतून; जुनी वाट शोधून ये
दुराव्याची जळमटं; धरलेली काढून ये !
पुन्हा हात हाती घेऊ; पुरा करी जुना डाव
तड्यामध्ये पाणी घालून पुन्हा नवी स्वप्नं लाव
कान्ह्याचा 'पावा' होऊन; मोरपीस खोवून ये
दुराव्याची जळमटं; धरलेली काढून ये !