ह्यासोबत
तर मी उठलो.
हे थोडेसे लाक्षणिक अर्थाने घ्यावे. डोळेमिटल्या अवस्थेत दिवा न लावता आपल्या घरात तीन फुटांच्याहून कमी उंचीच्या कायकाय गोष्टी आहेत त्याचा स्वतःच्या पायाची नडगी वापरून शोध घेणे म्हणजे 'उठणे' म्हणायचे असेल तर हरकत नाही.
शेवटी तीन छोटी स्टुले (त्यातले एक दोनदा), एक खुर्ची (या गोष्टी झोपायच्या खोलीत हव्यातच का?) आणि एक पलंगाखाली ठेवलेला पेला (तो मीच ठेवला होता) इतक्या गोष्टी 'शोधून' झाल्यावर अखेर डोळे उघडले. मग पुढची नैमित्तिक कृत्ये फारसा घोळ न घालता पार पाडली.
झोपेखालोखाल माझे नखरे (मालूच्या - "माझ्या" मालूच्या - भाषेत) असतात ते खाण्याबद्दल. म्हणजे आवडीनिवडी नव्हेत, तर खाण्याच्या वेळा आणि खाण्याच्या पदार्थांचे वस्तुमान याबद्दल. वेळच्या वेळी आणि पुरेसे खाणे एवढीच माझी (मला माफक वाटणारी) अपेक्षा असते. आणि कालच्या आम्लेट-पावाच्या नादात मी एवढ्या सकाळी, नव्हे पहाटे, काय खावे याचा विचारही केलेला नव्हता.
डवे धुंडाळा....नेहमीप्रमाणे साखरेच्या डब्याने उडी मारली. भारतीय क्रिकेट संघातल्या कुठल्याही पूर्णवेळ खेळाडूला न शोभणाऱ्या चपळपणे मी तो पकडला, पण त्या नादात प्रतीक्षिप्त क्रियेने वर गेलेल्या माझ्या उजव्या पायाच्या नडगीने स्वैपाकघरातले टेबल 'शोधले'. अभावितपणे माझ्या तोंडून एक शब्द बाहेर पडला, जो मी गेल्या वर्षीच्या सुटीत मालवण दौऱ्यात ऐकला होता.
आणी बाळ उठले, "कोनाय? मालू...?". आता मी फसणार नव्हतो. अत्यंत शांत चित्ताने मी एका हाताने साखरेचा डबा आणि दुसऱ्या हाताने नडगी धरली आणि दुसरा शब्द खणखणीतपणे उच्चारून ती मालवणी म्हण पूर्ण केली. बाळावर त्याचा अंगाई म्हटल्यासारखा परिणाम झाला आणि बाळ परत झोपले.
वेळ भराभर चालला होता. मला फक्त पावाचे चार तुकडे आणि फरसाणाचा एक पुडा एवढेच सापडले. अखेर पटापट ते पोटात ढकलले आणि दूरध्वनीबैठकीची तयारी सुरू केली. अंक-उच्च उघडला. भ्रमणध्वनी त्याच्या विसाव्याच्या जागेतून बाहेर काढला. त्यावरती नवीनासुराचा संदेश अपेक्षेप्रमाणे होताच, "प्रयत्नलो बोलवायला तुला. तू नव्हतास उपलब्ध. संपर्क ताबडतोब". आता हलक्या आवाजात का होईना, पण मला खिंकाळण्याचा मोह आवरला नाही. थांब रे राजा, करतोच तुला 'ताबडतोब' संपर्क. रात्री दिन दिन दिवाळी करून झोपलेल्या व्यक्तीला सकाळी सहा ते नऊ ही वेळ अगदी गाढ साखरझोपेची असते हे मला ठाऊक होते (लग्नाआधी मी काही अगदीच 'हा' नव्हतो, त्या मांडवाखालून मीसुद्धा चार पावले जाऊन आलोय म्हटलं). त्यामुळे पेगीबाईची वासलात लावली की मग या राक्षसाला हलवावा असे ठरवून मी काळी कॉफी करायच्या मागे लागलो. चांगली चार कप करून नियंत्रित तपमानाच्या बाटलीत भरून ठेवली आणि बैठक जमवायच्या मागे लागलो.
