ओढ
वाट पाहिली नाही मीही
तुझा फोनही आला नाही
आणि जीव नेहमीप्रमाणे
वर-खाली-वर झाला नाही
मलाच माझा विसर पडावा
असे न घडते काहीही पण
मध्ये-मध्ये भेटाया येते
भटकत-भटकत तुझी आठवण
मध्ये-मध्ये बुद्धीला येते
कीवच माझी कधी खरोखर,
"व्याकुळ झाला काय एवढा?
सरळ वाट का केली दुस्तर!"
झरा आटता-आटत नाही
ओल जराशी बाकी असते;
अशी ओढ ही उरली-सुरली
शब्दांसोबत खेळत बसते.
—गाणारा कडुनिंब