तेजस्विनी-२

                        ~तेजस्विनी भाग २~


"त्यात ठरवायचं काय ? संतोषभाऊंनीच अध्यक्षपदासाठी प्रयत्न करावा. देसाई दरवेळी उगीचच पिल्लू सोडतात" सुरेखाताईंचे मत कपडे बदलता बदलता राजाभाऊ शांतपणे ऐकत होते.
"नाही, ते जर परिषदांच्या निवडणुकांना उभे राहिले तर नक्कीच निवडून येतील पण सरकारच्या अधिनियमामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले किंवा मिळाले नाही तर तो त्यांचा अपमान होईल." राजाभाऊ उत्तरले.
" तुमचे उगीच काहीही, त्यात काय इतका मोठा अपमान होणार ? असले तर पद स्वीकारावे, नाही तर दुसऱ्या पदाकडे वळावे माणसाने....." सुरेखाताई व राजाभाऊंचा संवाद सुरू होता.
राजाभाऊ कधीही पत्नीला 'तुला काय कळतंय' ह्या अर्थाने हिणवत नसत. स्वतः:ची मते तिने मांडावीत ह्यासाठी ते आग्रही असत.
"मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' राजाभाऊंच्या प्रश्नाचे उत्तर सुरेखाताईंकडे नव्हते.
" जाऊ द्या, मला झोप येतेय...." असं बोलत, त्या वैशालीला कुशीत घेऊन झोपण्याची तयारी करू लागल्या.


"मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' ह्या आपल्याच वाक्यावर राजाभाऊ विचार करू लागले. विधानसभेच्या निवडणुकांत नानासाहेब पाटलांच्या विरोधात संतोषभाऊ उभे राहिल्यास काय होऊ शकेल ह्याचा विचार करता करता त्यांना झोपेने घेरले.
***********************
"काय मास्तरीण बाई, आमचं पोरगं धडं शिकत हाय की न्हाय शाळेत ?" सुनील पाटलाचा आवाज सुरेखा ताईंनी ओळखला व 'दैनिक लोकशाही' मधून डोकं वर काढून त्यांनी सुनील पाटलाकडे रोखून पाहिले. "काकी कशा आहेत ?" त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला.
"आता तुमी घराला यावा काकीची चौकशी करायला. पोराची चौकशी करण्यासाठी आलू आमी इथं" पाटलाच डोकं ठिकाणावर येत नव्हत. समोरची मास्तरीण आपली भावजय आहे हेही तो विसरला होता. 
"शिक्षणाचा व पाटलांचा संबंध असतो का कधी ? ह्या इयत्तेत पास झाला तर तुमच्या ऐवजी, मी पेढे वाटीन.. बरं भाऊजी !" सुरेखा ताईंना ह्या प्रकारांची चांगली सवय झालेली होती. इतक्या सहजा सहजी त्या पाटलाशी बोलण्यात हरल्या नसत्या.
"पाटलांना शिकून कुठल्या शाळेत नोकरी करायची हाय का ? जमीन अन शेती बघायला फुरसत न्हाय आमच्या कड तिथं खर्डेघाशी कोन करील?" पाटील फुकाचा रुबाब दाखवत बोलला.
"मग पोराला शाळेतून घरी न्यायला आलात, असं सांगा की भाऊजी; विलास..... साहेबांना मुख्याध्यापकांकडे घेऊन जा, म्हणावं पिंटूचे वडील आले आहेत त्याचे नांव कमी करायला..... भाऊजी, तुम्ही ह्याच्या बरोबर जा" सुनील पाटलाचं तोंड जोडा मारल्यागत झालेले पाहून टीचर्स रूम मध्ये बसलेल्या सगळ्या शिक्षकांना आतून आनंदच झाला.
"तसं काय बी न्हाय वैनीबाय, आमी आपलं चौकशी करायला आलो व्हतो पोराची; तुमास्नी उगीचच राग आला" सारवासारव करायच्या मूड मध्ये पाटील बोलले.
"आता हो भाऊजी, वैनी कधी रागावेल का लहान दिरावर ? चौकशी झाली असली तर जाऊ म्हणते, गणिताचा तास घ्यायचा आहे वर्गात." सुरेखा ताईंनी सुनील पाटलाला स्वतः:च्या जागेची ओळख करून दिली.
"आयला, वैनीताई लई गरम माथ्याच्या हैत की तुमच्या" एक चमचा सुनीलला टीचर्स रूमच्या बाहेर आल्या आल्या बोलला.
"लई माज चढलाय ह्यांना, त्यो संतोषभाऊ जवळचा वाटतो आमच्या पेक्षा, ईलच कधी काम सांगायले घरी तवा बघीन सालीला"


