ऐनवेळी तोल गेला हासताना!
चेहरा गंभीर झाला हासताना!
उत्तराची वाटते भीती अताशा...
का तुझा होकार आला हासताना?
पाहुनी मज, लाल डोळ्यांचा फकीरा-
"जागणे टाळा", म्हणाला हासताना!!
चारचौघांसारखा साधाच होतो!
फक्त होता गाल ओला हासताना!!
जो दिला तो शब्द माझा पाळला मी!
प्राण सुद्धा सोडलेला हासताना!!
मी कुठे रडलो तुझ्या विरहात वेडे?
कस्पटाने घात केला हासताना!!!