घर हवंय, घर... !

परवा त्याचं घर ढासळताना पाहिलं
आणि मग मलाही नकळत जाणवलं
आता माझंही घर विस्कटू पाहतंय...
विश्वासाच्या भिंतीतून निसटू पाहतंय...
जिवंत मन मेल्यासारखं वावरतंय
खोट्या खोट्या स्वप्नांनी स्वतःला सावरतंय.


छताकडे सहज पाहिलं तर दिसलं...
चिमणीनं बांधलेला खोपा
अजूनही शाबूत आहे
काड्या-काड्यांनी रचलेला
पाया तिच्या काबूत आहे
चिमुकल्या पिलांचा किलबिल स्वर आहे
म्हणूनच तिचं घर खरंखुरं घर आहे.


तशी दगड-विटांनी आमचीही...
घरं आहेत बांधलेली
मात्र... तुटत चाललेली मनं
कशीबशी सांधलेली
मनात 'मी'पण दाटलेलं, नुसताच अहंकार
प्रेम आटत चाललेलं, केवळ वेदनेचा हुंकार
असंच होत राहिलं तर काय होईल?
वाढत जाईल अंतर....
अन एक दिवस मन आक्रंदून म्हणेल...
'घर हवंय, घर !'
'खरंखुरं घर हवंय; घर !'