नदीकाठची कातरवेळ

डोळे गुंगती रिकाम्या अंतराळात गहन
नभ - अबोल, विषण्ण - होते झाकोळले मन

सोनसावळ्या नदीत कांही डुंबतात नावा
हंबरती गुरे-गायी, वाजे कारुण्याचा पावा

वार्‍यावर लवलवे स्तब्ध पापणीचे पाते
एकतारीवर कोणी विरहिणी गात जाते

डोळ्यातल्या पाण्यामध्ये चिंब पाखरांचे थवे
सूर्यपक्षी बांधू पाहे एक घरकूल नवे

घाटावरी मंदिरात घणघणे घंटानाद
घुमटीत हृदयाच्या घुमणारा पडसाद

लाटांवर पसरती आर्त आरतीचे सूर
थांबे तसा निघायाचा दग्ध चितेतून धूर

वाहतात अंधारात क्षीण दीपकांच्या ओळी
स्वप्ने आणि आठवांची वर्तमानात रांगोळी