सर्वांचा होऊनी बघितले मी
परि माझे कुणी ना ऊरले..
शरिरास चिकटली नाती अमाप
परि मन मात्र बेवारस झाले...
सगळेच तुटतील बंध आता
भीती ना कुठल्या सक्तीची...
असेल कदाचित सुरुवात ही
जीवनातल्या मुक्तीची..
परि मुक्त व्हायचे कुणापासुनी
ह्या वेड्या मनास कळेना..
अन तार वेडी ह्या श्वासांची
आशेचे घरटे सोडेना...
सरत चाललीय जीवनलालसा
विरत चाललीय आसक्ती..
मोहवत नाही प्रिती देहाची
ना ऊरली देवाची भक्ती..
का तुटेना आशा ही
कुणीतरी दाखवेल आस्था
जर जिवंतपणीच भोगायची
आहे प्रेताची अवस्था..
आता येणार कुणाची याद नाही
अन देणार दुरुनी कुणी साद नाही..
ना पित्याची समर्थ साथ आता
मातेच्या मायेचा हात नाही...