महापराक्रमी रामहि शोकाने करि आक्रंदन

गदिमांच्या गीतरामायणाने बऱ्याच मनोगतींवर मोहिनी घातली असणार, तशीच माझ्यावर देखील घातली आहे. त्यातील सुंदर कल्पना अन् त्याहूनही सुंदर शब्दरचना ऐकून मी खूपच प्रभावित झालो. आपणही रामायणातील एखादी गोष्ट कवितेतून व्यक्त करावी असे खूप वाटले. त्यातूनच हा प्रयत्न. लढाईमधे लक्ष्मण मूर्छित होतो त्यावेळी हनुमान संजीवनी आणून त्याला वाचवतो. त्या प्रसंगाचे हे वर्णन पूजनीय गदिमांच्या चरणी अर्पित - त्या योग्यतेचे आहे की नाही याचा विचार न करता.


महापराक्रमी रामहि शोकाने करि आक्रंदन
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ ध्रु ॥


हाय लक्ष्मणा कशास जाऊ परतुनि रघुनगरित
कुठल्या वचने कथु ही वार्ता ऊर्मिलेस दुःखित
लक्ष्मणाविन व्यर्थच आहे रामाचे जीवन
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ १ ॥


सुषेण म्हणतो रघुराया का होशी भयशंकित
लक्ष्मणाला सावध करण्या उपाय मज माहित
गलितगात्रश्या तुला पाहुनी खचतिल वानरगण
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ २ ॥


द्रोणागिरिच्या शिखरी आहे संजीवनि औषधी
सत्वर आणिव ती तू येथे रवि-उदयाच्या आधी
दुष्कर हे ही करिल साध्य तो एकच हनुमान
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ ३ ॥


सत्वर उडला वायुगतीने वीर वायुपुत्र
द्रोणागिरि परी कोटी योजने झाली ती रात्र
गडद तिमिरि त्या नोळखु येई संजीवनिचे पान
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ ४ ॥


शोधशोधता टळली घटिका टळला तो प्रहर
शंकित झाला सूर्यच आता येइल क्षितिजावर
उत्पाटुनि ते शिखरचि अंती करितो तो उड्डाण
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ ५ ॥


रामछावणी चिंतित झाली फाकु लागली उषा
हनूमान परि परत न आला मावळतिल का आशा
इतुक्यामद्धे गगनी दिसला वीर तोच बलवान
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या निर्जिव निष्प्राण ॥ ६ ॥


संजीवनिचा अर्कहि करितो त्वरित चमत्कार
रामनयनी त्या आनंदाश्रू आवेग अनिवार
हृदयी घेउन हनुमानाला देइ द्रुढालिंगन
पाहुनि प्रियतम लक्ष्मणासि त्या परत सावधान ॥ ७ ॥