रिमझिम रिमझिम

'रिमझिम रिमझिम...
रमजिन, रमजिन'

            ------कवी नलेश सामंत

चार शब्दांची कविता, फक्त चार! त्यातही दोन शब्दांची पुनरुक्ती. म्हणजे खरं तर दोनच शब्दांची किंवा चार अक्षरांची म्हणूया. 'र,म,ज,न या चार अक्षरांनी बनलेली पण गगनाला गवसणी घालणारी!
डीएनए चा रेणू जसा ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन या चार घटकांनी बनलेला असतो पण साऱ्या विश्वाचा जीवनाधार असतो अगदी त्याचप्रमाणे चार अक्षरांत ब्रम्हांडाला कवेत घेणारी.
 केवळ याच नव्हे तर पुढच्या दहा शतकांना व्यापून दशांगुळे उरणारी. अल्पाक्षरी कवितेचा उत्तुंग मानदंड!
नलेश सामंत यांच्या कविता आकाराने लहान असतात पण आशयाने महान असतात. त्यात अर्थ ठासून भरलेला असतो. केवळ शब्दामधेच नाही तर अक्षरांतही अर्थ असतो. विरामचिन्हात सुद्धा अर्थ असतो. इतकंच काय पण शब्दाभोवतीच्या रिकाम्या जागासुद्धा अर्थाने परिप्लुप्त असतात. ही कविताही त्याला अपवाद नाही.
पहिल्या ओळीतल्या 'रिमझिम रिमझिम' मधे स्वल्पविराम नाही की अर्धविरामही नाही. नंतर फक्त तीन टिंब आहेत ... रमजिन, रमजिन मधे मात्र स्वल्पविराम आहे. यातून काय सांगायचं असेल त्यांना ? रिमझिम रिमझिम नंतरच्या तीन टिंबांचा काय अर्थ असेल ?
नलेश सामंतांची कविता वरवर पहाता दुर्बोध वाटते, पण खरं तर ती तशी मुळीच नाही. उलट त्यांच्याइतकी सोपी कविता मराठीमधे दुसऱ्या कोणी लिहिली असेल की नाही शंकाच असेल. कदाचित बहिणाबाईं चौधरींचा अपवाद असेल. आणि अर्थातच भिवंडीच्या संयोगिता वरणगांवकरांचा!
नलेश सामंतांच्या कवितेत शिरायची एक वाट असते. ती सापडेपर्यंत कविता दुर्बोध वाटते. पण एकदा का ती सापडली की कविता समजायला वेळ लागत नाही. ही वाट लयीच्या कुंपणातल्या फटीतून अर्थाच्या निबिड अरण्यात शिरते आणि जाणीवेच्या कक्षेला वळसा घालून नेणिवेला कवेत घेते. म्हणून त्यांची कविता समजून घेण्यासाठी त्यातल्या लयीच्याच अंगाने पुढे जावे लागणार हे उघड आहे.
या कवितेतली लय कुठली ?
कवितेत सोळा अक्षरे आहेत. सोळाच का ? पंधरा किंवा सतरा का नाहीत ? याला कारण आहे. त्रितालात सोळा मात्रा असतात आणि कवितेतही सोळा अक्षरं आहेत. म्हणून ही कविता वाचताना सोळा मात्रांचा त्रिताल वाजतो आहे असं वाटतं. गाण्याच्या क्लासमधे शिकवणाऱ्या एखाद्या फालतु तबलजीचा त्रिताल नाही हा! साक्षात खांसाहेब अल्लारखांचा दमदार त्रिताल!!  सोळा मात्रांमधे सनातनाचा गाभारा काठोकाठ भरुन टाकणारा त्रिताल!
धा धिं धिं धा  धा धिं धिं धा
धा तिं तिं ता  ता धिं धिं धा II
आता कुणी म्हणेल त्रितालच का ? झपताल किंवा आडा चौताल का नाही ? यालाही कारण आहे. त्रितालात चार चार मात्रांचे चार विभाग असले तरी ठेका दर्शवणारी टाळी तीन वेळाच वाजते. एक जागा रिकामी असते. म्हणून तर त्रितालाचे वर्णन 'तीन ताली एक खाली' असे करतात. ती रिकामी जागा आपण भरुन काढायची असते, लयीच्या अंगाने! तशीच इथे तीन टिंबानंतरची जागा रिकामी आहे. त्याचा अर्थ लावण्यासाठी रिमझिम रिमझिम चा अर्थ पाहूया.
रिमझिम हा शब्द उच्चारला की मध्यमवर्गीय मनाला आठवतं ते एक जुनं भावगीत.
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे ।
