बरखा बैरी भयो.....

बरखा बैरी भयो.....सजनवा....गौड मल्हार रागातील हा ख्याल बाई गायला लागतात. बाईंचा फुरशासारखा गिरकी लागलेला आवाज, सुरवातीच्या ताना आणि समेवर बरोबर... बैरी भयो सजनवा....लाजवाब. त्या तानांमधे, गौड मल्हारामध्ये आणि त्रितालाच्या साथीमध्ये मी बुडून जातो. बरखा बैरी भयो....क्या बात है...बरखा बैरी भयो......

संध्याकाळचा सुमार आहे पण रात्रीलाही लाजवेल असा अंधार झालाय. पाऊस धुवांधार कोसळतोय. समोरच्या रस्त्याचा तलाव झालाय. गटारं चुकवण्यासाठी मी रस्त्यामधल्या divider वर चालतोय कारण रस्ता दिसतंच नाहीये. मीच नाही माझ्याबरोबर असंख्य लोकं चालतायत. मुंग्यांची रांग लागावी तशी माणसांची रांग लागलेय. पाऊस कोसळतोच आहे. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर फक्त एकच भाव आहे. चिंता.

अहाहा! बैरी भयो.....बरखा बैरी भयो.......क्या बात है....वाह......बहोत खूब...

कुणाचीतरी किंवा स्वतःची चिंता. घरी पोहोचायचं कसं? माझं बाळ घरी एकटं असेल. एक आई तडफडून सांगतेय. सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार फरकाने सारखीच आहे. कुणाची पिल्लं घरी, तर कुणी पिल्ल स्वतः रस्त्यावर, घरट्यापासून दूर. Mobiles चालत नाहीयेत, दिवे चालत नाहियेत, ट्रेन, बसेस, गाड्या काहीच चालत नाहीये. चालतायत फक्त पाय. पाण्यातून रस्ता काढत काढत आपापल्या घरांकडे निघालेले लाखो पाय.

......जाने न देत मोहे पी की नगरिया.......जाने न देत.....वाहवा........समेवर परत बैरी भयो.......बरखा बैरी भयो........

कोणीतरी ओरडतं. पाय, पाय. पांव. समोरच्या तळं झालेल्या रस्त्यातून दोन पाय तरंगताना दिसतात. रांगेतली एखादी धीट मुंगी पाण्यात उडी मारते. चार हात मारून त्या पाय़ांपर्यंत पोहोचते. पोचल्यावर कळतं. ते पाय चालायचे कधीच थांबलेत. उलटं तरंगणारं प्रेतच हाताला लागतं. पोरंसोरं घाबरतात. आयामायांचे हात हुंदका आवरण्यासाठी तोंडाकडे जातात. मी मात्र चालत राहतो. मुंगीसारखा रांगेमध्ये. हूं की चू न करता.

......काय तान आहे.....सुरेख....बरखा बैरी भयो.......सजनवा.....

नऊशे चव्वेचाळीस मि.मि. पाऊस अवघ्या काही तासांत. चारशेसहा लोकं त्या पावसांत गेली. कायमची. बुडून, वाहनात अडकून. रेटारेटीत. चारशे पन्नास करोड रुपयांचं नुकसान. पाण्यात. मी मुंग्यांची रांग सोडून माझ्या वारुळाकडे चालायला लागतो. तळ मजल्यावरच्या वारुळातल्या मुंग्या वरच्या मजल्यांवर सरकल्यायत. त्यांची घरं पाण्याने भरलेयत. कसा बसा मी माझ्या वारुळात पोहोचतो.

......बरखा बैरी भयो......बाई पुढच्या ओळींना हात घालतात. गरज गरज बरसे बदरिंया......चमकन लागी पापी बिजुरिया, जाने न देत मोहे पी की नजरियां........बरखा बैरी भयो.........बरखा बैरी भयो......सजनवा......

आमची गाडी डोंगरावरून खाली उतरतेय. समोरचा विस्तीर्ण परिसर फक्त एकाच रंगात माखलाय. तांबड्या. हिरवा रंग नावालाही नाही. गाडी डोंगर उतरते. रस्त्याच्या कडेला पिवळं, वाळून गेलेलं गवत दिसतंय. झाडांचे नुसते वठलेले बुंधे आणि फांद्या. पानं कधीतरी असावीत अशी शंकासुद्धा येत नाहीये. तहानेने घसा कोरडा झालाय. समोरच्या धुराळलेल्या गावात गाडी शिरते. गावठाणातली एक विहीर. गाडी थांबते. उतरून बघतो तो कोरडी ठणठणीत. बाजूला टॅंकरच्या वेळा लिहिल्यायत. शेजारच्या दुकानातून मी बिस्लेरी ची बाटली आणि थोडं खाणं विकत घेतो.

......बरखा बैरी भयो......आता बाईंचा आवाज चांगलाच तापलाय. मुडात येऊन तो सुंदर हरकती घेतोय. त्रितालाची लय वाढायला लागली आहे. एक जोरकस तान मारून बाई समेवर अलगद....बैरी भयो...... वर येतात.......

गाडी पुढे जाते. मध्ये कुठे पाण्याचा हातपंप दिसतोय. मुलं त्याच्यावर काहीतरी खेळतायत. त्या पंपाचं तोंडच समोरच्या मातीच्या ढिगार्‍यात बुडलंय. आजूबाजूला मोकळी जमीन. जमीन नव्हे, शेत आहे ते. उन्हाने रापलेली. मोकळी ढाकळी ढेकळं डोळ्यात भरून राहतात. शेताच्या बांधावर एक शेतकरी उकिडवा बसलाय. आभाळाकडे डोळे लावून. त्याच्या डोळ्यांत रडायलासुद्धा पाणी नसावं.

.......बरखा बैरी भयो.......सुभानल्ला......काय हरकती....वाहव्वा.....वाह्व्वा....जाने न देत मोहे.......

गावातून बाहेर पडताना शेवटी गावदेवीच असावं असं एक देऊळ आहे. त्याच्यापुढे गावाची वेस आणि वेशीच्या बाहेर एका मेलेल्या बैलाचं धूड पडलंय. चारा नाही, पाणी नाही. रोगामुळे कसाईसुद्धा गिर्‍हाईक नाही. गिधाडं त्याच्या अंगाचे लचके तोडतायत. माझ्या हातांत गावात विकत घेतलेल्या खाण्याच्या पदार्थाची पुडी आहे. त्या पुडीला बांधणार्‍या वर्तमानपत्रावर दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्ज, जवाहर रोजगार योजना ह्यांबद्दल काही लिहिलंय. मघाशी घेतलेली बिस्लेरीची बाटली फोडून आता मी पाणी पितोय. आता कसं थंडगार वाटतंय.

.....बैरी भयो........क्या बात है.......तबल्याची गत....झकास......शेवटच्या अणुकुचिदार ताना घेऊन बाई शेवटची तिहाई घेतात. बरखा बैरी भयो........बरखा बैरी भयो........बरखा बैरी भयो.......