सुसंस्कृत सभ्यता देशाचं नाव आहे
माणुसकीच्या काळजावर घाव आहे
घ्या एकएक हत्यार हातात
इथे प्रत्येकास समान वाव आहे
नौयडा" नावाचं एक शहर
रक्तमासाचा जिथे चिखल साचला
ते भयाण दृश्य पाहून
सैतानांचा सैतानही खचला
"विकृत वासनेला" भ्याड आदमखोरांनी
चिमुकल्यांच्या रक्ताने भिजवलं होतं
स्वातंत्र्याचे प्रेत त्या हरामखोरानी
रितसर सरणावर सजवलं होतं
इवल्या चिमुकल्यांचा गळा चिरताना
त्यांच्या नियतीला तरी पहावलं कसं
इतकं रक्त सांडत असताना
त्या दगडाला वरती रहावलं कसं
गर्दी इथे नपूंसक आहे
निडरता त्यांची पांगळी आहे
बांधून पट्टी डोळ्यांवर
न्यायदेवताही इथे आंधळी आहे
"ब्रेकिंग नुईस" चा बाजार भरतो
जखमांची जिथे बोली ठरते
मुलाखती घेऊन पीडीतांच्या
त्यांची पैशाची खोली भरते
गुलामगीरीत जेव्हां देश होरपळला
तेव्हां स्वातंत्र्याचा नारा सर्वमुखी होता
आजच्या गुन्ह्याच्या गुलामगीरीत जगताना
वाटतं तो काळ खूप खूप सुखी होता
प्रेत्येक कविताचा शेवट असतो, जो एक संदेश मांडतो. ही कविता मी अपुर्ण ठेवली आहे, जमल्यास शेवट तीचा तुमच्या शब्दात मांडा किंबहूना अन्याया विरुद्ध लढ्याची वाचा फोडा.
@सनिल पांगे