प्रतोद पुन्हा येत आहे-२

   प्रतोद पुन्हा परत केव्हा येईल याची निश्चित कल्पना विश्वामित्र करू शकत नव्हते त्यामुळे बैठकीनंतर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधायचे त्यानी ठरवले त्यानुसार आपल्या प्रयोगशाळेत त्यानी प्रवेश केला आणि समोर पहातात तो काय प्रद्योतच समोर ! क्षणभर हा भासच आहे असे त्याना वाटले पण दुसऱ्याच क्षणी प्रपातने त्यांची मनस्थिती जाणून चटकन पुढे होऊन " होय बाबा, आपला प्रद्योतच परत आला आहे."असे म्हटल्यामुळे ते भानावर आले आणि पुढे होऊन प्रद्योतला कवेत घेण्यासाठी पुढे सरकले , शास्त्रज्ञ असले तरी तेही शेवटी माणूसच होते.भावनावेगाने दोन्ही हात पसरून त्यानी त्याला आपल्या मिठीत घेतले.पण का कोणास ठाऊक हा आपला मुलगा नाही अशी भावना त्या स्पर्शातून उत्पन्न झाल्यासारखे वाटले त्याना.वर्षभर बापापासून दूर राहिलेल्या आणि परत भेट होईल की नाही अशी शंका असणाऱ्या मुलाच्या स्पर्शात जाणवणारी आतुरता त्यात नव्हती उलट तो स्पर्श एकाद्या अगदी अनोळखी व्यक्तीचा असावा अशी भावना त्यातून व्यक्त होत असल्याचा भास त्याना झाला.
" बेटा तू माझा प्रद्योतच आहेस ना?" न राहवून त्यानी विचारले.
" असे का म्हणता बाबा ?" प्रद्योत उत्तरला,"अशी शंका का बरे आली तुम्हाला ?"
"मला अशी शंकाच नाही तर खात्रीच वाटतेय की तू तो नव्हेस,असे वाटण्याचे कारण तुझा स्पर्श तो नाही,तुझी दृष्टी बदलली आहे आणि हा फरक केवळ तुझा बाप असल्यामुळे केवळ मलाच जाणवतो आहे.कदाचित काही काळानंतर तो प्रपातलाही जाणवेल.माझा अंदाज आहे की प्रतोदवासीयानी एक वर्षात तुझ्यावर काही प्रयोग केले असणार आणि त्याचाच हा परिणाम असावा.बर मला सांग तू आलास कसा?तुझ्याबरोबर कोणीतरी आलेच असणार,की तुला सोडून ते निघून गेले?"
"तुमचा अंदाज १००% बरोबर आहे विश्वामित्रजी, आणि त्याबद्दल तुमचे अभिनंदन !"आत प्रवेश करणाऱ्या आकृतीने म्हटले अर्थातच ती व्यक्ती एक वर्षापूर्वी प्रद्योतला घेऊन जाणारी प्रतोदवासीच होती.पुढे होऊन ती पुढे बोलू लागली.
"प्रथम तुम्ही आमच्या मैत्रीचा स्वीकार करण्याचा निर्णय केल्याबद्दल तुमचे अभिनंदन !आम्हास तुमच्या उच्चस्तरीय बैठकीचा अहवाल खरोखरच लगेचच मिळाला किंवा त्या बैठकीचे प्रत्यक्ष प्रक्षेपणच आम्ही पहात होतो म्हणाना.आमचा प्रगतपणाविषयी तुम्ही केलेल्या अंदाजाबद्दल तुमचे कौतुक करूनही त्या बाबतीत तुमची कल्पनाशक्ती जरा कमीच पडली असे खेदाने नमूद करावे लागते.कारण आमच्यापासून गुप्त रहावी म्हणून आमज्याविरुद्ध वापरण्यासाठी तुम्ही काय यंत्रणा निर्माण करीत आहात त्याविषयी खडान खडा माहिती आमच्याकदे आहे आणि आमच्या या दुसऱ्या भेटीच्यावेळी वापरण्यासाठी तुम्ही निर्माण केलेले लेसर आणि होलोग्राफिक मायाजाळ म्हणजे ती यंत्रणा म्हणजे आमच्या दृष्टीने अगदी पोरखेळ आहे आणि त्यामुळे त्यावर चुटकीसरशी मात करणे हा आमच्या हातचा मळच आहे आता जाऊन पहा,त्यातील एक तरी किरण शिल्लक आहे का ."
