जेथे जातो तेथे..तु माझा सांगाती

एक असच आपलं आटपाट नगर होतं. त्या नगरात एक हजाम रहात असे. बरेचसे लोक त्याच्याकडे हजामतीसाठी येत. त्याच्या या व्यवसायामुळे अनेक लोकांशी त्याच परीचय होता. त्यामधे शहरातल्या अनेक विद्वान,प्रतिष्ठीत लोकांचाही समावेश होता. हजामतीच्या व्यवसायामधुनच येणारा की काय पण त्याच्या स्वभावात बोलघेवडेपणा होता. त्यामुळे कोणी व्यापारी आले की त्यांच्याशी राज्याच्या औद्योगिक स्थितीबद्दल, कोणी शिक्षक आले की त्यांच्याशी समाजाच्या शैक्षणिक जागरुकीबाबत आणि कोणी विद्वान तत्त्वज्ञ आले की त्यांच्याशी तात्त्विक बाबींबाबत देखिल वाद घालण्याची संधी तो सोडत नसे!
           असाच एक दिवस नगरातला एक अतिशय आदरणीय आणि महान तत्त्वज्ञ हजामतीसाठी आला... झालं...आता स्वतःची बौद्धीक पातळी किती उच्च दर्जाची आहे हे सिद्ध करायची त्या हजामाला लहर आली!
आणि ' परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ' हा गहन विषय त्याने चर्चेला घेतला. एकीकडे हजामत करता करता त्याच्या तोंडाची टकळीदेखिल अखंड चालु होती!
" परमेश्वर वगैरे म्हणुन या जगात नाहीच मुळी... सगळा कल्पनेचा खेळ ..अहो जर परमेश्वर असता, तर कोणी दुःखी दिसलं असतं का  जगात? प्रत्येकजण कसलं ना कसलं चिंतेच ओझं वाहतोय! परमेश्वर असता तर सगळ्यांची दुःख त्याने दूर नसती का केली? न्हाव्याने स्वतःचे मत मांडले.
उत्तरादाखल विद्वानाने त्याच्या कडे पाहुन केवळ एक स्मितहास्य केलं..आणि तो निघुन गेला. न्हाव्याच्या चेहऱ्यावर विजयोन्माद पसरला. एवढ्या विद्वान तत्त्वज्ञालादेखिल आपण आपल्या सडेतोड मुद्द्याने निरुत्तर केले या जाणिवेने त्याचा अहंकार सुखावला.
दुसऱ्या दिवशी तोच विद्वान एका दाढीमिशा वाढलेल्या, केसांच जंजाळ अस्ताव्यस्त पसरलेल्या माणसाला घेऊन त्या न्हाव्याच्या दुकानात दाखल झाला, आणि न्हाव्याला म्हणाला, " जगात कोणी न्हावी, हजाम नाहीतच मुळी! न्हावी असते तर अशी केस, दाढीमिशा वाढलेली माणसं दिसली असती का कधी?"
न्हावी स्तिमित होऊन त्याच्याकडे पहात राहीला.. "असं का म्हणता प्रभो? मी स्वतः एक न्हावी असुन तुम्ही मलाच हे सुनावताय? जगात न्हाव्यांची कमी नाही.. पण या माणसाने माझ्याकडे यायला नको का? मी कुठे कुठे जाणार अशी माणसं शोधायला? शेवटी मी पण.."
विद्वानाने त्याला मधेच थांबवले .. म्हणाला, " मित्रा, तु काल जे काही म्हणत होतास ना त्याला माझं ही असच उत्तर आहे. जगात परमेश्वर नाही असं नाहीये.. पण तुला काही दुःख, चिंता असतील तर स्वतःहुन त्याच्याकडे जा.‌ श्रद्धापूर्ण मनाने त्याला आठव...तुझं दुःख त्याला सांग... तुला कोणत्या ना कोणत्या रुपात त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही...फक्त गाढ विश्वास तुझ्या मनी हवा..एवढं बोलुन विद्वान तिथुन चालता झाला.
न्हावी त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पहातच राहीला.. परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याची ओढ त्याच्या मनी निर्माण करुन विद्वान तिथुन गेला होता!


मूळ स्त्रोत--- ई-पत्राद्वारे आलेल्या कथेचा स्वैरनुवाद करण्याचा प्रयत्न.