उगाच (गज़ल)
प्रेमपत्रं ती जुनाट चाळतो उगाच मी
आसवे तरी कधी न ढाळतो उगाच मी
आसपास श्वापदेच पाहतो अनेकदा
कायदे वनातले न पाळतो उगाच मी
वाद मी न घातले, न दादही दिली कुणा
बोलणे मिजासखोर टाळतो उगाच मी
वाळवंट नांगरून लोटले ऋतू किती?
पाट कोरडेच, घाम गाळतो उगाच मी
राख सापडे कुणा न, दाह ना कळे कधी
वेदना उरात लाख जाळतो उगाच मी
-नीलहंस.