ह्यासोबत
नानासाहेब पाटलांनी कपाळावर हात मारून घेतला. नको त्या वेळेस सुहास पाटलाने लचांड उभे केले होते. पक्षश्रेष्ठी कुठल्याही परिस्थितीत झाला प्रकार खपवून घेणार नाहीत ही गोष्ट ते जाणून होते. त्यांनी तातडीने जळगांवला फोन लावला. रावसाहेबच त्यांना ह्या प्रकारणातून तारतील ही त्यांची खात्री होती.
रावसाहेब गाजरे त्यांचे सख्खे मामा. बहिणीच्या मुलांवर, नाना, दिघू, प्रदीप त्यांचे अतोनात प्रेम होते. दिघू म्हणजे नानांच्या खालचा भाऊ संन्यास घेऊन परागंदा झाला. प्रदीप दुबईला गेला तो परतून आलाच नाही. तेथेच त्याने कसलातरी व्यवसाय सुरू केला. एका केरळी ख्रिस्ती मुलीशी लग्न केल्याचे निमित्त करून नानांनी त्याच्याशी संबंध तोडले व त्याला वाळीत टाकले.
आपोआपच वडिलोपार्जित सगळी मिळकत नानांची झाली.
राजाभाऊ जाधवांच्या वडिलांची आई रावसाहेबांची दुसरी बहीण. राजाभाऊंच्या आजोबांशी तिचे लग्न झाल्यावर जाधव कुटुंबीयाचे जमिनींच्या वादावरून गाजरेंशी वाजले तेव्हा पासून गाजरे कुटुंबीयांनी जाधव कुटुंबाशी उभे वैर धरले. नानासाहेबांचे वडील सज्जन म्हणून त्यांनी वैर जरी नाही धरले तरी फक्त लग्न किंवा मर्तिक प्रसंगीच जाण्या इतके संबंध ठेवले.
रावसाहेब गाजरे "विकास आघाडी" चे मोठे प्रस्थ होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्षाचा जिल्ह्यातला आधारस्थंभ रावसाहेबांच्या वाड-वडिलांपासून चालत होता. सध्या वयोमानामुळे सक्रिय नसले तरी जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा तेच होते. त्यांचा मुलगा, राजेंद्र्कडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद होते.
सुहासने अट्रावल वर केलेल्या हल्ल्याची तक्रार करण्यास सुरुवातीला अट्रावलकर तयार नव्हते. सरपंचांनी अजिजीने अट्रावलकरांना भानगडींपासून दूर राहण्याचे आवाहन केले परंतू ते ठरले नानासाहेब पाटलांच्या गोटातले..... चंद्या किंवा गण्या सारख्या तरुण रक्तात दादागिरी व अन्याया विरुद्ध दाद मागण्याची वृत्ती असल्यानेच फौजदार बोरसेंनी सुहास पटलाविरुद्ध प्रथमच लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीत गुंडांच्या साहाय्याने गावावर सशस्त्र हल्ला केल्याचे नमूद करण्यात आल्याने तक्रार गंभीर स्वरूपाची होती.
प्रथमच नानासाहेब पाटलांच्या अन्याया विरुद्ध पोलिसात तक्रार करायला कोणी धजावले होते.
पाटलांच्या दैवचक्राच्या उतरंडीची सुरुवात झालेली होती.
**************************************
महत्त्वाच्या विषयावरील चर्चेस, दूध महासंघाच्या कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील बैठक कक्षांत, मंडळींना पाचारण करण्यात आलेले होते.
वासूभाऊ, विचारे, शेळके मास्तर, फिरके, देसाई, भराडे बाई, सुरेखा ताई, राजाभाऊ तसेच "जन जागृती" पक्षाच्या शाखांचे १९ पदाधिकारी, स्वत: संतोषभाऊ व त्यांचे स्वीय सहाय्यक, दूध महासंघाचा एक मराठी लघुलेखक व कारकून मिळून ३२ सदस्य बैठकीला उपस्थित होते.
