भारतात आल्यावर पडतो 'चालु कसा' हा प्रश्न खरा
परंतु वाटे अमेरिकेमधि गड्या आपला देश बरा
कारण ?
मन्त्रि न कुणि मी महापौर
किंवा न कुणी महाचोर
त्यामुळे जायचे परदेशी
स्वप्नातच याची खात्रीशी
पण प्रयत्न केले लेकाने
अन् साथ त्या दिली नशिबाने
त्यामुळे जाय तो अमेरिका
मग मीहि साधला तो मौका
परदेश त्यामुळे एक भला
तो यू.एस्.ए. ची असे मला
स्वर्गात कोण जाउनी आले
पण जे सगळ्यानी वर्णियले
ते वर्णन लागू येथ पडे
जणु स्वर्गद्वारचि हो उघडे
सुंदर रस्ते सुंदर जागा
सुंदर झाडे सुंदर बागा
सुंदर नारी सुंदर बाळे
पाहतो सर्व भरुनी डोळे
विस्तीर्ण पसरली किति जागा
जे हवे हवे सगळे मागा
अर्थात खिसा डॉलरभरला
तर असेल देखावा सगळा
रस्त्यात पाय ना ठेवावे
नच कारविना कोठे जावे
पण असुनी सगळे सौख्य मला
बंधनी जीव जणु सापडला
खाउनी पान मग पिचकारी
मारण्या इथे होई चोरी
रस्त्यात घशामधि कफ दाटे
थुंकण्या शिंकण्या भय वाटे
स्वातन्त्र्यदेवतेचा पुतळा
नुसता बेट्यानी उभारला
स्वातंत्र्य कसे उपभोगावे
आम्हीच तयाना शिकवावे
स्वातन्त्र्य कसे कुठले घ्यावे
ना कठिण त्यां कसे सांगावे ?
स्वातन्त्र्य किती आपल्याकडे
बागडा मुक्त जिकडेतिकडे
स्वातन्त्र्य आम्हाला सगळ्याचे
सर्वत्र हवे ते करण्याचे
रस्त्यावर नाचुन घेण्याचे
(चालणे जरी अवघड साचे)
बागेतिल पुष्पे खुडण्याचे
सिग्नल वा तोडुन जाण्याचे
ऑफिसात काम ना करण्याचे
पथि गुरांस सोडुन देण्याचे
रस्त्यातच टपरी घालुनिया
वा बसून धंदा करण्याचे
वेठीवर धरुनी जनतेला
मोक्यावर संपहि करण्याचे
स्वातन्त्र्य तिथे नसते असले
शिस्तीत वागती ते सगळे
त्यामुळे न तेथे गमे मला
हो गड्या आपला देश भला