असे का ?

लहानपणापासून मला पडणारे असंख्य प्रश्न. त्यांतील कांही निवडक .........

१. पेरुची बी आणि दांतातली फट एकाच मापाची का असते ?
२. प्रत्येक लग्नांत एकतरी दांताची फणी ओठाबाहेर पसरलेली स्त्री का असते ?
३. हंसताना बहुतेक बायका तोंडावर हात का धरतात ?
४. नथ घातल्यावर आपण चांगले दिसतो असा सार्वत्रिक गैरसमज का आहे ?
५. मुहूर्ताची वेळ न पाळता त्यानंतरही मंगलाष्टके का म्हणत रहातात ?
६. मंगलाष्टके म्हणणाऱ्यांना आपण सुरेल गातो असे का वाटते ?
७. कांही लोकांचे तोंड कायम उघडे का असते ?
८. आपण काहीच म्हणालो नसताना समोरचा माणूस 'काय म्हणताय?' असे का विचारतो?
९. लांब पल्ल्याच्या गाड्यांची दारे एका वेळेला एकच माणूस आंतबाहेर करु शकेल इतकी लहान का असतात ?
१०. रिझर्व्हेशनच्या डब्यांत शिरताना आपण नेमके आपल्या सीटच्या विरुद्ध दिशेने आंत का शिरतो?
११. दादर (मध्य) स्टेशनच्या प्रत्येक उदघोषणेमागे एक प्रश्नचिन्ह का असते ?
१२. लोकलमधे आपल्याच सीटच्या खाली आवाज करुन दचकवणारा काँप्रेसर का असतो?
१३. लोकलमधे पंख्यांना स्विच ठेवण्याऐवजी कंगवेच का नाही ठेवत ?
१४. सर्व फेरीवाले आवाजाचे स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलेले असतात का ?
१५. डाऊन आणि अप हे कोणत्या दिशांच्या आधारे ठरवतात ?
१६. टाईमटेबल मधे छापलेले खाद्यपदार्थाचे दर कोणत्या जमान्यातले असतात ?
१७. लोकांना 'पूल' वापरायला सांगणाऱ्या रेल्वेचे कर्मचारी स्वत: रुळ का ओलांडतात ?
१८. हवाईअड्डा हे नांव 'सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचे  स्थान ' या अर्थाने ठेवले असेल का ?
१९. परदेशी जाताना चित्रविचित्र पोशाख का घालावे लागतात ?
२०. कुठलीही माहिती न लपवता आपली 'योजना' सांगणारी मोबाईल कंपनी आस्तित्वात आहे का ?
२१. मराठी वाहिन्यांवर कायम 'अशुद्धलेखन का असते ?
२२. ठळक बातम्या सांगताना शक्य तेवढा वाद्यांचा गोंगाट का करतात ?
२३. दु:खद बातमी सांगतानाही काही वाहिन्यांवर मागे तबले का बडवले जातात ?
२४. बोलण्याची सुरवात संवाददात्याला कायम 'देखिये' या शब्दानेच का करावी लागते ?
२५. मुलाखतींच्या कार्यक्रमात दूरध्वनीवरुन प्रश्न विचारणारे मानसिकदृष्ट्या सक्षम असतात का ?
२६. सर्वात आचरट जाहिरातीचे बक्षीस टीव्हीला मिळेल का एफेम रेडिओला ?