सर्वप्रथम अट्रावल वर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल देसाई साहेबांनी थोडक्यात म्हणजे चांगली अर्धा तास माहिती दिली. माहिती देत असताना त्यांनी योग्य वाक्यांवर जोर देत तर कुठे हळवे पणाने बोलत घडलेली घटना विस्तृतपणे सांगितल्याने जी मंडळी अट्रावलच्या मदत कार्यांत हजर नव्हती, त्यांच्यासाठी तो 'आखो देखा हाल' च होता.
अट्रावलच्या मदत कार्याचा पूर्णं खर्च दूध महासंघाने उचलल्याचे त्याच दिवशीच्या वर्तमानपत्रांत जाहिरातींद्वारे आम जनतेला कळवण्यात आलेले होते. संतोषभाऊ चौधरींनी सुहास पाटलाची कुठेही नांव न घेता केलेली जिल्हाभर निंदा ह्याचेच ते द्योतक होते. पंचक्रोशीतल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करण्यासाठी 'जन जागृती' पक्षासाठी 'अट्रावलचे मदतकार्य' हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता.
ह्यानंतर मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडल्या गेलेल्या जिल्हा पंचायतींच्या ८ जागांसंदर्भात तसेच ग्रामपंचायतीच्या जागांसंदर्भात निर्णय घ्यायचा असल्याने आजची बैठक बोलावली असल्याचे सांगत देसाईंनी वयोवृद्ध वासूभाऊंना मार्गदर्शनापार चार शब्द सांगण्याची विनंती केली.
वासूभाऊंचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवादच असे. आलेल्या शाखा पदाधिकाऱ्यांची नांवे घेत, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख करीत, ते शब्दांनी त्यांना शाबासकी देत होते. कुठे हळूच केलेल्या चुकांबद्दल हलकेच कानपिळणी होत होती. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण निर्माण करीत त्यांनी देसाईंच्या भाषणांतला होता नव्हता तो रटाळपणा काढून टाकला. भाषणाच्या शेवटी वासूभाऊंनी भराडे बाईंवर खास स्तुतिसुमने उधळली. अट्रावलला केल्या गेलेल्या मदत कार्यांत भराडे बाईंनी अक्षरश: घराघरातून स्त्रियांना वेचून काढत बोलते केले होते. महिलांच्या दु:खांचा कढ कमी करण्यास त्यांच्या शब्दांनी बरीच मदत केलेली होती. वासूभाऊ भाषण संपवून खाली बसले ते टाळ्यांच्या गजरातच..... सुरेखाताईंच्या डोळ्यांचे कोपरे कुठेतरी पाणावल्याचे त्यांना जाणवलेही नव्हते.
अचानक काहीतरी आठवल्याने ते तसेच ताडकन उभे राहिले.भाषणाला सुरुवात करीत असलेल्या संतोषभाऊंना हाताच्या इशाऱ्याने थांबवत, "ह्या सर्व धावपळीत आपल्या पक्षांत एका मुलीचे स्वागत करायचे राहून गेले..... " सुरेखा ताईंकडे निर्देश करीत ते म्हणाले.
"अट्रावलच्या घटनेत तन्मयतेने ती काम करीत असल्याचे पाहून, आपल्या पक्षाला एक चांगली कार्यकर्ती मिळाल्याचे समाधान वाटले. लवकरच पक्षाची आघाडी सांभाळ हा आशीर्वाद मी तिला देऊ इच्छितो. हल्ली वयोमानामुळे विसरायला होते म्हणून तिचा उल्लेख करणे अनवधानाने राहून गेले". वासूभाऊ परत खाली बसेपर्यंत सुरेखा ताईंचे डोळे चांगलेच पाणावले होते व सगळ्यांच्याच ते लक्षांत आले.
बसल्या जागेवरून उठत त्या वासूभाऊ बसलेल्या खुर्चीकडे गेल्या व वाकून त्यांना नमस्कार करीत त्यांच्या आशीर्वादाचा शालीनतेने स्वीकार केला.
परत झालेला टाळ्यांचा कडकडाट त्या स्वत:च्या खुर्चीवर बसेपर्यंत होत होता.