   " आणि तरीही ------"विश्वामित्रानी मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रतोदने त्यांचे वाक्यही पुरे होऊ दिले नाही.
   "होय तरीही मानवजात हुषार आहे,बुद्धिमान आहे हे आम्ही जाणतो.त्याचमुळे एक दिवस तुम्ही प्रतोदवर नक्कीच पाऊल ठेवाल हे आम्ही जाणतो."
" आपण एवढे प्रगत आहात की आमच्याकडून तुम्हास कोणताच धोका संभवत नाही हेच सिद्ध होते यावरून.आणि तसे काही करण्याचा इरादाही नाही आमचा !" 
" आज नसेलही तरी उद्याचा काय भरवसा ? निरनिराळ्या ग्रहावरील वातावरण निर्माण करण्याचे आपले प्रयोग काय दर्शवतात? याबाबतीत आम्ही कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही.याशिवाय तुम्ही किती शांतताप्रिय आहात याची पुरेपूर कल्पना आहे आम्हाला.फार पूर्वी तुमच्याच ग्रहावरील एका प्रगत आणि शांतताप्रिय देशावर इतर देशांनी स्वाऱ्या करून तेथील लोकांना हवे तसे लुटले.त्यानंतर एका महत्त्वाकांक्षी मानवाने सर्व जग आपल्या कह्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या वंशाभिमानाच्या अवास्तव जाणिवेने अनेक मानवांचा अमानुष संहार केला.त्यावेळी त्याच्या विरोधात लढणाऱ्या बाकीच्या देशानीही केवळ त्याला वठणीवर आणण्यात समाधान न मानता महासंहारक अणुशक्ती एकादे खेळणे लहान मुलाने वापरावे अशा पद्धतीने वापरून त्या क्रूरकर्म्यालाही लाजवील असा भयंकर नरसंहार घडवून आणला.लोकशाहीचे डांगोरे पिटणाऱ्या एका देशाने हम करेसो कायदा अशा वृत्तीने वागायला सुरवात करून अनेक देशांचा विनाश करायला सुरवात केली. आणि तुम्ही त्याला तोडीस तोड महासत्ताच न उरल्यामुळे  हे सर्व निमूटपणे पहात बसलात.तुम्हाला एक संपन्न ग्रह मिळाला आहे पण त्याचे तुमच्या युद्धपिपासू  आणि निसर्गाला लुटण्याच्या वृत्तीने वैराण वाळवंटात रूपांतर करून आता तुमची नजर दुसऱ्या कोठल्या ग्रहाचा असाच सत्यानाश करता येईल याकडे वळली आहे.आमची समृद्धी आता तुम्हाला खुपू लागली आहे.आम्ही प्रगत आहोत त्यामानाने आमचे मित्रग्रह मारिच आणि प्रबाहु कमी प्रगत असल्यामुळे कदाचित त्याना तुम्ही प्रथम लक्ष्य कराल पण आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी दक्ष आहोत हे लक्षात असू दे."
      विश्वामित्र अस्वस्थ होऊन ऐकत होते.प्ततोदच्या उद्गारातील सत्य आणि तथ्य त्याना जाणवत होते. अनेकवेळा त्यानी आणि त्यांच्याचसारख़्या वैज्ञानिकांनी मानवजातीस इशारे दिले होते.पर्यावरणाचा ऱ्हास टाळा,निसर्गाचा समतोल राखा,निसर्गाने दिलेली दौलत वारेमाप उधळू नका,जंगले वाढवा,पण प्रत्येकास वाटे की हे सर्व इतरानीच करावे.परिणाम उघड होता.