कुठे बसावे याचा विचार आत्तापर्यंत केला नव्हता. नेहमी मी बाहेरच्या खोलीत बसतो, पण आज तिथे घोरासुराचे आख्यान चालू होते. दुसऱ्या झोपण्याच्या खोलीत मालूने बरेच सामान कोंबून ठेवले होते, जे साफ करणे हा माझा किनिवि: किल्ली-निर्णय-विभाग (KRA: Key Result Area) असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले होते. त्या सामानात अत्यंत प्रामाणिक विचाराने खरेदी केलेली व्यायामासाठीची दुचाकी आणि घरातल्या घरात चालण्यासाठी असलेले यंत्र होते. त्यामुळे ते सगळे बाजूला करण्यातच दोन तास गेले असते. झोपण्याच्या खोलीत टेबलसदृश काहीही नव्हते, मालूचे रंगरंगोटीचे टेबल सोडून, जे आधीच ओतप्रोत भरले होते. शेवटी स्वैपाकघरातल्या टेबलावर दुकान मांडले.
आता कशीबशी पंधरा मिनिटे उरली होती. त्यात दाढी-आंघोळ उडवावी की आंतरजालीय बैठकीत वापरले जाणारे चित्रण-प्रक्षेपण यंत्र खराब आहे असे सांगून मोकळे व्हावे? तसेच करावे आणि त्या चौदा मिनिटात एक कप कॉफी निवांतपणे पोटात ढकलावी असा विचार करून तो अमलात आणला.
ठरल्या वेळी पेगीबाईंचा हसरा (न हसायला काय झाले? बसली असेल दाबून नाश्ता हाणून) चेहरा माझ्यासमोरच्या पडद्यावर उमटला. प्रथम मी माझ्या बाजूचे चित्रण-प्रक्षेपण यंत्र खराब असल्याचे वृत्त देऊन टाकले. थाप मारायचीच असेल तर ती लौकरात लौकर मारावी असे माझे एक तत्त्व आहे. जसजसा वेळ जातो तसतसा माझा घाबरटपणा उफाळून येतो. आज तरी ही थाप पचली असे वाटले. वाटले म्हणजे, त्यावर पेगीने "खरेच?" असे म्हणून ओठांचा चंबू केला (जो मोहक दिसत होता; खोटे का बोला?) आणी "बघायला पाहिजे" असे काहीतरी पुटपुटली.
बैठक सुरू झाली. ही 'अखेरची' बैठक म्हणजे एक आवईच होती हे माझ्या सुरुवातीलाच लक्षात आले. त्यामुळे एक हात सोडून (आणी कधी कधी दोन्ही हात सोडून) दुचाकी चालवणाऱ्याच्या सफाईने मी मध्येच इकडेतिकडे बघणे, ध्वनीक्षेपकापासून तोंड बाजूला नेऊन जांभई हाणणे, कानाला लावलेले जंजाळ बाजूला करून अंक-उच्चामध्ये अंतर्भूत असलेल्या ध्वनीक्षेपकात बोलणे, ध्वनीक्षेपकावर हात ठेवून कॉफीचा मोठा घोट घेणे असे प्रकार सुरू केले.
ते ताबडतोब अंगाशी आले. मी उगाचच माझ्या ध्वनीक्षेपकाची ध्वनीशोषणपातळी वाढवली आणि सकाळी खाल्लेल्या फरसाणाने आपले काम केले. एक डरडरीत ढेकर, जी दडपण्याआधीच ऑस्ट्रेलियापर्यंत पोचली. पेगी टाणकन उडाल्याचे समोर दिसले. "माफी. काही समस्या आत यंत्राच्या" असे म्हणून मी वेळ साजरी केली, ध्वनीशोषणपातळी मुकाट कमी केली आणि पेंगायला सुरुवात केली.
पण हे तिला दिव्यचक्षूंनी दिसले की काय कोण जाणे. अचानक "काय आहे तुझा विचार यावर" असा प्रश्न अंगावर आला. "चांगला प्रश्न. पण मला वाटते मी द्यावे माझे मत नंतर मला मिळाल्यावर जास्ती माहिती" मी इंग्रजीत वदलो. मग हातावर छडी खाल्लेल्या खोड्याळ विद्यार्थ्यासारखा सावरून बसलो.
दोन तासाच्या त्या कंटाळायात्रेत एवढेच कळले की आता 'बिंदू-जाळ्या'ऐवजी दुसरे तंत्रज्ञान वापरावे असा एक मतप्रवाह तिकडे वाहू लागला होता. तो कितपत शक्य आहे याचा अहवाल देणे मला शक्य होईल काय? या प्रश्नावर मी अत्यंत उत्साहात होकार दिला. कारण ते दुसरे तंत्रज्ञान मला संपूर्ण अगम्य होते आणि नवीनासुराचे ते वैशिष्ट्य मानले जात होते. अजून एक मुद्दा... हा हा हा
हळू हळू मला पेंग येऊ लागली. आणि बाळ उठल्याचे त्याने मालूच्या आवडत्या (नव्हे, अत्यंत आवडत्या; एकदा योगेशच्या सिगरेटच्या राखेचा एक कण त्या फुलदाणीवर लागलेला दिसला आणि घरात धूम्रपानबंदी जाहीर झाली. तशी मालू त्याबाबतीत निमित्तालाच टेकली होती म्हणा) फुलदाणीचे विभाजन करून जाहीर केले.
डोळ्यात रेंगणारी पेंग खाडकन उतरली. तो आवाज इतका भयावह होता, की दुसऱ्या बाजूने पेगी "आहेस तू ठीक? काय झाले? स्फोट किंवा काहीतरी?" असे प्रश्न फेकू लागली. तसे काही नसून मी हातीपायी धडधाकट आहे अशी कशीबशी (कशीबशी नाहीतर काय? माझा शेजारी दारू ढोसून माझ्या घरात रात्रीपासून पडला आहे, तेही माझी बायको घरात नसताना हे काय तिला सांगणार होतो? तिला 'भलतीच' शंका आली असती) तिची समजूत घालण्यात पाच मिनिटे गेली. अखेर निरवानिरवीची भाषा करताना पेगीने माझ्या अंक-उच्चावरची चित्रण-प्रक्षेपण यंत्रणा बंद असल्याचा विषय पुन्हा काढला. "मी बोलेन नवीनशी, आपण करू काहीतरी लौकरच" असे जाहीर केले. समारोपाचे छोटेसे भाषण केल्यावर माझ्या लक्षात मी केलेला घोळ आला.
पेगीचे कार्यालय जरी ऑस्ट्रेलियात असले तरी तिचा उद्योग हा अमेरिकेत नोंद झालेला एक अत्यंत मोठा समूह होता. आणि माझा अंक-उच्च हा त्या तिच्याच उद्योगाने निर्मित केलेला होता. तो वापरून आम्ही या प्रकल्पावर काम करणे अपेक्षित होते, कारण त्यात काही विशेष सुविधा होत्या, ज्या एरवी उपलब्ध नसतात. पण पाण्यात टाकलेल्या ओंडक्याला सुरुवातीला घाबरलेले बेडूक जसे त्यावर नंतर उड्या मारू लागले तसे आम्ही त्या अंक-उच्चाला मोजणे सोडून दिले होते. असो, नवीनासुरासमोर थोडे नमते घ्यावे लागणार....
त्यावरून लक्षात आले, सकाळचे सहा वाजून गेले होते. आता बाहेर बाळाची ख्यालीखुशाली बघावी, त्याला वरच्या मजल्यावर ढकलावे आणि थोडी डुलकी मारावी असा विचार करून मी बाहेर आलो.
बाळ सोफ्यावर 'मी डोलकर डोलकर' करत बसले होते. रात्री मनसोक्त दारूकाम झाल्यावर दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरून ओसंडणारा पश्चात्ताप निथळत होता.
सुधाकररावांनी माझ्याकडे अत्यंत अनोळखी चेहऱ्याने पाहिले. "इकडे कुठे?" हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर मी लख्ख वाचला, जो शब्दात पकडायला त्यांना अजून पंधरा मिनिटे लागली असती. मी थोडक्यात पण शक्य तेवढ्या रोख-ठोक शब्दात गेल्या काही तासांचा इतिहास कथन केला. सुधाकररावांनी या दरम्यान तोंडातून बरेच सूर काढले, जसे पेटीच्या चारपाच पट्ट्या एकदम दाबल्यावर होते तसे. अखेर त्यांना हवा तो सूर सापडला.
