भेजा फ्राय - नवीन चित्रपट

भेजा फ्राय हा नवीन चित्रपट कालच पाहिला. वेगळा विषय, वेगळी हाताळणी यामुळे त्यावर लिहावेसे वाटले. मुंबईतल्या चित्रपट आणि संगीत या क्षेत्रात काम करणारी माणसे ही यातील मुख्य पात्रे. त्या अर्थाने 'नवीन' पिढीचा हा चित्रपट आहे. त्यामुळे या पात्रांतील संबंध (वैवाहिक व इतर) हे थोडेसे न झेपणारे वाटू शकतील. परंतु जे मुंबईत 'लोखंडवाला' अथवा तत्सम परिसरात राहिले / फिरले आहेत त्यांना हा विषय फार नवीन वाटणार नाही. किंबहुना, त्यात आपल्या ओळखीचे कोणी असल्याचा भासदेखील होऊ शकतो (जसा काही पात्रांबद्दल मला झाला).

प्रज्ञा शोध (टॅलेंट हंट) या नावाखाली कुणालातरी आठवड्यातून एकदा तरी पकडून उचकवणारा आणि त्यातून स्व-करमणूक करून घेणारा एक संगीत (ध्वनिफीत) व्यावसायिक (रणजित थडानी) हे एक मुख्य पात्र. [या 'करमणुकीत' अजून बाकीचे लोकही असतात. पण चित्रपटात त्यांचा जवळजवळ काहीच सहभाग नाही, कारण चित्रपटात]. त्याची बायको (शीतल) ही गायिका. तिला ही करमणूक पटत नाही, पण आठवड्यातून एकदा रणजितला त्यापासून ती रोखू शकत नाही (किंवा ती रोखत नाही). तिचा आधीचा साथीदार (अनंत घोषाल; त्यांचे आधी लग्न झाले असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. असल्यास लक्षात राहण्याजोगा ठळक नाही) हा एक संगीतकार. दुसरे महत्त्वाचे पात्र (भारत भूषण) स्वतःला गायक समजणारे आणि आयकर विभागात काम करणारे. त्याचा एक सहकारी (असिफ मर्चंट) दुय्यम भूमिकेत. रणजितची एक भानगड (सुमन राव) ही एक नवोदित गायिका. एक डॉक्टर (एका दृश्यात), एक चौकीदार (दोन-तीनदा अर्ध्या दृश्यात प्रत्येकी), एक चारचाकी गाड्यांचा विक्रेता (दोनदा) आणि त्या विक्रेत्याची एक सहायक (अर्ध्या दृश्यात). पात्रे संपली.

एवढाच सुटसुटीतपणा चित्रपटातल्या गाण्यांबाबत आहे. एकच गाणे. तेही बरेच सुसह्य. आणि कथानकात बऱ्यापैकी सुसंगत वाटणारे. एरवी हिंदी चित्रपटांत गाणी म्हणजे वाळवंटात पाऊसपोषाखाइतकी विजोड भासतात.

सुरुवातीच्या पाच-दहा मिनिटातच आपल्याला रणजित, भारत भूषण आणि शीतलचा परिचय होतो. एका शुक्रवारी भारत भूषणला 'डिनर'ला बोलवायचे आणि त्याची 'खेचायची' हा रणजितचा कार्यक्रम ठरतो. आणि ज्या दिवशी भाभू रणजितच्या घरी येणार त्याच दिवशी रणजितची पाठ चांगलीच आखडते. अगदी ठरलेल्या 'डिनर'ला जाऊ नकोस असे डॉक्टरने आणि शीतलने सांगण्याइतकी. रणजितने भाभूला आपल्या घरीच बोलावलेले असते. आणि ही 'करमणूक' मान्य नसलेली शीतल बाहेर निघून जाते ('कुठे जाणार?' 'ते बाहेर गेल्यावरच कळेल' असे फटाके उडवून). भाभू घरी पोचतो. आणी...मुख्य चित्रपट हा भाभूने घातलेले घोळ हाच असल्याने त्या प्रसंगांची जंत्री देऊन रसभंग करीत नाही.

चित्रपट फारच छोट्या जिवाचा आहे (९० मिनिटे). त्यामुळे कुठेही 'आता पुरे' अशी जांभई येण्याची शक्यता कमी होते. पण अशा जांभया येत नाहीत याचे मुख्य श्रेय कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि कलाकार या सर्वांना.

संवादांचे भुईनळे कसे फटाफट हशे पिकवतात ते प्रत्यक्षच अनुभवलेले बरे.

छायालेखनाने सुरुवातीला अपेक्षा वाढवल्या (सुरुवातीला व्होल्व्हो बसचे लोणावळ्याजवळ घेतलेले शॉट्स), पण नंतर ते 'ठीक आहे, कधी कधी चांगले आहे' या पायरीवर थांबते.

पात्रयोजना चांगली. भारत भूषण, रणजित आणि अनंत हे जणू या भूमिकांसाठीच जन्माला आले होते आणि हा चित्रपट निघेपर्यंत उगाच जगण्यासाठी काहीतरी करत होते असे वाटण्याइतके प्रभावी. शीतलचे पात्र चांगले रंगवले गेले आहे पण कधी कधी ती फारच 'नैसर्गिक' अभिनय करते आहे (म्हणजे काहीच विशेष करत नाही) असे वाटत राहिले. तसेच सुमन राव हे पात्र बरेच खोटे वाटते. अर्थात अशी खोटी पात्रेही या जगतात भरलेली आहेत हेही सत्यच आहे. त्यामुळे या दोघींना दुसऱ्या रांगेत बसवावे की पहिल्या हा निर्णय वैयक्तिक ठेवलेला बरा (सुमन राव हे पात्र अंग बऱ्यापैकी झाकून वावरते ही गोष्टही तिच्या 'जमा' बाजूत घालायला हवी. अन्यथा 'कथानकाची मागणी' या नावाखाली त्वचादर्शन करायला बराच वाव होता). एकंदरीत प्रत्येकाचे काम अत्यंत सहज झालेले आहे. अपवाद असिफचे काम करणारा रणवीर शोरे हा नट. त्याला असे गोठवलेल्या चेहऱ्याने वावरायला लावण्याचे कारण कळत नाही. बाकीच्या सर्व लोकांच्या कामामुळे ही गोष्ट जास्त जाणवते.

आता काही 'दाताच्या मापाच्या पेरूच्या बिया':

संवाद लेखनाची पातळी एकंदर चांगली आहे पण एक-दोन ठिकाणी तोल सुटला आहे. त्यातील एक उल्लेख हा फारच सरळसोट आला आहे - 'क्या आप आपके हर गायिका के साथ XXXXXX करते है?' हा भारत भूषणचा प्रश्न. आणि दुसरा उल्लेख हा हीन अभिरुचीचा (शब्द कडक आहे, पण एकंदर चांगल्या दर्जाच्या पार्श्वभूमीवर हे हीण फारच उठून दिसते म्हणून वापरला) निदर्शक आहे. 'रवींद्र जैनतक ने तुम्हे धक्के मारकर बाहर निकाल दिया' 'वो तो अंधा है, उसे टॅलेंट की कदर नही है'.

तसेच कथेतही काही ठिकाणी काही तर्कसंगती लागत नाही. या चित्रपटात एरवी उच्च दर्जाचे जे प्रदर्शन आहे, त्यामुळे हे उठून दिसते. रणजित जी 'करमणूक' करून घेतो ते नक्की काय आहे (कुणातरी 'गरीब, भाबड्या' माणसाची चेष्टा करणे) हे कळायला जरा वेळ जावा लागतो, कारण ते फारच पटकन उरकले आहे. तसेच फोनवर कुणीही पटकन 'अमुक तमूकची बायको आत्ता माझ्याकडे आहे' असे अनोळखी माणसाला सांगेल काय?

अर्थात कुठल्याही 'फार्स'मध्ये असे खडे पचवावेच लागतात असे आपण सर्वच मान्य करतो. पण इथे बबन प्रभूंची आठवण येते. त्यांच्या नाटकांमध्ये असे खडे जवळपास नसतात. विनोद हा पाण्याने भरलेला फुगा फटकन आपल्या अंगावर फुटण्यात आहे. त्या फुग्याला जर भोके पडलेली असतील तर बरेच पाणी गळून जाते आणि ते फुटणे केविलवाणे होते. हा चित्रपट सुदैवाने केविलवाणा होण्यापर्यंत गेला नाही.

थोडक्यात, निसरड्या प्रतलावरून (surface या अर्थी; ही संज्ञा फारच भौमितिक आहे हे मान्य. पण 'पृष्ठभाग' याचा दुसराही अर्थ आहे जो अश्लील ठरण्याचा धोका वाटला) चालण्याचा प्रयोग करण्यासारखी या चित्रपटकर्त्यांची अवस्था आहे. मध्येच तोल जातो पण सुदैवाने सावरतो.

एकंदरीत, वाट (बरीचशी) वाकडी करूनही पाहायला हरकत नाही.

तळटीप: एवढा चांगला चित्रपट संपूर्णपणे भारतीय कसा असेल? असा प्रश्न कुणाला पडलाच तर आंतरजालावर इतस्ततः फिरणारे त्याचे उत्तरही देऊन ठेवतो. Le Diner De Cons हा फ्रेंच चित्रपट हे मूळ प्रेरणास्थान आहे असे वाचण्यात आले.