पुरुषांस,


नमस्कार,


मी नुकतीच मनोगतावर आले... मनोगतावरची पूर्वीची लेखने वाचताना काही काही ठिकाणी पुरुषी प्रवृतत्तीचे भीषण चित्रण करणारे  काही लेख आणि काही तितक्याच जहाल कविता वाचायला मिळाल्या.. आणि थोडेसे वाईट वाटले की पुरुष म्हणजे दैत्य असे काही समीकरण नाही!


मी ही एक स्त्री आहे... आणि ती पण याच कलियुगात जन्मलेली! त्यमुळे असभ्य नजरा आणि निर्हेतुक वाटणारे सहेतुक स्पर्श यांचा मलाही चंगलाच अनुभव आहे!


तरी पण पुरुष म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते म्हणजे शाळेमधले, कॉलेजमधले अनेक सद्वर्तनी मित्र... मैत्रिणिंचा आदर करणारे मित्र... कार्यालयातील अनेक चांगले, सुसंस्कृत सहकारी... आणि अशा चारित्र्यशील पुरुषांना पाहिल्यावर असे वाटते की असा जीवनसाथी मिळाला तर का नाही स्त्रीला समर्पणाची भावना येणार?


ह्या पार्श्वभूमेईतून सुचलेली ही एक कविता...


पुरुषांस,


 


तुझे ते तेज, ते कर्तृत्व पुरुषी,


दिव्य ती प्रभा तुझ्या शूरतेची!


 


तुझी बुद्धीमत्ता, एक सौन्दर्य खास,


कमान चढती तुझ्या विक्रमांची!


 


तुझी नीतिमत्ता, अचल अन विवेकी,


लालसा न तुजला, नग्न वासनेची!


 


परी लोचनी प्रीतीची माधुरी अन


शरीरात मदिरा धुंद मदनाची!


 


तुजसाठीच पुरुषा, प्रकृती जन्मले मी,


चल संगमात न्हाऊ, करु निर्मिती युगाची!


 


ये राजसा तू, असा आज दारी


करी गोड इजा, तुझ्या त्या शराची!


 


तुझ स्पर्श, शृंगार, तो रति-विलास


अनिवार ओढ ही तुझ्या मीलनाची!


 


असा मेघमल्हार घेउन ये की.


बरसेल धारा, अमृताच्या सुरांची!


 


तुझ्या कामयज्ञात होईन दग्धा


देईन मी आहुती जीविताची!


 


तुजकवेत जीवन, समवेत मृत्यू


गातील गाथा, जन, एका सतीची!