घर बिगाऱ्याचं !

कधीच नसेल कां पडत त्याला
दुसऱ्यांची घरं उभारताना
स्वप्न स्वतःच्या घराचं ?

निर्माण असेल कां झाली अनिच्छा
त्याच्या मनात घराविषयी
घरं बांधून बांधून ?

की घेतलं असेल त्यानं व्रत
चटईच्या घरात राहून
लोकांच्या डोक्याला
पक्कं छप्पर देण्याचं ?


असेच अनंत प्रश्न मनात घोळवत
पोचलो त्याच्या झोपडीच्या
सताड उघड्या दारात
तेव्हा थबकलो क्षणभर
दारुच्या धुंद वासानं
अडखळत्या शब्दांच्या
उंच स्वरातील गाण्यानं
आणि विझत आलेल्या दिव्याच्या
मिणमिणत्या प्रकाशातही
उजळलेल्या त्याच्या चेहऱ्यानं
धीर एकवटता नाही आला
त्याच्या समाधीचा
भंग करण्याचा


सारे प्रश्न मनातच दाबत
फिरलो माघारी
तेव्हा जाणवली
माझ्या मागावर येणारी
एक अस्पष्ट आकृती
आणि कानात घुमत राहिले
असंख्य प्रश्न
त्याच्या मनातले
माझ्या घराविषयीचे