"काय मास्तुरे, बरं हाय ना?", मुख्याध्यापकांच्या खोलीत सरळ शिरत सुनील बोलला.
"या, पाटील, आज कशी आम्हा गरीबाची आठवण आली ?" हेडमास्तर दीनवाणे पणाने बोलले.
"आमच्या वळखीच्या एक बाई हाईत पाडळस्याच्या प्राथमिक शाळेत, त्यांन्सी इथं ट्रान्स्फर करून घ्या मास्तर"
"आस्स व्हयं, काय नांव म्हणलात बाईंचं ?" हेडमास्तरांनी विचारले.
"मोहिनी इंगळे नांव हाय, इथल्याच हैत, यायला जायला अक्षी तरास होतो बाई माणसाला म्हणून आलो होतो खास "
"बरयं, जरा तहसीलदार कचेरीत ही सांगा, म्हणजे ट्रान्स्फर चं काम लौकर हुईल" मास्तरांनी सुचवले. मास्तरांना माहीत होते, ह्या मोहिनी इंगळेंची बऱ्याच जणांनी शिफारस केली होती. नानासाहेब पाटलांच दिवटंही तीच्या मागे लागलंय म्हणजे काही तरी वेगळंच प्रकरण असणार. मास्तरांनी लगेच पाडळस्याची फाइल मागवली.
***************************
राजाभाऊ कॉलेजातली लेक्चर्स सुरू असतानाच, मोकळ्या वेळेत संतोष चौधरींना भेटायला गेले. त्यांचे कार्यालय कॉलेज पासून जवळच असल्याने फारसा प्रयास पडणार नव्हता. दोनच क्षणांत संतोषभाऊंनी त्यांना स्वतः:च्या दालनात बोलावले.


