तक्रार वेदनांची गझलेत मांडली मी...

तक्रार वेदनांची गझलेत मांडली मी
अश्रूंना अबोलीची शपथ घातली मी


नव्हती कधीच माझी ही आसवे बेईमानी
रुसलेल्या स्वप्नांची समजूत काढली मी


होता तिच्यासाठी साधाच फैसला तो
शब्दाखातर तीच्या ही जीभ कापली मी


येथे कलेवरागत जगलो तिच्याविना मी
केलेली आयुष्याशी तडजोड पाळली मी


देताच साद मजला मृत्यूने दयाळू
निष्ठुर जीवनाची  ही नाळ तोडली मी


  -अनिरुद्ध अभ्यंकर