दिवाणखान्यात टी. व्ही. आल्यापासून मी बोलणे विसरलो आहे
दारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो आहे
खिशात कॅल्क्युलेटर आल्यापासून पाढे म्हणणे विसरलो आहे
ऑफिस मध्ये ए.सी.त बसून झाडाखालचा गारवा विसरलो आहे
रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे
मनालाच इतके श्रम होतात की शरीराचे कष्ट विसरलो आहे
कचकड्यांची नाती जपताना प्रेम करायला विसरलो आहे
बँकांतील खाती सांभाळताना पैशांची किंमत विसरलो आहे
उत्तेजिक चित्रांच्या बरबटीमुळे सौंदर्य पाहायला विसरलो आहे
कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलाचा सुगंध विसरलो आहे
फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचा ढेकर विसरलो आहे
पॉप रॉकच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे
क्षणभंगुर मृगजळामागे धावताना सत्कर्मातला आनंद विसरलो आहे
माझीच तुमडी भरतांना दुसऱ्यांचा विचार करणे विसरलो आहे
सतत धावत असताना क्षणभर थांबणे विसरलो आहे
जागेपणाचे सुख जाऊ द्या, सुखाने झोपणं पण विसरलो आहे
साधनांसारखे विनोदही कृत्रिम, खळखळून हसणं विसरलो आहे
आणि हसणं विसरल्याने जीवनच जगणे विसरलो आहे