"काय घेणार ? चहा की काही थंड ?" बसत नाही तोच त्यांनी प्रश्न विचारला.
"चहा चालेल" राजाभाऊंनी बऱ्याच वेळा येथे येण्याचे केले असल्याने त्यांना सरांच्या पद्धती चांगल्याच ठाऊक होत्या.
" कालच्या बैठकीत तसा निर्णय काहीच घेता आलेला नाही, प्रत्येकाचे मत स्वतंत्र्यपणे ऐकणे चांगले म्हणून  मी सर्वांनाच एक एकटे भेटायला बोलावले आहे." संतोषभाऊंनी प्रस्तावना केली.
"बरोबर आहे सर..... माझ्या मते आपण सरळ विधानसभेच्या जागेसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहावे." राजाभाऊंनी मुद्द्यालाच हात घातला.
मेजावर पडलेल्या पेपर वेट फिरवत संतोषभाऊ विचार करून म्हणाले, "मग झेड पीच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवार तयार करावा लागेल."
"देसाईंना विचारले तर ?"
"नको नको; त्यांच्यावर दूध महासंघाची बरीच जबाबदारी आहे. त्यावर आधिपत्य ठेवणे भाग असल्याने त्यांना मी हालवू शकत नाही. मला तुमच्याबद्दलही विचार करायचा नाही; कारण राजकारण हे तुमचे क्षेत्र नाही राजाभाऊ, वाईट वाटू देऊ नका"
"नाही सर..... तो विचार तर मी स्वप्नातही करणार नाही" राजाभाऊ गडबडून म्हणाले.
"राजाभाऊ तुम्ही व देसाई माझे कायदे विषयक सल्लागार म्हणून जवळ आहात त्यातच मला समाधान जास्त आहे." संतोष भाऊ स्वगत बोलल्यागत बोलले.
"आपल्या जवळच्या वर्तुळात बरीच मंडळी आहेत सर; वासूभाऊ, फिरके, शेळके मास्तर, विचारे साहेब, भराडे बाई....." राजाभाऊ पटापट नांव घेत होते.
"भराडे बाई म्हणजे तोफखाना आहे.... काही वेळा राजकारणात इतके उतावीळ होऊन चालत नाही, पण त्यांना समजावण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. ह्या वेळीच जर महिला उमेदवार दिला तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तो प्लस पॉंईंट ठरेल"
"प्रियाला विचारून बघा नं सर" राजाभाऊ सहज बोलले.
"प्रिया पेक्षा वहिनींचा विचार मी करत होतो" पटकन संतोषभाऊंच्या तोंडातून वाक्य पडलं.
"बापरे, सुरेखाला कसे जमेल ? नाही नाही, नको सर....." राजाभाऊ घाईघाईत बोलले.
"राजाभाऊ, निवडणुकीला उभे राहिले म्हणजे निवडून आलेच असे नाही..... व निवडून आले म्हणजे पोस्ट मिळाली असे नाही.... विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी झेड पी च्या निवडणुका आहेत. आपल्याला स्वबळावर कितपत निवडणुका लढवता येतील हे झेड पीच्या निवडणुकांतून कळेल."
राजाभाऊंना सरांनी सांगितलेला शब्द न शब्द पटत होता पण सुरेखाचे नांव झेड पी च्या निवडणुकांसाठी येऊ शकेल ह्याचा स्वप्नातही त्यांनी विचार केलेला नव्हता.
"राजाभाऊ, शांत पणे विचार करा. मला पूर्णं कल्पना आहे की राजकारण घाणेरडे असते. पण चिखलात सगळी बेडकीच नसतात तर कमळेही उगवतातच ना !" 
"......!" राजाभाऊ निःशब्द होते.
"वहिनी शिकलेल्या आहेत, शिक्षिका आहेत, स्त्रियांच्या समस्यांची जाण त्यांना आहे. तालुक्यातले प्रश्न त्यांना ठाऊक आहेत व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात राजकारणी व्यक्तीला लागणारा तडफदारपणा आहे......" संतोषभाऊंनी नेमक्या शब्दांत केलेले तंतोतंत वर्णन ऐकून राजाभाऊ निरुत्तर होत होते.
"राजाभाऊ, आपण सुशिक्षितांनी काठावर उभे राहून गंमत किती काळ पाहायची ? वर आपणच सिस्टिमला दोष देतो पण जोवर सुशिक्षित मंडळी सक्रिय राजकारणांत उतरणार नाहीत तोवर पाटलांसारख्या व्यक्तींचे घाणेरडे चाळे आपल्याला सहन करावे लागतील."
"सर, मी तिला सांगितले तरी ती ह्या बाबतीत माझे ऐकणार नाही" राजाभाऊंनी शेवटचा प्रयास करून पाहिला.
"मान्य !...मी सांगून पाहतो, मग त्या नक्कीच तयार होतील. आज आपल्याकडेच सायंकाळचा चहा घेऊया, म्हणजे निवांत गप्पाही मारता येतील. वहिनींना सांगा, चहाबरोबर माझी आवडती भजीही तयार ठेवा !"
************
   "संतोषभाऊ, मोकाशी म्हणून कोणा गृहस्थांचा फोन आहे" "द्या त्यांना लाइन " मोघम संतोषभाऊंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला सांगितले.
"नमस्कार भाऊ.... मी मोकाशी बोलतोय"  "बोला मोकाशी, काय सेवा करू आपली ?"
"काय भाऊ, लाजवता पामराला, मीच आपली सेवा करण्यास फोन केला..... जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आलेला आहे, ह्यावेळी परिषदेच्या ३३% जागा महिलांसाठी राखीव आहेत पण अध्यक्षपद दोन निवडणुकांनंतर महिलांना मिळावे अशी शिफारस केलेली आहे" मोकाशीने एका दमांत बातमी सांगितली.
"मोकाशी, ३३% म्हणजे किती जागा होतील नक्की ?" उगीचच काहीतरी विचारायचे म्हणून संतोषभाऊ म्हणाले.
"१६ जागा होतात साहेब- एकूण ४७ जागा आहेत पण....."
"कळलं, ह्या निवडणूकीपासूनच सुरुवात होणार मग अध्यक्षपद महिलेला की पुरुषाला देणार मोकाशी ?"
" भाऊ, यंदा निवडणुका झाल्यावर झेड पी मेंबर जे नक्की करतील त्यानुसार अध्यक्षपद दिले जाईल. आता सर्व काही मेंबर्सवर अवलंबून असेल." मोकाशींनी रिपोर्ट दिला. 
"बरयं, मी कचेरीत येऊन भेटतो तुम्हाला उद्याच" भाऊंनी निरोपाचे वाक्य उच्चारले.  बरं एव्हढेच म्हणत मोकाशीनेही संभाषण तोडले.
******************
"सुहासराव जरा डोस्क ठिकाणावर आना अन आमी काय सांगतूय ते ऐकून घ्या" नानांच्या समोर बसलेल्या सुहास पाटलाला फर्मान सुटले तसा तो गोंधळला. "व्हयं दाजी" अस तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो समंजसपणाचा आव आणून नानासाहेबांसमोर उभा राहिला.
"ह्या निवडणुकांमधी १६ जागा बायकांसाठी रिजर्व ठेवल्यात सरकारानं, आता जरा बाई माणसाशी वागताना, बोलताना तोंडातली लाळ आवरत चला. न्हायतर आमी तिथं विधानसभेची तयारी करीत राहू अन इथं तुमी बायकांच्या मागे लागून हातची सत्ता गमावाल" नानांचा आवाज करडा होत चालला होता. सुहास मान खाली घालून उभा होता. त्याला आपल्या बापाचा स्वभाव चांगलाच माहीत होता. वयाने मोठी झाली असली तरी दोन्ही दिवटी नानांसमोर नजर उचलायची हिंमत करीत नसत. 
"त्या मोकाश्याला शिव्या घालताना मागे तो चौधरी उभा आहे ह्याचे भान होते का तुम्हाला?" नानांचा आवाज चढत होता. "अशा रितीने सार्वजनिक ठिकाणी डोस्कं फिरवून घेतलं तर ऐन निवडणूकीच्या काळात जनतेची दुश्मनी ओढवून घ्याल. आता विधानसभेच्या निवडणुका होई पर्यंत थोबाडावर लगाम लावायला शिका" नानांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली अन त्याच वेळेला सुनीलने प्रवेश केला.
"या... इंगळे बाईंच्या कामासाठी गेला होतात वाटत ?"
"........."  आपल्या बापाला घरबसल्या गावातल्या गोष्टी कश्या कळतात ह्याचेच दोघांना आश्चर्य वाटायला लागले.
"दोघांनाही जतावून सांगतोय, निवडणुकांच्या काळात काही भानगडी गावांत कराल तर गावकऱ्यांसमोर तंगड तोडीन मी..... तुमच्या बरोबर फिरणाऱ्या लोकांनाही सांगून ठेवा, ह्या काळातल्या कुठल्याही भानगडीत मी तुम्हा लोकांना मदत करणार न्हाई."
"व्हयं दाजी !" हजेरी द्यावी तसे दोघे एक सुरात बोलले.
" सुनीलराव, उद्यापास्न दादा बरोबर फिरायचं. ह्याच टाळकं जिकडे सरकेल तिकडेच त्याला आमची आठवण करून द्यायचे काम तुमचे. त्या चौधरीच्या बरोबर कोण कोण फिरतो, त्याचे रिपोर्ट हवेत मला रोज च्या रोज" नानासाहेब राजकारणातले बारकावे जाणून होते, दोघा पोरांनी आपल्या कडून काहीतरी शिकावे अशीच त्यांची सतत इच्छा होती.
"दाजी, जाधवांकडची मंडळी त्याच्या माग पुढं फिरत असत्यात" सुनीलने चुगली केली
"व्हयं, राजाभाऊला शिक्षणाचा अभिमान चढलाय, त्याला तो चौधरी फूस देतोय. त्यात बायको शिकलेली असली म्हंजी घराची शाळा व्हनारच" नानांचा राजाभाऊंबद्दलचा राग उफाळून आला. "चुलत्याने घरभेदी पणा न्हाय करायचा तर कुणी करायचा ?" नानासाहेब पाटलाच्या तोंडावरून तो आतल्या आत जळत असल्याचे कळत होतं. "मला लई शानपना शिकवत होता येता जाता, आता चौधरीला शानपना शिकव म्हणावं"
"नाना, एक गुन्हा माफ करा... त्याला जिंदगीभरचा धडा शिकवतू" सुहासचे टाळके कधीच त्याच्या ताब्यात राहत नसे.
"गाढवीच्या तुला कोणत्या भाषेत सांगू आता ? विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत काही लफडी न्हाई पायजेत.... जावा आता"
दोघांनी पडत्या फळाची आज्ञा झेलली. 


