मराठी चित्रपटांच्या पाककृति

कौटुंबिक सामाजिक चित्रपट (शहरी) प्रकार १

साहित्य: बऱ्यापैकी दिसणारी आंबूस चेहेऱ्याची नायिका एक नग (तोंड आंबवण्याची कृती पुढे दिली आहे), माठ नायक एक नग, खाष्ट सासू एक नग, भांडाळ नणंद एक नग,रिकामटेकडा दिर एक नग,  सासरा (सज्जन व निरुपद्रवी)एक नग, कुचकट बोलणाऱ्या शेजारणी (संख्या निर्मात्याच्या ऐपतीनुसार), प्रेमळ व कष्टाळू नोकरमंडळी एक जोडी (फक्त चित्रपटातच मिळतात), नायिकेचे वडील एक नग (सरळ मार्गी व गरीबीतले)
मसाला: नवऱ्याचे प्रकरण ( समजून चालायचे - पात्राची गरज नाही), नणंदेला भरपूर वेळ, सासू-नणंद यांची कारस्थाने, दीराचा चालूपणा, नोकर असतानाही सर्व कामे सूनबा‌इला, सूनेला अपत्य योग नसणे, सूनेच्या वडीलांचा अपमान; त्यांच्यावर चोरीचा आळ वगरे वगरे.
सजावटीसाठी: मंगळागौर, भोंडला, दिवाळसण वा एखाद्या प्रसिद्ध देवस्थानाचे दर्शन या पैकी कोणतेही एक.
नायिकेचे तोंड आंबवण्याची कृती: एखादी बरी (फक्त बरीच, त्यापलिकडे नाही) अभिनेत्री घ्यावी, तिला भूमिका नीट समजावून सांगावी - म्हणजे तिला फारसा नटा-मुरडायला वा बरे कपडे (फुकटचे) घालायला वाव नसणे, चटपटीत संवाद तोंडी नसणे हे सविस्तर समजावावे, वर असेही स्पष्ट करावे ही या कामासाठी कुणीही बिनीची अभिनेत्री (खास करून हिंदीत जाण्याचे स्वप्न बाळगणारी) तयार नसल्याने तीला ही भूमिका देण्यात येत आहे. यामुळे फक्कड विरजण लागायला सुरुवात होते. या सर्वाच्या जोडीला हा (भिकार) चित्रपट कितपत चालेल याची शंका आणि चुकुन चाललाच तर निर्माता पैसे बुडवण्याची दाट शक्यता यामुळे मस्त पैकी तोंड आंबते.

कृति: नायकाने नायिकेला पसंत केले आहे वा मागणी घातली आहे अशी सुरुवात करावी. वाटावाटीत (याला इंग्रजीत ड्रीम सिक्वेन्स म्हणतात) एखादे गाणे दाखवावे. म्हणजे ओसाड माळावर वा शेतात नायक नायिका बदकाप्रमाणे फतक फतक नाचत जाताना दाखवावेत.
पुढे लग्न दाखवावे. निर्मात्याला खर्च टाळावयाचा असल्यास (तो असतोच म्हणा) थेट गृहप्रवेश दाखवावा. इथे माहेरच्यांचा वा त्यांच्या गरिबीचा उद्धार सासूच्या मुखी दाखवावा म्हणजे चित्रपटाची अधिकृत सुरुवात होते. मग सासू नणंद वगरे तिचा उद्धार करताना दाखवावेत; तिला धुणी-भांडी वगरे करायला लावावीत, दिराने आपले कपडे घडीबंद करायला लावावेत, तिने केलेला चहा थू-थू करीत थुंकून टाकावा वगरे वगरे.
अर्थातच सूनबा‌ईने सर्व लाथा हसतमुखाने सोसाव्यात व गोडही मानाव्यात. चेहेरा म्हणजे थेट आर्य पतिव्रता सुधाकरार्धांगिनी सिंधूप्रमाणे ठेवलेला असावा. मधेच मंगळागौर वा दिवाळी दाखवावी. इथे माहेरचा उद्धार करायला मुबलक वाव असतो. खास करून वडिलांनी सूनेला माहेरी न्यायला आल्याचे दाखवावे. सासूने तत्परतेने मागणी फेटाळून लावलेली दाखवावी, जमल्यास कसली तरी मागणी करावी वा चोरीचा आळ घ्यावा. त्यांनी आणलेला खा‌उचा डबा फेकून देताना व त्यातले पदार्थ जमीनीवर सांडलेले दाखवावेत - इथे सूनबा‌ईला रडायला व पर्यायाने महिला प्रेक्षकाना रडवायला सुवर्णसंधी असते.
मग रडारडीची तीव्रता वाढवावी. म्हणजे सासऱ्याला सासूने सूनेची कड घेतल्यावरून झापताना दाखवावे, तिची बाजू घेतली म्हणून नोकराना हाकलून देताना दाखवावे. मग या सूनेकडून वंशाला दिवा मिळणार नसल्याचे वा झालेले बाळ गेल्याचे वगरे दाखवावे. एकीकडे नवऱ्याने मजा करताना (म्हणजे गाणे-पीणे वगरे वगरे) दाखवावे यामुळे स्त्री वर्गाची नायिकेला मिळणारी सहानुभुती वाढू लागते. मात्र तिने 'पती हे देवची' छापाचे वर्तन चालूच ठेवल्याचे दाखवणे अगत्याचे आहे. आता सून बा‌ईने सकाळी हातात तबक घे‌ऊन तुळ्स पूजा, प्रसाद वाटणे वगरे साग्रसंगीत दाखवावे.
हे सगळे चालू असताना सासऱ्याने मात्र म‌ऊ वागावे. बराच वेळ हे छळ वगरे पका‌ऊगीरी करून कंटाळा आला की मग चित्रपट गुंडाळत घ्यावा. म्हणजे सासूला आजारी पाडून मरता मरता सूनेने वाचवलेले दाखवावे किंवा नणंदेने केलेले लफडे निस्तरून घराण्याची अब्रू वाचवताना दाखवावे वा दिराच्या अंगावरचा हल्ला स्वत: वर घेतलेला दाखवावे. मात्र शेवटी सूनबा‌ईंचे स्वर्गारोहण दाखवणे आवशयक आहे. सूनबा‌ई मरताच घरच्याना एकदम तिच्या महानतेचा साक्षात्कार झालेला दाखवावा. मग साग्रसंगीत अंत्यसंस्कार दाखवावा.
झाला आपला कौटुंबिक सामाजिक चित्रपट तय्यार!

वाढणी: प्रथम ग्रामिण भागात व मग मिळेल त्या पटगृहात चालेल तितके दिवस दाखवावा, सरकारी कृपेने सक्ति वगरे करून एखाद्या चकाचक बहुपटलगृहातही दाखवून घ्यावा. तिकिट विक्री निचांकाहून खाली येताच चित्रपट दूरदर्शनला विकून टाकावा.