इवल्या इवल्या हातांनाही भय आईचा हात हातातून सुटण्याचं
नव्वदीतल्या जिवालाही भय थकलेली गात्र मिटण्याचं
जळी, स्थळी, पाषाणी भयाचेच तर इथे राज्य आहे
सुरक्षित वाटणाऱ्या घरट्यात पण भय आहेच लुटण्याचं
किती प्रकार भयाचे, किती खेळ मनाचे, मनानेच रचलेले
तर्क वितर्क कितीतरी, मनामनातुन रुजलेले
भक्ताला देवाचा, छोट्यांना मोठ्यांचा कायमच वाटतो धाक
अंदश्रद्धेचे हे विचित्र जाळे नकळत आहे विणलेले
पृथ्वीला असेल का भीती फिरता फिरता तोल जाण्याची?
आभाळाला पण असेल की धास्ती समुद्रात खोल बुडण्याची
क्षितिजाचा हात म्हणूनच तर दोघे घट्ट ठेवतात धरून
निसर्गाला आहेच सवय सगळं नीट सांभाळुन घेण्याची
नात्यांना तुटण्याची, गाठींना सुटण्याची देखील असतेच भीती
पुष्पांना सुकण्याची, दिव्यांना विझण्याची वाटतेच की क्षिती
माणूस जगतोच कुठे खराखुरा, भीतच असतो आयुष्यभर
जगताना मरणाची, मरताना जगण्याची नुसतीच असते भीती
अभय स्वतःच द्यायचे स्वतः ला, दुसरं कुणी देत नसतं
भयापासून निर्भयतेचा वाटेवर सोबत कुणी येत नसतं
धीर, साहस, विश्वास, धिटाई शब्दांचं पांघरूण असलं तरी
वार छाती वर पेलण्यासाठी ढाल कुणीही होत नसतं