*************
"भज्यांची तयारी झाली आहे" सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाल्या तेव्हा राजाभाऊ कसलेसे पुस्तक वाचत होते. "छान, आता अवतार ठीक कराल ?" हळूच त्यांनी विचारले तश्या सुरेखाताई खळखळून हसल्या. "हो, मला माहीत आहे, पण करणार काय राजपुत्राशी लग्न थोडी केलेय.... नोकरांकडून सर्व करवून घ्यायला ? आपलं आपल्यालाच करणे भाग आहे" त्या गमतीने म्हणाल्या.
"कळतात बरं आम्हालाही असली बोलणी, आता स्वयंपाकीण बाईच आणतो आपल्या दिमतीला" राजाभाऊ खोट्या रागाने बोलले.
"आईंना हल्ली झेपवत नाही वैशालीला सांभाळायला.... ती रोज अंगणातून थेट रस्त्यावर धावते...." त्यांचे वाक्य संपण्याच्या आतच दूध फेडरेशनची पांढरी ऍम्बेसेडर दारात उभी राहिली तश्या त्या लगबगीने कपडे बदलायला आत गेल्या. राजाभाऊ उठून दाराकडे जात असतानाच संतोषभाऊ व वहिनी आत आल्या. मालती वहिनींना पाहून राजाभाऊंनी आनंद मिश्रीत आश्चर्याने त्यांचे स्वागत केले, "वहिनी आज अगदी आश्चर्याचा धक्काच दिलात की....." दोघांनाही घेऊन ते बैठकीच्या खोलीत आले- बसा म्हणेस्तोवर वहिनी चक्क आतल्या खोलीकडे वळल्याचे पाहून त्यांना अजूनच अचंबा वाटला.