अचानक घेतलेल्या ह्या वळणाने संतोषभाऊंना एक नवीनच उभारी मिळाली.
"मित्रहो, यंदाच्या निवडणुकांमध्ये महिला उमेदवार म्हणून आपल्या पक्षातर्फे कोणाला उभे करावे हा मला पडलेला पेच आपल्या ह्या दोन महिला कार्यकर्त्यांनी चुटकी सरशी सोडवल्याबद्दल मी त्यांना व्यक्तिश: धन्यवाद देतो." संतोषभाऊंच्या भाषणावर नेहमीच वासूभाऊंची पडलेली छाप दिसून येई. वासूभाऊंना आपले राजकीय गुरू मानणारे संतोषभाऊ त्यांच्याच लकबीने भाषण करीत.
एक क्षण सगळे एकदम स्तब्ध झाले..... मग आपापसांत कुजबूज सुरू झाली... संतोषभाऊ पुढे काही बोलण्याच्या पूर्वीच जवळपास गोंधळाला सुरुवात झाली. प्रत्येक जण डाव्या उजव्या हाताशी बसलेल्या कार्यकर्त्याशी बोलण्यात गुंतला......
"शांतता राखा, कृपया शांतता राखा....." देसाईंच्या खणखणीत आवाजाने सगळे शांत झाले. खुद्द देसाई गोंधळात पडलेले होते पण बैठकीवरचे नियंत्रण ताब्यात ठेवणे त्यांना व्यवस्थित जमत असे."भाऊ काय सांगत आहेत ते नीटं समजावून घेतल्याशिवाय कृपया आपापसांत चर्चा करू नये अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो." देसाईंनी जणू काही भाऊंना पुढे बोलण्याचा इशाराच केला.
"माझ्या हाती असलेल्या माहितीनुसार 'अट्रावल' चे मतदार क्षेत्र महिलांसाठी राखीव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अट्रावलची आजची परिस्थिती व दूध महासंघाने व भराडे बाईंनी अट्रावलात केलेले कार्य पाहता अट्रावलची जिल्हा पंचायतीची जागा विनासायास भराडे बाई आपल्या पक्षासाठी खेचून आणू शकतील." संतोषभाऊंनी उपस्थितांवर नजर फिरवीत केलेले भाष्य जवळ जवळ सगळ्यांनाच मान्य झाले. समोरच्या मेजावर हात थोपटत बहुतेकांनी त्याला मान्यता दिली.
"पण भाऊ, मी तर तालुक्याची मग अट्रावलांतून मला निवडणूक लढवता येईल ?" भराडे बाईंनी शंका काढली.
"का ? जर दिल्लीत राहणारी महिला कर्नाटकातून लोकसभेला उभी राहू शकते तर पंचायतींना वेगळा नियम का असावा ?"....
"........" सगळेच निःशब्द होते. "तरीही मी तहसील कार्यालयातल्या सचिवांना किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यक मोकाशींना विचारून नियमांची खातरजमा करून घेईन." ह्या वाक्याने उरल्या सुरल्या शंका नष्ट झाल्या.....
पुढची कार्यवाही सुरू होण्याच्या आतच कार्यकर्त्यांनी भराडे बाईंचे अभिनंदन करावयास सुरुवात केली.
*******************************
"या सुनील राव, या" तहसीलदार तुते तोंडभरून हसत म्हणाले.
"काय तुते, समदं काही ठीकं आहे ना ?" सुनील पाटलाने सलगीने विचारले. सुनील पाटलाची भाषा, काम निघालं की, कधी मग्रुरीची नसे. स्वत:ची कामे तो धुर्तपणे करून घेई.
"अक्शी गोंधळ झालाय छोटे मालक, पण नाना सांभाळून घेतीलच" तहसीलदारावर नानासाहेबांचे बरेच उपकार होते. ढापलेल्या शेत जमिनींचे उतारे तलाठ्या मार्फत आपल्या नांवावर करताना नानासाहेब सगळ्यांना त्यांचा हिस्सा नियमीतपणे देत.
