विस्मृती कि कृतघ्नपणा?

आपली भारतीय जनता फार विसराळू आहे असे म्हटले जाते. अर्थात ते मतदानाच्या संदर्भात. कारण मागच्या वेळी निवडून दिलेल्य आपल्या लोकप्रतिनिधीने गेल्या ५ वर्षात आपल्याला तोंडहि दाखविलेले नाही हे विसरून ती परत त्यालाच निवडून देते. पण काही बाबतीत हा विसराळूपणा म्हणावा कि, कृतघ्नपणा असा प्रश्न पडतो.


झालं काय, आज सकाळी मी पेपर वाचायला घेतला. मी एका बातमीसाठी सगळा पेपर चाळला पण मला काही ती बातमी किवा त्यसंबंधातील जाहिरात काही कुठे सापडेना. तरी शेवटी एक छोटीशी का होईना पण ती बातमी मिळाली.


         इंदिराजीना आदरांजली


मुंबईचे महापौर दत्ता दळवी यानी आज स्व. श्रीमती इंदिरा गांधी याना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहिली. बस!


एके काळी काँग्रेसमधील एकमेव पुरूष असे म्हटल्या जाणऱ्या, अमेरिकेचे सातवे आरमार बंगालच्या उपसागरात उभे असताना त्याला भीक न घालता पाकिस्तानच्या १ लाख सैन्याला भारतीय लष्करापुढे गुडघे टेकायला लावणाऱ्या, भारत रत्न म्हणून गौरविलेल्या, विरोधी पक्षनेत्यानेहि दुर्गा म्हणून सलाम केलेल्या भारताच्या एक कणखर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा काल जन्मदिवस होता. पण एकेकाळी स्वतःचे बालेकिल्ले, आणि सुभे सुरक्षित रहावेत म्हणून इंदिरा इज इंडिया म्हणून तिचा पदर धरून राहणाऱ्या काँग्रेसजनानाही त्यांची आठवण होऊ नये यापरते दुर्दैव ते कोणते, ते सुद्धा तिची लाडकी स्नुषा काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना?