"बरं का..." असे शब्द परवा कानावर पडले आणि अचानक साईश ची आठवण आली. तशी ती रोजच येते...मन अगदी भरून येते त्या आठवणीने.
सुमारे ७ वर्षापूर्वी सातारा शहरामधून कोल्हापूरला शिकायला आलेल्या एका युवकाची ही गोष्ट.
साईश हे नाव सर्वप्रथम मी त्या वेळी ऐकले. अभियांत्रिकी च्या पहिल्या वर्षी हा मित्र माझ्या जीवनात आला आणि माझ्या आयुष्याची एक अजोड ठेव बनून गेला. अतिशय अभ्यासू आणि मनमिळाऊ वृत्तीचा साईश अगदी काही दिवसातच आमचा एक सखा सोबती बनला.
द्वितीय वर्षापासून आमचा अभ्यासक्रम एकच असल्याने आपोआप आम्ही जिवलग मित्र बनून गेलो. जेव्हा आमच्या वर्गाची क्रिकेट टीम आम्ही तयार केली तेव्हा मला त्याच्या रूपाने एक अष्टपैलू खेळाडू मिळाला. तो माझ्या संघातला अतिशय महत्त्वाचा खेळाडू होता. एकत्र अभ्यास, गप्पा, चेष्टा, मस्करी वाह.. किती छान दिवस होते ते..!!!
रविवार म्हटले की आमचा एकच कार्यक्रम, सचिन साईश माझ्या घरी यायचे आणि आम्ही चौघे महाद्वार रोड किंवा रंकाळा पालथा घालायचो. काही खरेदी व्हायची, मस्त मिसळ, भेळ चा आम्ही आस्वाद घ्यायचो.
मी अवधूत साईश आणि सचिन, चांडाळ चौकडी होती. अखेरच्या वर्षीचा प्रोजेक्ट म्हणजे ह्या सगळ्यावर कहर. अभ्यासासाठी म्हणून आम्ही जमायचो आणि पिक्चर बघून समाधानाने घरी जायचो.
क्रिकेट आणि स्नेहसंमेलनामध्ये आम्ही जे यश संपादन केले त्यात साईशचा सिंहाचा वाटा होता. अभियंता झाल्यावर त्याच्या घरच्यान्सोबत केलेली पन्हाळा सहल अजूनही जशी च्या तशी आठवते.
हाहा म्हणता ४ वर्ष निघून सुधा गेली आणि आम्ही चौघे विभक्त झालो. सचिन, साईश CAT देण्याच्या निमित्ताने पुण्यास गेले, अवधुतला ही पुण्यात एक चांगली नेकरी लागली आणि मी बेंगलोर ला गेलो.
अधून मधून आमचे फोन व्हायचे, बेंगलोर मध्ये मला नोकरी मिळाली नाही आणि अपयशाने थोडासा व्यथित होऊन मी पुण्यास परतलो. ह्या सुमारास अवधूत आणि सचिन टाटा मध्ये लागले होते, साईश ने जवळच्या एका छोट्या कंपनी मध्ये नोकरी सुरू केली होती.
अधून मधून साईश ची आणि माझी भेट व्हायची, एके दिवशी मी असाच नोकरीच्या शोधार्थ फिरत असताना, अवधूत चा फोन आला, तो त्यावेळी कोल्हापूर मध्ये होता, तो मला म्हणाला, साईश थोडा आजारी आहे आणि उपचारासाठी त्याला दीनानाथ मध्ये ठेवलंय, जाऊन भेटून ये. मी माझे काम आटोपून त्याला भेटायला गेलो. शनिवार होता, साईश आणि त्याचा थोरला भाऊ दोघे बसले होते, मी आणि माझ्यासोबत आलेले दोन मित्र त्याच्याशी गप्पा मारत बसलो, पुन्हा एकदा एकमेकाला चिडवाचिडवी सुरू झाली.
माझ्या पाठीवर हात ठेवून सईश म्हणाला, "तुला ही चांगली नोकरी मिळेल.." . आम्ही गप्पा मारून घरी आलो. दुसऱ्या दिवशी साईश एक आठवड्याचा विश्रांतीसाठी सातारला गेला. सोमवारी मला मुंबईमध्ये एक नोकरी मिळाली, साईशला सांगायचे होते, म्हटले की तो आल्यावर सांगावे, मी आवरून गणपतीला चाललो होतो तेवढ्यात अवधूतचा फोन वाजला.
साईशच्या भावाचा फोन होता, तो म्हणाला की साईशला पुन्हा दवाखान्यात दखल केलंय..जाऊन पाहतो तर माझा मित्र चिंताजनक होता... ह्या अचानक प्रसंगामुळे आम्ही सगळे बावरून गेलो होतो... अखेर औषधोपचाराचा प्रभाव आणि आमच्या प्रार्थनेला यश आले नाही...
१३-४-२००५, दुपारची वेळ होती... आमचा एक सखा, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा अर्ध्यातच ठेवून, वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी आम्हाला सोडून गेला.