"सुहास रावां बद्दल बोलताय व्हय ?" सुनीलने सहज विचारावे तसे विचारले, "त्यान्सी लई घाई होते कामं उरकायची.... तिच्यात तो रमेश भरीला पाडतो, आता हुईल त्ये बगायचं इत्कच हातात हाय न्हवं"
"विरोधकान्सी आयतं कोलीतच दिलय हातांत, न्हव का ?" तुते शब्द झेलत म्हणाला."दादांची जमानत झाली त्येच नसिब म्हणायच " त्याच्या ह्या वाक्यावर सुनील पाटलाने फक्त मान हालवली.
"आज इकडे कुणीकडे छोटे मालक ?" तुतेने त्याला गप्प बसलेला पाहून विचारले.
"हेडमास्तर काही बोलले का ?" पाटलाने अंदाज काढायच्या सुरांत विचारले.
"कस्ल व्हो ?" तुते डांबरट माणूस होता, त्याला सुनील पाटलाच्या तोंडून मोहिनी इंगळेच्या कामाबद्दल ऐकायचे होते.
"इंगळे बाईंच्या बदलीच काई बोलले न्हाई का हेडमास्तर तुमास्नी ?" सुनील पाटलाने आवाजात करडेपणा आणत विचारले.
"छोटे मालक, माफी मागतो पण डोस्क्याचा पार भुगा झालाय. मी इसरूनच गेल्तो बगा"तुतेने मखलाशी केली.
"आता बदाम पाठवतो घरला, म्हंजी चांगलं ध्यानांत राहतील आमची कामं तुमास्नी" पाटील बोलला.
"तसं काय बी न्हाई मालक, जी आर आलाय जिल्हाधिकारी हापीसातन, सगळ्या बदल्या थांबीवल्यात साहेबांनी" तुतेने वाईट बातमी सांगितली.
"मग कस करायचं ? " सुनील पाटलाला मोहिनीला तालुक्याच्या गांवी आणायचेच होते.
"झेड पी हापीसातला सचिव हाय, रातच्याला बोलवू का त्याला हायवेवरल्या हाटेलात?" तुतेच्या तोंडातून लाळ टपकायला लागली.
"तो काय उजेड पाडणार हाय ?" पाटलाला कामाच्या माणसालाच खाऊ/ पिऊ घालायचे होते.
"बदली अर्ज मागच्या महिन्यात संमत झाला असं दाखवावं लागल मालक " तुतेने खाजगी आवाजात सांगितले.
"मग घोडं कुठ अडलय ?" "आता बाई मानसा कडून त्यो सचिव खाईल काय आन पिईल काय मालक ?" तुतेने खरी अडचण सांगितली.
"कळलं, रातच्याला बोलवा त्याला पण आदूगरच सांगून ठेवतोय, काम झालं म्हंजी झालंच पाहिजे अन बातमी बाहेर जायला न्हाई पायजेल"
"बस का मालक ? आजवर कदी केलाय का म्या असला गुना ?" तुतेचा रात्रीचा बकरा कापला गेला होता.
हायवेवरच्या ढाब्याची जमीन नानासाहेबांचीच होती. फक्त दारू बाहेरून न्यावी लागणार होती. मोहिनी साठी काहीही करायला पाटील तयार होता व डांबरट तुतेला सर्व प्रकारांची व्यवस्थित कल्पना होती.
रातच्याला वस्तीला बाहेर असल्याचा निरोप बायकोला सुनील पाटलाने कळवला तेव्हा सायंकाळ उलटत आलेली होती. रात्री झेडपी ऑफिसातला सचिव व तहसीलदार तुते बरोबर ढाब्यावर त्याने अख्खी कोंबडी व बाटली रिचवली.
सचिवाने २ हजाराच्या बदल्यात तसा अर्ज दाखल करून घ्यायला मंजुरी दिली. पाटलाने शंभराच्या दहा कोऱ्या नोटा त्याच्या हातावर टिकवल्या.
