कैक वर्षे डायलिसीसवरचा
अखेरीस हुश्श एकदा खपतो कुणी माजी राष्ट्रपती
अर्ध्या सुट्टीसह एक मिनिटाच्या शांततेत
मी उभा चुळबुळत काखेतल्या असह्य खाजेसह
प्रौढांसाठीचा इंग्रजी सिनेमा मॅटिनी जमला तर
गार बीअर नाहीतर दोघांत तीन
मुलं शाळेतून घरी यायच्या आत पोचलोच घरी तर
कदाचित घाईघाईत अर्जंट सेक्सही
हे असे नसते तर कसे झाले असते
हा राष्ट्रपती काय किंवा उद्यापूर्वी मेलेलो मी
एका मृत्यूसाठी एक मिनिट शांत उभे तुम्ही
तुमच्यासाठी अनंत काळ शांत झालेला मी