जीवन-मरण

जीवन-मरण


सन्मानानं जगता आलं पाहिजे...
सन्मानानं मरता आलं पाहिजे...
या जन्मावर प्रत्येकाला
भरभरुन प्रेम करता आलं पाहिजे..!!!


खरंच जीवन कसं असावं...?


जीवन असावं भीष्मासारखं
राजगादी त्यागलेलं..!
जीवन असावं रामासारखं
वचनासाठी जागलेलं..!!
जीवन असावं कृष्णासारखं
राजनितीत मुरलेलं..!
जीवन असावं मीरेसारखं
कृष्णासाठी झुरलेलं...!!
आयुष्यात फ़ुलासारखं फ़ुलता आलं पाहिजे..!
कधीतरी काट्यासारखं सलता आलं पाहिजे..!!
या जन्मावर प्रत्येकाला
भरभरुन प्रेम करता आलं पाहिजे..!!!


मरण कसं असावं..?


मरण असावं कर्णासारखं
लढता लढता आलेलं..!
मरण असावं बाजीप्रभूसारखं
खिंडीत पावन झालेलं..!!
मरण असावं बाबू गेनूसारखं
फ़िरंग्यांचा ट्रक अडवलेलं..!
मरण असावं बापुंसारखं
प्रार्थनास्थळी घडवलेलं..!!
आठवण्यासारखं कार्य करता आलं पाहिजे..!
मरुनसुद्धा किर्तीरुपी उरता आलं पाहिजे..!!
या जन्मावर प्रत्येकाला
भरभरुन प्रेम करता आलं पाहिजे..!!!


सन्मानानं जगता आलं पाहिजे...
सन्मानानं मरता आलं पाहिजे...
या जन्मावर प्रत्येकाला
भरभरुन प्रेम करता आलं पाहिजे..!!!


अरुणकुमार .....