कपाळ माझं पांढरं झालं
धनी दारू पिऊन मेलं,
पुढारी घरी येऊन म्हनलं
सांग त्यानं जाळून घेतलं!
एका रात्रीत नाव हुईल
जागा सगळा गाव हुईल,
तुझ्या धन्याच्या मरणाला
लई मोठा भाव येईल!
पेपरात यील छापून फोटो
भलं मोठं घालतील हार,
चिठ्ठी लिहून देतो तेवढी
मुडद्याच्या हातात नीट सार!
सगळीकडं दंगल हुईल
दुकानं आम्ही नेऊ लुटून,
तू फक्त नामांतर म्हण
माल अर्धा घेऊ वाटून!
मी हो म्हनलं नि बया
एकदम झालं जंतर मंतर
आता पोटभर खाते भाकर
यालाच म्हनत्यात काय नामांतर?
असलं नामांतर पुन्हा यावं
चार दिस सुखाचं दिसतील,
अन्नात भिजल्यावर आतडी
मयतासाठी खदाखदा हसतील..!
- मंजुश्री.