आवाज

जन्माला येणाऱ्या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणाऱ्या पाण्याचा, वाऱ्याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते.
                पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला. मतांसाठी राजकीय पक्ष तर लांगुलचालन करतातच, पण यावेळेस आश्चर्य म्हणजे कोर्ट पण झुकले! लोकमान्यांनी मागे एकदा " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला होता. पण कोर्टाच्या बाबतीत तर तसेही म्हणायची सोय नाही.
               भारतीय समाजात तशा अंधश्रद्धा बऱ्याच आहेत. पण परमेश्वराला मोठ्ठा आवाज आवडतो, किंबहुना तो बहिरा असल्यामुळेच त्याच्यासमोर घंटा, थाळ्या, ढोलताशे वगैरे जे कांही हाती लागेल ते वाजवून त्याचे लक्ष आपल्याकडे वळवावे लागते असा भक्तांचा समज असावा. तसेच उत्सव हे आवाजानेच साजरे करायचे असतात, देव बहिरा असल्यामुळे सर्वांनीच लवकरांत लवकर बहिरे होऊन त्याच्याशी एकरुप व्हावे असा उदात्त हेतू मनाशी बाळगून सर्वजण कटिबद्ध असतात.
              कांही लोकांचे तर आवाज हेच टॉनिक असते. दोन मिनिटे शांतता पसरली तर यांचा जीव कासावीस होतो. मंद सुरांत गाण्याचा आनंद लुटणे यांना मान्यच नसते. दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. लहान मुलांना एकवेळ आवाज करावा असे वाटले तर ते समजण्यासारखे आहे. पण लहानपणातला निरागसपणा, प्रामाणिकपणा मोठेपणी मागे पडतो पण ठणठणपाळपणा काही सुटत नाही!
              लहानपणी घरांत सगळे झोपलेले असताना जरा मोठ्याने बोलले तरी आई रागे भरत असे. रेडिओचा आवाज थोडा वाढला तर वडिलांच्या भुवया उंचावत. संस्कार संस्कार बहुधा हेच असावेत. आपल्यामुळे दुसऱ्याला जराही त्रास होऊ नये ही शिकवण घरोघरी होती. माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोऱ्या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते.
               हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???

                                                                                 केवाका