पाणीच पाणी चहुकडे गं बाई
गेला मोहन कुणीकडे ॥
कसला पाऊस पडतोय हा ? नेहमीचाच पाऊस आहे की काही वेगळं आहे त्यात ? दुषित पर्यावरणामुळे पडणारा विषारी ऍसिड रेन आहे का हा ? की कॉंप्युटरमधे शिरुन त्यातल्या हार्ड डिस्कचा चुराडा करणारा रेन व्हायरस आहे हा ? की आजच्या जगांत चहुकडून कोसळणारा माहिती तंत्रज्ञानाचा पाऊस ? नलेश सामंतांच्या कवितेतला पाऊस आहे तो! कुणा लुंग्यासुंग्या कवीच्या कवितेतला पाऊस नाही. तो नेहमीचा कसा असेल ?  त्यातली यमुना ही यमुना नदीच आहे की तेही कसलंतरी प्रतिक आहे ? आणि मोहन तो कोण ? तो नंदाचा पोरटा ? यशोदेचा कान्हा ? द्रोपदीचा सखा की अर्जुनाचा मित्र ?
की सरीवर सरी येऊन गोपींना सचैल न्हाऊ घालणारा हा पाऊस नाहीच ? ही गोकुळातली रिमझिमच नाही. ती 'रिमझिमके तराने लेके आयी बरसात' या गाण्यातली रिमझिम आहे का ? पावसाळी रात्रीच्या पहिल्या मुलाखतीची याद देणारी, मध्यमवयीन मनाला कोमट उभारी देणारी ?
नाही, तसंही नाही, जरा नीट बघुया.
कवितेत 'रिमझिम' नाही तर 'रिमझिम रिमझिम' आहे. अर्थातच ही आहे 'वह कौन थी' या सिनेमातल्या नैना बरसे या गाण्यातली रिमझिम! हरवलेल्या मोहनाला शोधणाऱ्या राधेची ही पाणचट रिमझिम नाही आणि टुकार हिंदी सिनेमातली, नायिकेला पावसात भिजवून आंबटशौकिन प्रेक्षकांना  तिच्या अंगप्रत्यंगाचे दर्शन घडवणारी रिमझिमही नाही. ती आहे इतिहासपूर्व कालापासून युगानुयुगे भटकणाऱ्या एका आत्म्याने आजच्या सायबरयुगातल्या आत्म्याला घातलेली साद! उदास रिमझिम, आर्त रिमझिम! पहिल्या ओळीतल्या 'रिमझिम रिमझिम'  या दोन शब्दांत स्वल्पविराम का नाही ते आता स्पष्ट व्हावं.
       आणि त्यानंतरची ती तीन टिंबं ? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या चिरंतन ऋतुचक्रांशी नातं सांगणारी ? की बालपण, तारुण्य आणि वार्धक्य याची आठवण करुन देणारी ? पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग हे तिन्ही लोक व्यापून टाकणारी ? की साक्षात ब्रह्मा, विष्णु, महेश ? उत्पत्ती, आस्तित्व व विलय यांची प्रतिकं ?
नाही. नीट पहा. नीट निरखून पाहिलं की दिसून येईल की टिंबं तीन नाहीत. तर चार आहेत. चौथं अदृश्य आहे.तीन टिंबांनंतर जी मोकळी जागा आहे तेच चवथं टिंब आहे. असून नसलेलं किंवा नसून असलेलं. जणु त्रितालातली चौथी टाळी, न वाजता वाजणारी, गाण्याला अर्थ देणारी. 'तीन ताली एक खाली' मधून लयबद्ध घुमणारी!
ही दिसणारी तीन टिंबं ह्या आपण ज्या त्रिमित विश्वात रहातो त्याच्या तीन मिती आहेत. लांबी, रुंदी आणि उंची. चौथी मिती काळ. आइन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या समीकरणातला काळ. तो दिसत नाही पण असतो. पुढं सरकतो, आपल्याबरोबर वर्तमानकाळाला फरपटत नेतो. त्या काळाचं प्रतिक हे चौथं टिंब! न दिसणारं टिंब. निराकार आकार, नीरव ध्वनी. नलेश सामंतांची कविता लयीच्या अंगाने का वाचावी लागते ते आता कळेल. तशी वाचली नाही तर हे चौथं टिंब दिसणारच नाही. लयीच्या अंगाने वाचली तरच त्रिताल ऐकू येतो आणि मग कवितेचा अर्थ लागतो. नलेश सामंत केवळ अक्षरांत आणि विरामचिन्हातच अर्थ भरतात असं नाही पण नसलेल्या विरामचिन्हातही अर्थ भरतात हे आता मान्य व्हायला हरकत नाही.
