सुसंवादिनी

ती होतीच पहिल्यापासून बडबडी,
चटपटीत आणि हुशार सुद्धा !
मग नको का कांही करुन दाखवायला ?

पांढऱ्यावर काळं करुन
शब्दांचे बुडबुडे सोडून
चार टाळ्या मिळवल्या
तर प्रसिद्धीचा सोस फार
म्हणून हिणवायचं कशाला ?

श्रीमंती दुखणी आहेतच मानेवर
सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखी
म्हणून रडायचं कशाला ?

त्याचेच कौतुक करुन
चारचौघांत मिरवलं
तर हंसायचं कशाला ?

पदरचे पैसे खर्चून
सर्वांची मर्जी संभाळून
पेपरांत नांव छापून आलं
तर आंतबट्ट्याचा व्यवहार
म्हणून चिडवायचं कशाला ?