"बाकी काम झाल्यावर " सुनील पाटील गुरगुरला. "मालक माज काय ?" तुतेने हावरटासारखे विचारले. "त्या जयपालच्या केस मंदी मागच्या मैन्यात रतीब वाढिवला न्हाय कारे तुह्या ?" पाटील कावत बोलला.
"असं काय करता मालक, तुमी फेकलेल्या तुकड्यावर जगतो आमी गरीब मानसं, थोडं अधिक द्यावं की मालकांनी" तुते आधाशीपणाने बोलला.
"काम जाल्यावर भेट" म्हणतं पाटलाने रजा घेतली.
स्वत:च्या ड्रायव्हरला त्या दोघांबरोबर रिक्शाने पाठवून सुनील पाटील एकटा सुमो घेऊन पाडळस्याला निघाला. आज पाडळस्यालाच वस्तीला राहा असा निरोप त्याने मोहिनी इंगळेला पाठवलेला होताच. मोहिनीच्या आठवणीनेच तो मोहरून गेला.
*******************************
रावसाहेब गाजरेंसमोर जिल्ह्याचे डीसीपी हेगडे साहेब सोफ्यात आरामात बसले होते. एका पायावर दुसरा पाय टाकून मागे रेलून बसलेल्या हेगडेंनी जिल्ह्यातली पोस्टिंग गेली ४ वर्षे व्यवस्थित मॅनेज केलेली होती. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असतो म्हणून त्यांना नाराज न करणे हेच हेगडे साहेबांचे ईप्सित होते.
दुसरीकडे नानासाहेब पाटील व राजेंद्र गाजरे तर एका खुर्चीवर जामिनावर सुटलेला सुहास पाटील होता. विषय अर्थातच अट्रावल प्रकरणाचा होता. आतापर्यंत चर्चा जवळपास संपतच आलेली होती.
"फौजदार बोरसेंना सांगून फाइल आजच मागवतो रावसाहेब" हेगडे बोलले.
"नुस्ती फाइल नको हेगडे, साक्षीदारांची नांवेबी पायजेल" राजेंद्र बोलला.
"ती फाइल मध्येच मिळतील" हेगडे आश्वस्त पणे म्हणाले.
"तो चौधरी गेला होता बोरसेंला घीऊन, त्याने बोरसेला पढवून ठेवलेला असेल" नानासाहेब बोलले.
"असू द्यात की, बोरसे माझ्या हुकुमाबाहेर नाही..... जास्त काही करायला गेला तर जिल्ह्याच्या ठिकाणी घेतो त्याला" हेगडे उठत उठत बोलले.
"आता सांभाळावं पाटील साहेब, हा जामीन सुरू असेपर्यंत कुठली एन.सी ही यायला नको तुमच्या बद्दल" निघता निघता त्यांनी सुहासला सुनावले.
हेगडेचे लहानपण महाराष्ट्रातच गेले होते. तरुण पणी कॉलेजात धिंगाणा घालणारा युवक म्हणून तो प्रसिद्ध होता. अकोल्याहून जेमतेम बीएची पदवी घेऊन एमपीएससीची परीक्षा देऊन त्याने पोलिस दलांत प्रवेश केला तेव्हा 'वाया गेलेलं हे कार्टं त्याच लायकीच होतं' असच त्याला ओळखणाऱ्यांचे मत झाले. सर्व्हिस मध्ये कामाऐवजी मध्यस्थी करवून देणारा अधिकारी म्हणून त्याने नांव कमावले. सोबत बरीच निनावी मिळकत कमावली. स्वत:वर कठिण प्रसंग आल्यास वरिष्ठांकडे सहपत्नी जाण्यास हा गृहस्थ कचरत नसे.
रावसाहेबांनी व राजेंद्राने सुहास पाटलावर आलेला प्रसंग लीलया परतवून लावला. पक्षाच्या बैठकीत हा प्रश्न उभा राहताच त्यांनी इतर पक्षश्रेष्ठींच्या पोरांच्या कुलंगड्यांची यादीच सादर केली व पक्षातल्या विरोधकांची तोंडे आपोआपच बंद झाली.
