बसंत बहार -१

लोकप्रियता आणि दर्जा या दोन्हीचा समतोल साधणे हे काही सोपे काम नाही. जनसामान्यांची अभिरुची ही सामान्यच असते आणि लोकप्रिय व्हायचे तर या जनतेला रुचेल अशीच अभिव्यक्ती असावी लागते. संख्याशास्त्रात प्रसिद्ध असलेला 'बेल शेप्ड कर्व्ह' हेच सांगून जातो. काही काही कलाकार बाकी जनप्रियता आणि कलात्मकता यांचा सुरेख मेळ घालून यशस्वी होऊन जातात. संगीतकार शंकर जयकिशन ही अशीच एक यशस्वी जोडी. शंकर जयकिशन यांच्या गाण्यांचा दोन भागातला 'बसंत बहार' नावाचा कार्यक्रम नुकताच पाहिला. शंकर जयकिशन यांचे संगीतक्षेत्रातले  यश इतके घवघवीत आहे की त्यासाठी त्यांनी वाटेल त्या व्यावसायिक तडजोडी केल्या, इतर संगीतकारांना यश मिळू नये यासाठी राजकारण केले असे बरेच काही ऐकायला मिळते. ते सगळे सोडून या जोडीच्या उत्तम रचनांचा आस्वाद घ्यावा म्हणून या कार्यक्रमाला गेलो. 'हमलोग' ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे वादक आणि गायक अत्यंत तयारीचे होते. वाद्यवृंद - ऑर्केस्ट्रेशन - हे शंकर जयकिशन यांच्या संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य. ऍकॉर्डियन, मेंडोलिन, बासरी आणि व्हायलिन यांचे अत्यंत आकर्षक तुकडे वापरुन रचलेल्या या जोडीच्या रचना या कार्यक्रमातील वादकांनी हुबेहूब पेश केल्या. 'आवारा हूं' या गाण्याच्या वाद्यसंगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या गाण्यातले  मेंडोलिनचे तुकडे आपापल्या मनाशी आठवून पहावेत! नूर सज्जाद या सज्जादसाहेबांच्या चिरंजीवांनी ते तंतोतंत वाजवले यात नवल काय? जिया बेकरार है ( बरसात) हे विभावरीनं गायलेलं गाणं आणि या जोडीला पहिलं फिल्मफेअर पारितोषिक मिळवून देणारं ये मेरा दीवानापन है (यहुदी ) हे प्रमोद रानडेनी रंगवलेलं गाणं यांनी माहौल तयार केला. प्रशांत नासेरीचं छेडा मेरे दिल ने तराना तेरे प्यार का (असली नकली) हे तर सदाबहारच गाणं. अनघा पेंडसेनं म्हटलेलं जूही की कली मेरी लाडली (दिल एक मंदीर) आणि  सलील भादेकरनं म्हटलेलं सुर ना सजे ( बसंत बहार) हे गाणं हीही गाणी जमून गेली. हेमंतदांचा शंकर जयकिशन यांनी वापर अगदी माफक केला आहे पण पतिता मधलं याद किया दिल ने कहां हो तुम हे प्रशांत रानडे आणि विभावरी जोशी यांनी गायलेलं गाणं इझी चेअरमध्ये पहुडलेल्या देवानंदच्या हातातल्या सिग्रेटीच्या धूम्रवलयांसकट सगळ्या गोष्टींची याद देऊन गेलं.