"तुम्ही कल्पना दिली असेलच सुरेखावहिनींना ?" संतोषभाऊ लाकडी खुर्चीवर बसता बसता बोलले
"नाही, मी म्हटलं आपणच सांगावं तिला सगळं काही"
थोड्याच वेळांत दोघी बाहेर आल्या. मालती वहिनी वैशालीला मांडीवर घेऊन तिचे कोडकौतुक करीत होत्या.  
हसत हसत इकडच्या तिकडच्या गप्पा, शाळेतले विविध प्रसंगावरून हास्य विनोद सुरू झाले.


"सुरेखा वहिनी, शाळेच्या मुख्याध्यापिका होण्यासाठी काय पात्रता असावी लागते बरे?" हळूच संतोषभाऊंनी विचारले.
"नको बाई ती कटकट कोण मागे लावून घेईल ?" पटकन त्या बोलल्या.
"अहो, तुमच्या साठी नाही म्हणत ते....नुसती चौकशी करताहेत" राजाभाऊंनी सिक्सर ठोकली तसा हास्याचा धबधबा उसळला....तर सुरेखाताई चक्क लाजल्या.
"नाही पण राजाभाऊ, मी चौकशी त्यांच्यासाठीच करतोय. !" हसत हसत संतोषभाऊ बोलले. गप्पांच्या ओघात सुनील पाटील शाळेत आल्याचा किस्सा सुरेखा ताईंनी सर्वांना ऐकवला.
"सुरेखा वहिनी आता तुम्हीच पाटलांची तोंड बंद करू शकाल. झेड.पीच्या निवडणुका जवळ येताहेत. आम्हाला निवडणूकीच्या प्रचाराला मदत कराल ना ?" संतोषभाऊ राजाभाऊंना डोळे मिचकावत बोलले ते सुरेखाताईंच्या लक्षातच आलेले नव्हते.
"मी कसली कपाळ मदत करणार तुम्हाला, तुमच्या राजाभाऊं इतकी शिकलेली थोडीच आहे !" सुरेखाताईंनी वचपा काढला तसे सगळे परत हास्यात बुडले.
"मी मात्र गंमत करीत नाही आहे, निवडणूक प्रचारातच नव्हे तर प्रत्यक्ष परिषदेच्या सभासद म्हणून आपण निवडणूकीला उभे राहण्यास काहीच हरकत नाही."
"इश्श, वैशु व शाळेची नोकरी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात, तीथं परिषद काय सांभाळणार डोंबल ?" ठेवणीतली प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या.
"त्यात कठीण ते काय आहे ? इतर स्त्रियाही स्वतः:चे संसार सांभाळून करतातच ना सर्व काही !" संतोषभाऊ हळूहळू विषयावर येत होते हे राजाभाऊंना कळून चुकले.
"आम्ही सर्वसामान्यांच्या पोरी भाऊ, आम्हाला हे कुठे झेपणार ?"


"राजाभाऊंसारखा जीवनसाथी असूनही तू असं म्हणावं म्हणजे कमालच आहे सुरेखा....,
आमच्याकडे उठत्याबसत्यांचा राबता असतो सतत, प्रियाचा व प्रियांकचा अभ्यास, त्यांच्या खाण्यापिण्याचे नवनवीन चोचले, त्यातच सतत खणखणारे फोन, आत्यांचे आजारपण सर्व काही करायला लागते!....
अगं तुझ्या छोट्या घरकुलात मावशी तर मदत करतातच ना ?  घर व नोकरी सांभाळल्यामुळे  तुला जाण आहे स्त्रियांच्या प्रश्नांची; मग तूच आपल्या प्रश्नांना वाचा नाही फोडली; तर कोण फोडणार ? " मालती वहिनींनी नवऱ्याची री ओढली.