सुहास पाटलाची ग्राम पंचायतीच्या निवडणूकीला उभे राहण्याची शक्यता मात्र मावळली. कारण पक्षश्रेष्ठीच नव्हे, तर स्वत: राजेंद्रही 'यावल' तालुक्यातल्या पंचायतीची मते सुहास पाटलाला मिळणार का ह्या बद्दल साशंक होता.
त्याऐवजी सुनीलला निवडणुकींचा उमेदवार म्हणून पुढे ढकलायचे नक्की करण्यात आले तेव्हा सुनील झेडपी सचिव व तहसीलदाराबरोबर सौदा करण्यासाठी ढाब्यावर बसला असल्याचे त्यांना माहीत नव्हते.
नानासाहेब पाटलांनी घरी परतेपर्यंत गाडीत सुहास वर चांगलेच तोंडसुख घेऊन त्याला साफ अर्धमेला करून टाकलेला होता.
रमेश तर हल्ली नानासाहेबांच्या आजूबाजूनेही फिरकत नसे.
**********************
"हेगडेंनी स्वत:चे वजन वापरून केस दाबली भाऊ " देसाईंनी संतोषभाऊंना आल्या आल्याच रिपोर्ट दिला.
"मला माहीत होते हे घडणार, पण सुहासला आता कमीत कमी निवडणुका होईपर्यंत शांत बसणे भाग आहे. " संतोषभाऊ बोलले.
"सुहास पाटलाच्या ऐवजी सुनीलला उभे करणार असल्याचे ऐकले भाऊ," देसाई बोलले.
"मग तर प्रॉब्लेम वाढलाय, कारण सुहास पाटलाबद्दल लोकांचे मत खराब आहे पण सुनील पाटलाने कमीत कमी नांव खराब करवून घेतलेले नाही" संतोषभाऊ जरा काळजीने बोलले.
"मोहिनी इंगळे प्रकरण बाहेर काढलं तर ?"
"त्याने फारसा फरक पडणार नाही देसाई, आजकाल टीव्ही वरच्या मालिका बघून लोकांची मन:स्थितीही तसलीच होत चालली आहे. उलट काहींना त्यात मोठेपणा वाटतो."
"तिची इथल्या शांळेत बदली करवून, तिलाच महिला उमेदवार म्हणून उभी करणार असल्याचे ऐकून आहे." देसाई बोलले.
"सुनील पाटलांची भानगडीची बाई दिसायला कशी दिसते, ते बघायला गर्दी जमेल पण लोकं तिला मत मात्र देतील की नाही ह्यात शंका आहे. सुरेखा वहिनींना मात्र आपल्या सहकारणी बरोबर लढत द्यावी लागेल."
"एकूण १६ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी आपल्या तालुक्यात ४ जागा आहेत भाऊ, इतर दोन जागांचे काय करायचे ?"
"किरण चौधरींची जागा त्यांच्या पत्नीला द्यावी कारण त्यांचे निंभोरा व आसपासच्या भागातले काम उत्कृष्टंच आहे. सावद्याला माळी वहिनींना बरीच मंडळी ओळखतात. आपल्या विभागातल्या राखीव जागांची काळजी नाही असे सध्या तरी वाटतेय"
इतक्यात वासुभाऊ आल्याचा निरोप स्वीय सहाय्यकाने दिला, "त्यांना आंत पाठवा...." म्हणेपर्यंत वासुभाऊ दरवाज्यात उभे असलेले त्यांनी पाहिले.
"मी कच्ची यादी आणली आहे भाऊ, जरा नजरे खालून घालावी." ते आल्या आल्या म्हणाले.
"बरं झालं; मी तुम्हाला आजच कच्ची यादी तयार करायला मदत करा म्हणून सांगणार होतो." भाऊ हसतं हसतं बोलले.
पहिली चार नावे तालुक्यांतल्या महिला राखीव उमेदवारांची होती.
चारही जागांवर संतोषभाऊंच्या मनांतलेच उमेदवार होते...
सुरेखाताईंचे नांव पक्षाने पक्के केले होते.......
~पुढील भाग सोमवारी~