सुटकेचा निश्वास..

वर्तमानातली उपासमार असह्य झाली की
तो दोन्ही हातांनी
भसाभसा उकरतो भूतकाळ
धुंडाळतो 
आठवणींचं ओलं सुकं किडूक मिडूक.
त्यात काही हाती
लागलं की तेव्हढ्यावर
बरे जातात त्याचे पुढचे दोन चार दिवस!
आज
त्याचं उकरणं थांबेचना
तेव्हा भूतकाळ वर्तमानकाळाच्या कानात
काहीतरी कुजबुजला
मग
त्या दोघांनी
अवकाश उकरून
खणला एक खड्डा अन्
ह्याला गाडून टाकला
आणि
सुटकेचा निश्वास सोडला
तिघांनीही.

(जयन्ता५२)