माझ्या मनी---
माझिया मनाचे
उधाण सागर
किनाऱ्याचे भान
हरपले
माझिया मनाचे
एकले क्षितिज
आभासांचे भास
अस्मानात
माझिया मनाचे
उजाड शिंपले
स्वातीआस परी
सोबतीला
माझिया मनाच्या
अंधारल्या वाटा
सूर भूपाळीचे
विस्मरणात
माझिया मनाची
लक्ष मोरपिसे
मेघमायेंतही
तहानलेली
माझ्या मनी उदे
केशरी प्रकाश
आसमंती गाज
चिरंतनाची!
---मुक्ता