        " प्रद्योतला आम्ही घेऊन गेलो त्याला कारण हेच होते." आपले बोलणे पुढे चालू ठेवीत प्रतोद म्हणाला,"त्यामागे आमचे दोन उद्देश होते.पहिला आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला दाखवणे.त्यावर तुम्ही किती हतबल होता याचाही अनुभव तुम्हाला आला आहे.आमचा दुसरा उद्देश प्रद्योततर्फे तुमच्या कारवायांवर नजर ठेवणे.क्षमा करा हा शब्द वापरल्याबद्दल पण तुमचा पुढील टप्पा या तीन ग्रहापैकी शक्य होईल त्यावर ताबा मिळवणे हाच असणार आहे याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला.आमच्याकडे एक वर्ष राहिलेल्या प्रद्योतवर आम्ही काही प्रयोग करून त्याच्या मेंदूतील काही पेशींमध्ये घडवून आणलेल्या बदलांमुळे तो जरी तुमचा मुलगा असला तरी त्याच्या मेंदूतील विचारप्रणालीची आता आमच्या संगणकांत नोंद होत आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक हालचालीची नोंद आमचा संगणक घेत आहे. प्रद्योत हा एका परीने तुमच्या ग्रहावरील आमचा गुप्त हेर आहे.प्रद्योतचा स्पर्श,दृष्टी यात तुम्हाला वेगळेपण भासण्याचे कारण हे आहे."
         " प्रद्योत हा केवळ एक नमुना आहे.केवळ आपला मुलगा असल्यामुळे त्याचा एवढा गाजावाजा झाला पण असे अनेक प्रद्योत सध्या पृथ्वीवर कार्यरत आहेत आणि त्याचा पत्ताही तुम्हाला नाही. आमचे विचार समजावून घेऊन तुमच्या राज्यकर्त्याना समजावणे हे काम तुम्ही आणि तुमच्यासारखे वैज्ञानिक विचारवंतच करू शकतील असे वाटत असल्यामुळे पहिल्यापासून आम्ही तुमच्या संपर्कात आहोत.आम्हास खात्री आहे की या कार्यात तुम्ही निश्चित यश मिळवाल. आम्ही शांतताप्रेमी असल्यामुळे विश्वशांतीच्या कोणत्याही प्रयत्नात तुम्हास सहकार्य करावयास आम्ही नेहमीच उत्सुक आहोत.आता आमची परतीची वेळ झाली आहे.प्रद्योत आमच्याशी केव्हाही संपर्क साधू शकतो. नमस्कार !"
             प्रतोदचे शब्द पूर्ण होईपर्यंत यान निशब्दपणे केव्हा त्याच्यासमोर आले,त्यात प्रतोद केव्हां चढला आणि यान केव्हां सुरू झाले हेही विश्वामित्रांच्या लक्षात आले नाही.फक्त थोड्याच वेळात ते तिघे त्यांच्या नजरेपुढेच नाहीशा होणाऱ्या अंतराळयानाकडे पहात राहिले. 

प्रद्योत परत येत आहे-दोन प्रश्न
१)ॐ ने दिलेल्या प्रतिसादात डोक्यावरून गेल्याचा उल्लेख आहे पण आता कथा पूर्ण वाचल्यावर पहिल्या कथेला "प्रासूर परत येत आहे" असे का नाव दिले आणि या पुनर्लेखनात प्रासूरच्या जागी प्रतोद असा बदल का केला हे मनोगती जाणू शकतील अशी आशा वाटते.
२)मराठी विज्ञान परिषदेच्या १९७५ मधील या विज्ञान कथास्पर्धेतील विजेत्याचे नाव काय असेल ( होते )?
वरील दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा मनोगतींनी प्रयत्न करावा अशी इच्छा आहे.