     कवितेतली पुढची ओळ अतिशय महत्त्वाची आहे. रमजिन, रमजिन। सर्वसामान्य वाचकांना हे मद्यप्रकार वाटतील. रम आणि जिन. ते पीत पीत कोणीतरी रिमझिम पावसाचा आनंद घेत बसलंय असं वाटेल. रम हा पुरुषी मद्यप्रकार. सैनिक, शिकारी अशा मर्द गड्यांचा लाडका. आणि जिन जनानी. जिन हे बायकांचे पेय. म्हणून मग रम आणि जिन ही स्त्री-पुरुषांची प्रतिके आहेत असे वरवर पहाता वाटेल. नलेश सामंतांना स्त्रीपुरुष संबंधांबद्दल लिहायचं आहे, प्रकृतीपौरुषेय रंगवायचं आहे असा भास होईल. बाहेर धुवांधार पाऊस पडतोय, कुणीतरी प्रियेला मिठीत घेऊन मद्याचा आस्वाद घेतोय असं चित्र मन:पटलावर उमटेल. पण तो भ्रम आहे, ते खरं नाही.
सामान्य कवीच्या कवितेत एकच अर्थ असतो. चांगल्या कवीच्या चांगल्या कवितेत वर जाणवणाऱ्या अर्थाच्या खाली एक खोल अर्थ दडलेला असतो. तो अर्थ न जाणवणाऱ्या किंवा तिथपर्यंत नजरच न पोचू शकणाऱ्या मंदबुद्धी वाचकांच्या मते ही कविता अर्थहीन ठरु शकेल. कदाचित त्यांना ही कविताच वाटणार नाही. पण अशा मूढांची कींव करण्यापलिकडे आपण काय करु शकतो? या अर्थाच्या पल्याडचा अर्थ कोणता ?
 रम या धातूपासून रमणे हे क्रियापद बनते. त्याचा अर्थ खेळणे, आनंद घेणे, उपभोग घेणे, आसक्त होणे(पहा मराठी शब्दरत्नाकर-कै. वा̱. गो. आपटे यांचा शब्दकोश) आणि जिन म्हणजे जितेंद्रिय, जैन साधू (पहा तोच शब्दकोश).
हे अर्थ घेतले की समजते की रम आणि जिन हे मद्यप्रकार नाहीत. ती स्त्री-पुरुषांची प्रतिकेही नाहीत. नलेश सामंतांना त्यातून काहीतरी वेगळच सांगायचं आहे.
रम आणि जिन. इंद्रियसुखात रमणे आणि इंद्रियांवर विजय मिळवणे. उपभोग आणि संयम, आसक्ती आणि विरक्ती, भौतिक आणि पारलौकिक, स्वार्थ आणि परमार्थ, चंगळवाद आणि त्याग. थोडक्यात रम आणि जिन ही मद्यं नसून माणसाच्या मनांतल्या प्रवृत्तीची दोन टोकं आहेत. ज्याक्षणी हे लक्षांत येतं त्याक्षणी थरारुन जायला होतं. नलेश सामंतांना जे सांगायचं असतं ते असंच वैश्विक सत्य असतं.
पहिल्या ओळीत एका आत्म्याचा युगायुगांचा प्रवास आहे हे आपण पाहिलंच. त्यानंतरच्या चार टिंबातील दिक्कालासही अतीत होणं समजून घेतलं. आणि दुसऱ्या ओळीत त्यांनी रंगवलेला सदाचार आणि दुराचार, साधू आणि सैतान, देव आणि दैत्य यांच्यात चाललेला सनातन झगडा पाहून तर मन त्यांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही!
 केवळ चार शब्दांत त्यांनी कुठल्याकुठे झेप घेतली आहे हे बघितल्यावर त्यांना केवळ याच नाही तर पुढच्या चार शतकातले श्रेष्ठ कवी का मानतात ते समजतं!!!
                                                        ------- सुबोध जावडेकर

टीकेविना : हा लेख प्रसिद्ध झाल्यावर जावडेकर यांना ' हे काय लिहिलंय' यापासून नलेश सामंत व संयोगिता वरणगांवकर यांचा पत्ता विचारणारी पत्रं आली. कांहीजणांनी तर आपण नलेश सामंत यांना ओळखत असल्याची ग्वाही दिली.


माझे मित्र व प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक सुबोध जावडेकर यांची एक अप्रतिम विडंबन समीक्षा 'अंतर्नाद' या मासिकात प्रसिद्ध झाली होती. ती मनोगतींच्या विरंगुळ्यासाठी लेखकाच्या परवानगीने पाठवत आहे.