विषय हळूहळू नेमक्या मुद्द्यावर आणण्यात संतोषभाऊंचे कसब वाखाणण्याजोगे होते.
"वहिनी, आपणांस नाही वाटत, जे आपल्या आजूबाजूला घडत आहे त्यासाठी अजाणता आपण स्वतः:ही कारणीभूत आहोत?  असल्या व्यक्ती ज्यांची चपराशी बनण्याची लायकी नाही ते परिषदेचाच नव्हे तर एखाद्या राज्याचाही कारभार हाकताहेत " संतोषभाऊंनी सरळ सरळ आव्हानात्मक भाषण ठोकायला सुरुवात केली...
"आपण काय करू शकणार त्यासाठी ?" राजाभाऊंनी गाडी पुढे जावी म्हणून हळूच पिन मारली.
"राजाभाऊ आपण शिकली सवरलेली मंडळी राजकारण म्हणजे जणुकाही गजकरण किंवा महारोग असावा त्याप्रमाणे त्यापासून लांब राहतो. निवडणुका लढवणे तर सोडा; काही अहंमन्य पांढरपेशे मतदानाचा दिवस आळसात झोपा काढून घालवतात. मग नंतर 'सरकार काय झोपा काढते की काय' असल्या प्रतिक्रिया वर्तमानपत्रांतून किंवा एखाद्या संकेतस्थळावरून देतात !"
सगळेच गंभीरतेने ऐकत होते.
"आपल्या पैकी प्रत्येकाला वाटतेच की, कुठेतरी काहीतरी चुकते आहे. बऱ्याच जणांना नेमके काय चुकते आहे त्याची जाण आहे. काही जण ते इतरांना समजावण्याचा प्रयत्न करतात. फार थोडे त्या विरुद्ध लढा द्यायचा प्रयत्न करतात पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच अण्णा हजारेंसारखे सतत आंदोलन छेडून ह्या विरुद्ध जनमत तयार करतात..... आपण फक्त थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो व त्यांची नावे सकाळ सायंकाळ आळवतो पण आपल्यातले किती जण त्यांच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात ?"  संतोषभाऊ आळीपाळीने तिघांकडे बघत बोलत होते.
हाडाच्या शिक्षक असलेल्या राजाभाऊंना व सुरेखाताईंना त्यांचे वाक्य न वाक्य पटत होते.


"वहिनी, राजाभाऊंच्यात मनमिळाऊपणा आहे पण ते फार सरळ आहेत स्वभावाने.... त्यांच्यात हजरजवाबी पणा किंवा ती तडफ नाही जी एका राजकारणी माणसाला आवश्यक आहे..... ते माझे अत्यंत जवळचे व उत्कृष्ट सल्लागार म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो. पण तुम्हाला स्त्रियांच्या प्रश्नांची जाण आहेच.....
तुम्ही सरकारी नोकरी केली आहे तिथल्या प्रश्नांची जाण आहे.....
शिक्षण हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे क्षेत्र तुम्ही अगदी खालच्या तळाला अनुभवलेले आहे.
सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे पण वाचाळपणा नाही हा राजकारणी माणसातला सर्वात मोठा गुण तुमच्या जवळ आहे.....
आपल्या पूर्ण तालुक्यातल्या कुठल्याही राजकारणी स्त्रीला आपला हेवा वाटेल असे व्यक्तिमत्त्व आपल्याकडे आहे म्हणून तुमच्याकडून माझ्या पक्षाची सेवा करवून घ्यायला मी आलो आहे. माझा तसा आग्रह समजा व माझ्या आग्रहाचा मान ठेवा......."


"बापरे, भाऊजी तुम्ही तर मला पार हवेत तरंगायला लावलं, इश्श त्यात इतकी काय गळ घालता, तुम्ही हुकूम द्या, मी निवडणूक लढवायला तयार आहे......" सुरेखाताई भारावलेल्या शब्दांत बोलल्या. 


   संतोषभाऊंनी राजाभाऊंकडे विजयी मुद्रेने डोळे मिचकावत बघितले.


                         पुढील भाग लवकरच येत आहे.