"स्वारी बरं का.. न्हाई म्हनजे तुमाला फारच तर्रास दिला... आता एकच उप्कार करा... अजून एक अर्दा तास बसूं द्या हितं... काय है, रातच्याला जरा काम जहालं तर दुसऱ्या दिशी सक्काळी येक तासभर जरा मला सावरायला येळ लागतो... म्हंजी तसा मी उटलो व्हतो तुमी त्या बाईसंगट बोलत व्हतात तवा (कानावरचे जंजाळ बाजूला करून अंक-उच्चातील अंतर्गत यंत्रणा वापरल्याचे दुष्परिणाम)"
अरे वा! वेळाचे गणितही पाठ होते तर! शेवटी त्यांना एक कप काळी कॉफी देऊन मी आंघोळीला पळालो.
उन्हाळ्याचे दिवस असले तरी फवारा सकाळी साडेसहाच्या तुलनेने फारच थंड होता. त्या पाण्याचा हबका अंगावर बसताच अभावितपणे माझ्या तोंडून गाणे सुरू झाले. दुसरे काही करण्याजोगे नव्हते म्हणून मी गात राहिलो, "तू छुपी है कहां... मै तडपता यहां..". तसा माझा आवाज अगदीच वाईट नाही. झोपलेल्याला उठवायला वाईट, कारण उठल्याउठल्या असे काही ऐकणे हृदयविकाराच्या व्यक्तींना धोकादायक ठरू शकते हे हे मालूचे मत 'खडूस' या सदरात पडते.
या नादात बाहेर वाजणारी दूरध्वनीची घंटा मला कशी ऐकू येणार? आणि त्यानंतर वाजलेली भ्रमणध्वनीचीदेखील? त्या दोन्ही घंटा अग्निशामक दलाच्या घंटेहूनही जास्त संकटसूचक होत्या हे त्यावेळी कसे कळणार?
आंघोळ उरकून बाहेर आलो. सुधाकरराव आता अर्ध-जागृतासनात बसले होते. "दोन फोन... एक बाईंचा... एक बाबाचा" त्यांनी वाक्य जुळवले. मी पटकन भ्रमणध्वनी तपासला. नवीनासुराचा फोने. म्हणजे तो काल रात्री शुद्धीत होता. अन्यथा एवढ्या सकाळी त्याचा फोन येणे शक्य नव्हते. आणि ही बाई कोण? मालू असावी. आपल्या घरी साडेसहाला केलेला फोन नवऱ्याऐवजी दुसरा राठ आणि अशुद्ध बोलणारा पुरुष उचलतो हे गणित बायका कशा सोडवतील हे कळले असते तर मी सर्वज्ञानी नसतो झालो?
मी सर्वज्ञानी नसल्याने तिला फोन करण्याची घाई न करता सावकाश सुधाकररावांचे गलबत वरच्या मजल्यावर नेऊन लावले, नवीनासुराशी बोलणे केले, अंक-उच्च ठीक आहे, सकाळची समस्या छोटीशी होती आणि ती माझीच चूक होती हे खाली मान घालून मान्य केले (पण भ्रमणध्वनी 'संपर्ककक्षेच्या बाहेर' असण्याची समस्या आमच्या गृहसंकुलात नेहमी भेडसावते हे मात्र ठासून सांगितले), मला आठवला तसा सकाळच्या बैठकीचा वृत्तांत दिला, 'दुसऱ्या तंत्रज्ञानाबद्दल' माहिती गोळा करण्याचे काम मी त्याच्या वतीने स्वीकारले आहे (आणी ती माहिती एक दिवसात द्यायची आहे असेही ठोकून दिले; एक दिवस तरी बुडाला चटका लागल्यासारखे काम कर लेका), शेवटी "माणसे महत्त्वाची नसतात, संस्था महत्त्वाची असते" हे त्याचेच लाडके तत्त्वज्ञान त्याच्या तोंडावर फेकून संवाद बंद केला.
इ-पत्रे बघावीत, मालूला फोन करावा की अजून एक कप कॉफी प्यावी असा विचार करत असतानाच परत दूरध्वनीची घंटा वाजली.