हिंदी गाण्यांच्या चाली पाश्चिमात्य सुरावटी चोरुन त्यावर बांधलेल्या असतात, असा एक आरोप नेहमी केला जातो. सुनते थे नाम हम या विभावरीने गायलेल्या गाण्यात  कम सप्टेंबरच्या चालीचा भास झाला खरा, पण ते गाणं आधी बांधलेलं होतं आणि कम सप्टेंबर ही धून नंतर आली ही माहिती मनोरंजक वाटली. संगीताची नेमकी जाण असलेल्या राज कपूरने शंकर जयकिशन यांच्या प्रतिभेचा उत्तम वापर केला हे आपण सर्व जाणतोच. दिल का हाल सुने दिलवाला (श्री ४२०) या ठेक्याच्या गाण्यातून हेच सिद्ध होतं. रात और दिन या चित्रपटाच्या संगीतात शंकर जयकिशन यांनी एक वेगळाच मूड लावला आहे. कदाचित ही त्या स्किझोफ्रेनिक तरुणीच्या कथेची मागणी असेल.आवारा ऐ मेरे दिल  हे अनघानं गायलेलं असंच एक थोडंसं अपरिचित पण दर्जेदार गाणं. ये रात भीगी भीगी( चोरी चोरी) हे ऑल टाईम हिट  सलील आणि  विभावरीनं समरसून म्हटलं. संगम हा चित्रपट ज्यांना पूर्ण आठवतो त्यांना ये मेरा प्रेमपत्र पढकर च्या आधीची लांबलचक पण सुरेल सुरावट आठवत असेल - तसेच रफीच्या ओळी संपल्यावर वैजयंतीमालाचे गुणगुणणे - प्रशांत आणि विभावरीने गायलेल्या या गाण्यात असे बारकावे जबरदस्त पेश केले. मन्नाडे हा तर शंकर जयकिशन यांचा मुकेश इतकाच आवडता गायक. अब कहां जाये हम ( उजाला) या  प्रमोद रानडेंनी गायलेल्या गाण्यात मन्नादांच्या सगळ्या जागा मुळाबरहुकूम दिसल्या.
ऍकॉर्डियन या तशा बदनाम वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणं हे शंकर जयकिशन यांचं एक मोठं काम मानलं पाहिजे. ऐ मेरे दिल कही (दाग)  या सलील भादेकरच्या गीतामधली अनिल गोडेंची सुरावट आणि 'काऊन्टरमेलडी' मधले ऍकॉर्डियनचे तुकडे केवळ ऐकत रहावे असे पेश झाले. घर आया मेरा परदेसी (आवारा) या गाण्याचे ऑर्केस्ट्रेशनही असेच जबरी होते. संगीतकार अनिल विश्वास यांनी नाकारल्यामुळं शंकर जयकिशन यांच्याकडं आलेल्या बसंत बहार या शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटाला त्यांनी काहीशी खुन्नस खाऊनच संगीत दिलं असावं. त्यातलंच दुनिया ना भाये मुझे  हे आर्त गाणं प्रशांतनं छानच सादर केलं. तूने हाय मेरे जख्मी जिगर को (नगीना) हे (चित्तरंजन यांच्या भाषेत सांगायचं तर 'डोक्यावर पदर घेऊन येणाऱ्या आवाजाच्या')  विभावरीनं म्हटलं तर सुबीर सेनचं कठपुतली मधलं मंजिल वही है प्यार की हे  सलीलनं. दिल की नजर से (अनाडी),  आना ही होगा तुम्हे आना ही होगा (दीवाना), अय्यया सुकू सुकू (जंगली), ये वादा करो चांद के सामने  (राजहठ), आ आ भी जा (तीसरी कसम), भंवरे की गुंजन (कल आज और कल),  कहे झूम झूम रात ये सुहानी (लव्ह मॅरेज), रात के हमसफर (ऍन इव्हिनिंग इन पॅरीस), तुम्हे याद करते करते (आम्रपाली), हम है तो चांद और तारे (मैं नशेमें हूं) हीसुद्धा अशीच रंगलेली गाणी.
'शंकर जयकिशन यांच्या गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे जे गाणं झालं पाहिजे' निवेदिका म्हणाली 'ते गाणं म्हणजे 'रसिक बलमा (चोरी चोरी)' त्यातल्या पहिल्या आलापानंतर जो एक व्हायोलिनचा कमालीचा करुण तुकडा आहे तो रमकांत परांजपे यांनी असा काही वाजवला की तिथेच टाळी पडली. विभावरीने सु रे ख  म्हटलेल्या या गाण्याबरोबरच हा भाग संपला असता तर बरं झालं असतं! रात गयी फिर दिन आता है (बूट पॉलिश) हा थोडासा ऍंटीक्लायमॅक्सच वाटला. आता उत्सुकता होती ती दुसऱ्या भागाची!