माझं घर

ते माझं घर म्हणे आता कुण्या परक्याचं झालं
कुणी तरी वेगळंच तिथे आता राहायला आलं

त्या घराचं माझं नातं कसं कळणार कुण्या तिसऱ्याला
त्या घराने जे दिलं कसं देऊन टाकू दुसऱ्याला

घर म्हणजे एक एक क्षण जपलेला, अनुभवलेला
उसवत उसवत शिवलेला, चुकत माकत शिकलेला

घर म्हणजे भिंती भिंतींवर कान होऊन रेंगाळणे
घर म्हणजे काना कोपऱ्यात लपणे, दडणे, सापडणे

घराच्या प्रत्येक आठवणीवर गोष्ट लिहिता येते
घराच्या अणू रेणूची देखील कविता तयार होते

आई, बाबा, भाऊ माझा ती माया साखर सायीची
संस्कारांच्या किती शिदोऱ्या मैफिल अवीट गप्पांची

पाहिल्या प्रीतीची साक्ष पाहिली याच घरात मिळाली
हुरहुर नवी, नवी स्पंदने जिथे मना कळाली

याच घराने जपली माझी पाहिली वाहिली प्रीती
याच घराला कळली माझी कुजबुजणारी नाती

दुःखाची ही ओळख पाहिली इथेच झाली होती
एक वेदना हृदयी देऊन "आई" गेली होती

घर ते आता नसूनही माझे सदैव राहील माझे
कुणीही राहो, कुणीही घेवो, तरीही राहील माझे

स्थावर जंगम दुनिये साठी किंमत लावो कुणी किती
"माया" जी मी मनी जमवली मोल तिचे नाही जगती